डेल, हेन्री हॅलेट : ( ९ जून १८७५ – २३ जुलै १९६८ )

हेन्री हॅलेट डेल यांचा जन्म लंडन येथे झाला. त्यांचे वडील चार्ल्स जेम्स डेल हे मातीच्या भांड्यांचा व्यवसाय करायचे. लेज स्कूल, केंब्रिज येथे शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी ट्रिनिटी कॉलेज येथे शिष्यवृत्तीसह प्रवेश घेतला. नैसर्गिक विज्ञानातील ट्रायपोस ही परीक्षा शरीरविज्ञान आणि प्राणिशास्त्र हे विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी शिष्यवृत्ती मिळवून सेंट बार्थोलोम्य हॉस्पिटल, लंडन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. प्राध्यापक अर्नेस्ट स्टर्लिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले आणि वैद्यकशास्त्र आणि शल्यचिकित्सेतील केंब्रिज विद्यापीठाची बी.सी.एच. पदवी मिळवली. नंतर हेन्री हॅलेट डेल हे वेलकम फिजिऑलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरीज येथे औषधशास्त्रज्ञ बनले. दोनच वर्षांनंतर ते या सर्व प्रयोगशाळांचे संचालक बनले. आणि त्यापुढील सहा वर्षे ते या पदावर कायम राहिले. दरम्यान केंब्रिजमधून त्यांनी आपले एम.डी. पूर्ण केले.

प्राणीपेशीतील हिस्टामाइन नावाच्या संयुगाचा परीणाम डेल यांनी अभ्यासला. रक्तवाहिन्या रुंदावणे, अनैच्छिक स्नायूचे आकुंचन असे त्याचे परिणाम होतात. हे अपप्रतिरक्षी परिणाम आहेत (anaphylactic). ॲसिटील कोलीन यशस्वीरित्या वेगळे करून प्राणीपेशीतील त्याचे कार्य त्यांनी शोधून काढले. चेताग्राच्या (Nerve ending) शेवटी असणारे ॲसिटील कोलीनच्या अस्तित्वास त्यांच्या शोधाने पुष्टी मिळाली. त्यांच्या संशोधनामुळे चेता आवेगाच्या (nerve impulse) रासायनिक प्रसारामधील ॲसिटील कोलीनचे कार्य विशद केले गेले.

ॲसिटील कोलीन एक चेतापारेषक रसायन चेतापेशी, स्नायू पेशी व काही ग्रंथीमध्ये संदेशनाचे कार्य करते. चेतापेशी व स्नायू पेशी यांच्या  संधिप्रदेश स्थानी ॲसिटील कोलीनमुळे स्नायू होतात. स्वायत्त चेता संस्थेमध्ये (Autonomic nervous system) ॲसिटील कोलीनचा महत्त्वाचा वाटा आहे.

ते १९१४ साली  लंडन येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च येथे जीवरसायनशास्त्र व औषधशास्त्र विभागाचे संचालक बनले. त्याचवर्षी ते रॉयल सोसायटीकडून निवडले गेले आणि दहा वर्षे तेथे सचिव होते. १९२८ ते १९४२ ते नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च, लंडनचे संचालक होते. १९३६ साली त्यांना ओटो लोवीसोबत संयुक्तपणे चेता-आवेगाच्या रासायनिक पारेषण विषयक शोधाबद्दल वैद्यकशास्त्र व शरीरक्रियाविज्ञानातील नोबेल परितोषिक दिले गेले.

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी हेन्री डेल यांनी मंत्रिमंडळात वैज्ञानिक समितीचे सल्लागार म्हणून काम पाहिले. ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष होते. क्रियाशील जैविक पदार्थ जसे संप्रेरके, विविध लसी, यातील आंतरराष्ट्रीय मानक प्रस्थापित करण्यात डेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अल्पशा आजाराने त्यांचे केंब्रिज येथे निधन झाले.

संदर्भ : 

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा