निकोलो दी काँती : (१३९५–१४६९). इटालियन व्यापारी आणि प्रवासी. त्याचा जन्म व्हेनिसमधील किओजिया येथे झाला. आपल्या प्रवासास त्याने बायको व चार मुलांबरोबर सुरुवात केली (१४१९). निकोलोचे लेखन ब्राकिओलिनी पोज्जिओ याने प्रथम दी व्हरायतेत फोरतुने (De varietate fortunae, खंड पाच) यांत प्रसिद्ध केले (१४४५).

निकोलो व्हेनिसमधून निघून सध्याच्या सिरियामधील दमास्कस येथे आला. येथे तो अरबी भाषा शिकला. येथून तो इतर सहाशे व्यापाऱ्यांबरोबर पुढील प्रवासास निघाला व युफ्रेटिस नदीच्या बाजूला बॅबिलोनियन संस्कृती असणाऱ्या बगदाद शहरात पोहोचला. या शहराचा परीघ १४ मैल असल्याचे व या शहराच्या मधून नदी वाहत असल्याचे तो लिहितो. या शहरात अतिशय मजबूत किल्ला व त्या बाजूला राजवाडा असल्याचे तो लिहितो. येथून नदीतून २८ दिवस प्रवास करून तो बसरा व पुढे पर्शियन गल्फमधील ओर्मुझ येथे पोहोचला. येथून १०० मैलांचा प्रवास करून तो ओमानजवळ पोहोचला. येथे तो पर्शियन भाषा शिकला. तसेच त्याने तेथील पोशाख अंगिकारल्याचे तो लिहून ठेवतो. तेथे काही दिवस राहून तो सिंधू नदीच्या मुखावरील खंबात येथे पोहोचला. येथे तो सती प्रथेबद्दल सविस्तरपणे लिहितो. येथून पुढे तो जमिनीवरून प्रवास करत विजयनगर येथे पोहोचला.

विजयनगर शहराचा परीघ ६० मैल असल्याचे, शहरात ९० हजार सैन्य असल्याचे त्याने लिहिले आहे. तेथे एकापेक्षा जास्त विवाह करण्याच्या प्रथेची तो माहिती देतो. येथील राजा भारतातील इतर राज्यकर्त्यांपेक्षा खूप प्रबळ असून त्याला बारा हजार बायका आहेत, त्यांतील चार हजार बायका तो जिथे जाईल तिथे त्याच्याबरोबर जातात व राजाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघतात, अशी काही अतिशयोक्ती देखील निकोलोच्या त्याच्या लेखनात दिसते. पेनुकोंडा (Pelagonda) शहर विजयनगरपासून ८ दिवसांच्या अंतरावर असून त्याचा परीघ दहा मैल असल्याची माहिती तो देतो. हिंदू दिनदर्शिकेबद्दल तो सांगतो की, हिंदूंचे वर्ष बारा महिन्यांत विभागलेले आहे. पुढे तो येथील चलनाबद्दल माहिती देतो. येथील काही प्रदेशांत चलन न वापरता दगड वापरतात, असेही सांगितले आहे; परंतु याबाबत स्पष्ट अशी काहीच माहिती दिलेली नाही. काही भागांत सळईसारखे लोखंडाचे तुकडे तर, काही भागांत सोन्याची नाणी चलन म्हणून वापरतात. इथल्या चलनाची तुलना करताना निकोलो म्हणतो की, इथल्या सोन्याच्या चलनाचे वजन आमच्या प्रदेशातील फ्लोरेन चलनाच्या दुपटीपेक्षा जास्त वजनाचे असते. त्याचबरोबर चांदी व तांब्याची नाणी वापरली जातात. त्या भागातील रथयात्रेतील विचित्र प्रथेबद्दल पण लिहितो. तो लिहितो, एका विशिष्ट दिवशी देवतेच्या मूर्ती दोन रथांतून शहरात मिरवणुकीने आणल्या जातात. त्या रथांवर बसलेल्या सुंदर व अलंकृत स्त्रिया देवतांची स्तोत्रे म्हणत असतात. काही भक्त त्या रथाच्याखाली चिरडून मृत्यू येण्यासाठी स्वतःला झोकून देतात. येथून पुढे तो चेन्नईमधील सेंट थॉमस चर्चचा उल्लेख करतो. याचबरोबर तो मोत्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका शहराचा उल्लेख करतो. तो येथे मिळणाऱ्या एका झाडाच्या पानांचा वापर लिखाणासाठी करत असल्याचे लिहितो. पुढे तो श्रीलंकेचा झीलम म्हणून उल्लेख करताना म्हणतो की, या बेटाचा परीघ तीनशे मैल असून येथे मोठ्या प्रमाणात दालचिनी तयार होते.

भारतातून श्रीलंका मार्गे तो अंदमान व निकोबार बेटांना भेट देऊन सुमात्राला पोहोचला. तेथे त्याने एक वर्ष वास्तव्य केले. त्याच्या लेखनात तिथल्या क्रूर प्रथांचे वर्णन केलेले दिसते. सुमात्रा बेटांवरील लोकांचे वर्णन करताना तो लिहितो की, येथील माणसे खूप क्रूर आहेत. तिथल्या पुरुष व स्त्रियांचे कान खूप मोठे असून ते कानात अमुल्य रत्ने वापरतात, तसेच ते गुडघ्यापर्यंत येणारे रेशमी कपडे वापरतात. तेथील पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करतात. त्यांची घरे खूप बुटकी असून ती सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून त्यांचे संरक्षण करतात. येथे मिरी, कापूर व सोने खूप प्रमाणात मिळते. येथे तयार होणारी मिरी ही इतर ठिकाणी मिळणाऱ्या मिरीपेक्षा मोठी असते. तो पुढे तेथील एका विचित्र प्रथेबद्दल लिहितो की, येथील लोक नरभक्षक असून, ते मानवी कवटी किमती वस्तू म्हणून घरात ठेवतात. तसेच त्याचा वापर वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी करतात. ज्याच्या घरात जास्त मानवी कवट्या असतात, तो मनुष्य श्रीमंत समजला जातो. तेथून पुढे तो सोळा दिवसांचा समुद्री प्रवास करत म्यानमारच्या (तत्कालीन ब्रह्मदेश) किनाऱ्यावरील थेनासेरीम येथे पोहोचला. हा प्रदेश हत्ती व मसाल्यांसाठी प्रसिद्ध असल्याचे तो लिहितो. येथून पुढे पंधरा दिवसांचा समुद्र व जमिनीवरून प्रवास करत सध्याच्या बांगला देशात गंगेच्या मुखातून प्रवास करत सोनारगाव येथे पोहोचला. या प्रवासात त्याने कधीही न बघितलेल्या मगरी बघितल्याचे तो लिहितो. येथे तो केळ्याला ‘मुसा’(Musa) म्हणून संबोधतो. येथून पुढे तो पूर्वेकडे प्रवास करत चितगाव येथे पोहोचला. येथून तो म्यानमारमधील आरकान नदीतून आरकानमार्गे मंडालेजवळ इरावती नदीच्या तीरावरील आवा या ब्रह्मदेशाच्या राजधानीत पोहोचला. तो लिहितो की, येथील राजा खूप श्रीमंत असून आपल्या अंगावर सोन्याचे व अमुल्य रत्नांचे अलंकार धारण करतो व तो पांढऱ्या हत्तीवरून प्रवास करतो. येथील पुरुष एकाच स्त्री बरोबर राहतात. येथील लोक साप, लाल मुंग्या खात असल्याचे तो लिहितो. येथून तो चीनपर्यंत गेला असावा, असे त्याच्या लेखनावरून दिसते. त्याने १४३० मध्ये आपला परतीचा प्रवास सुरू करून भारतातील कोचीन, कालिकत, खंबातमार्गे मध्य आशियातील एडन, बर्बेरा, जेद्दा, कैरो येथे पोहोचला. येथे त्याची बायको, दोन मुले व सर्व नोकर प्लेगमुळे दगावले. येथून जमीन व समुद्र मार्गे प्रवास करत आपल्या जन्मगावी व्हेनिस येथे आपल्या दोन मुलांबरोबर पोहोचला.

निकोलोच्या लेखनात त्याने भेटी दिलेल्या शहरांची तत्कालीन नावे, पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, तेथील रीतिरिवाज, रूढी-परंपरा यांचे माहिती मिळते. परंतु तत्कालीन शहरांची नावे, मोजमापे व सध्याची नावे यांचा मेळ लावताना वाचकांचा खूप गोंधळ उडतो. तसेच त्याची काही वर्णने खूप अतिशयोक्तीपूर्ण वाटतात. त्याचे लेखन पुढे लॅटिन, पोर्तुगीज, स्पॅनिश व इटालियन भाषांत १४९२ ते १५५० मध्ये,  तर इंग्लिशमध्ये १५७९ साली प्रसिद्ध झाले.

संदर्भ :

  • Baumgartner, Ingrid, CONTI, NICCOLO DEI (c. 1395-1469) Italian Merchant and Traveller, New York, 2003.
  • Major, Richard Henry, India In The Fifteen Century, London, 1857.

                                                                                                                                            समीक्षक : प्रमोद जोगळेकर