दीक्षित, श्रीनिवास हरी : ( १३ डिसेंबर १९२० — ३ ऑक्टोबर २०१३ ). भारतीय तत्त्वज्ञ. निपाणीजवळील बुदलमुख ह्या गावी तीन शतकांहून अधिक काळ वास्तव्यास असणाऱ्या दीक्षित घराण्यातील तीन बंधूंपैकी ते सर्वांत लहान होते. आईचे वडील आजोबा आत्मारामशास्त्री पित्रे करवीरातील एक नामांकित प्रशिक्षक व करवीरपीठाचे शंकराचार्य होते. कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये अध्ययन झालेले दीक्षित १९४५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. (तत्त्वज्ञान) परीक्षेत सर्वप्रथम आल्याने विद्यापीठाच्या तेलंग सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले. सावंतवाडी, बेळगाव, पुणे, धारवाड येथे अध्यापन करून १९५२ मध्ये पुन्हा राजाराम महाविद्यालयातील तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र विभागात ते रुजू झाले आणि तेथूनच ते १९७८ मध्ये सेवानिवृत्त झाले.

महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी तीन वर्षे भूषविले (१९९२−९५) व परिषदेस दिशा दिली. परामर्श  ह्या तत्त्वज्ञानाला वाहिलेल्या पुणे विद्यापीठाच्या त्रैमासिकाच्या सल्लागार-संपादक मंडळाचे ते सदस्य होते. तत्त्वज्ञान महाकोशातील तसेच मराठी विश्वकोशातील तत्त्वज्ञानविषयक नोंदींचे तसेच परामर्श  व नवभारत  या नियतकालिकांचे लेखक म्हणून ते मराठी वाचकांस परिचित आहेत. आ. ह. साळुंखे यांच्या चार्वाकदर्शनाचे त्यांनी केलेले परीक्षण साळुंखे यांच्या प्रदीर्घ उत्तराला व नवभारताच्या विशेषांकाला (वर्ष ४७, अंक ४-६, नोव्हें. १९९२, जाने.-मार्च १९९४ आणि जुलै-ऑगस्ट १९९७) निमंत्रण देणारे ठरले. भारतीय तत्त्वज्ञान, नीतिमीमांसा ही त्यांची पुस्तके वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तके म्हणून मान्यताप्राप्त आहेत. तत्त्वज्ञान विषयातील दर्जेदार व लोकप्रिय पाठ्यपुस्तकांचे लेखक अशी त्यांची ख्याती आहे. तत्त्वज्ञान परिभाषा लघुकोश  साकारण्यात त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती.

निरागस, निष्कपटी, निःस्वार्थी, निर्वैर, विनम्र, वक्तशीर, टापटीप असे त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांच्या स्मरणात आहे. अत्यंत साधी राहणी, संवाद, चर्चा, नवनवीन तत्त्वविचारांचा सखोल अभ्यास, साधे, सुखी, सरळ, संयमी, समाधानी, आखीव, शांत, समृद्ध, दीर्घायुष्य व सौ. मीनाक्षी फाटक-दीक्षित यांची सतत साथ त्यांच्या जीवनाचा वेध घेताना नोंदावी लागेल. त्यांनी संपूर्ण आयुष्य तत्त्वज्ञान शिकवले व तेच ते जगले. “ज्ञानार्जन करून निरपेक्ष बुद्‌धीने ज्ञानदान करणाऱ्या प्राध्यापकवर्गाचे प्रतिनिधी व ‘देवावर विश्वास न ठेवणारा देव माणूस’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते (आठवणीतील प्रा.श्रीनिवास दीक्षित, २०१६, पृ. ३५)”. “Why to worry if you can solve the problem and what is the use of worrying if you cannot solve the problem”, ‘‘इहवादाला परलोकवासी केल्याशिवाय तरुणांना तरणोपाय नाही;’’ ‘‘अनात्मवाद हा बौद्धदर्शनाचा आत्मा आहे’’ अशी वरकरणी चमकदार पण चिंतनगर्भ, प्रगल्भ, आशयघन वाक्ये ते सहजपणे बोलून जात आणि तेही प्रसंगोचित असे. एकूण त्यांना ‘वेगळा मार्ग दिसत असल्याने’ व ‘वेगळी धून ऐकू येत असल्याने’ असे होत असावे, असा काहीसा कयास आहे. विद्यार्थ्यांवर प्रेम व मानवजातीबद्दल अपार आस्था असल्यामुळे त्यांनी कोणास दुःख दिले नाही.

अद्वैत वेदांत हे शाश्वत तत्त्वज्ञान असून ते जिवंत आणि वर्धमान आहे, ही भूमिका त्यांनी वारंवार मांडली व चार्वाकांकडून वेदांताकडे जाण्याची गरज अधोरेखित केली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडताना वेदांत-बौद्ध मतातील साम्य राधाकृष्णनांनी कसे अधोरेखित केले आहे व ते भारताच्या सामाजिक वास्तवाच्या संदर्भात कसे महत्त्वाचे आहे, हे आपल्या ‘विसाव्या शतकाच्या अन्वयाला धरून राधाकृष्णन यांनी लावलेला अद्वैत वेदांताचा अर्थ’ ह्या शोधनिबंधात स्पष्ट केले (परामर्श, खंड ११, अंक-४; फेब्रुवारी, १९९०). गीतेतील नीतिविचार उलगडून दाखवताना अखेरीस ‘Intuitionist, Utilitarian & Perfectionist’ पद्धतींनी कर्माचा विचार करण्याची दिशा दर्शविली आहे; ती भावी संशोधकांस तौलनिक तत्त्वज्ञान विकसित करण्यास प्रेरक आहे. (परामर्श, खंड १५, अंक-२, ऑगस्ट, १९९३) नवहिंदुत्त्ववादाची त्यांची संकल्पना जरी सर्वमान्य होण्यास कठीण असली, तरी त्यातील प्रत्येक मुद्दा विचारप्रवर्तक आहे. म्हणूनच मोलाचा आहे. त्यांच्या सर्व लेखनाचा कळसाध्याय म्हणता येईल, अशी तात्त्विक भूमिका ‘होय, जग मिथ्या आहे’ (Yes, The World is Unreal) ह्या शोधनिबंधात त्यांनी मांडली व ठामपणे प्रतिपादन केली. पारंपरिक युक्तिवाद देऊन आपले म्हणणे त्यांनी मांडले आहे. जग मिथ्या आहे, म्हटले तर समाजसुधारणेस वाव राहत नाही, ह्या मुद्द्याचा प्रतिवाद त्यांनी केला आहे. स्वामी विवेकानंद, म. गांधी, विनोबा भावे, सेनापती बापट आणि मुख्य म्हणजे खुद्द शंकराचार्य यांचे दाखले देऊन त्यांची प्रेरणा वेदांताची होती, असे दृष्टोत्पत्तीस आणले आहे. जग सत्य म्हणजे अपरिवर्तनीय असेल, तर ते बदलता, सुधारता येणार नाही; ते सुधारता येते त्या अर्थी ते मिथ्या होय, हा एक युक्तिवाद होय. मिथ्या म्हटले तर निष्क्रियता, आळशीपणा वाढीस लागतो, हाही आक्षेप म्हणून गळून पडतो. आळशीपणाची भौतिक व ऐतिहासिक कारणे पाहण्याची गरज सांगत अद्वैती तत्त्वज्ञान कसे कार्यप्रवणतेस पोषक आहे, हे त्यांनी दाखविले आहे. ‘जग मिथ्या आहे’ ह्याचा अर्थ ज्या रीतीने मला म्हणजे सामान्य माणसाला जगाची प्रतीती येते, त्या रीतीने ते मिथ्या आहे; जगाच्या ज्या अनुभवातून वासना अंकुरित होतात, तो अनुभव मिथ्या होय; जगाच्या नित्य येणाऱ्या अनुभवातून ज्या इच्छांचा उगम होतो, त्यांचे साफल्य होऊच शकत नाही म्हणून जगाला मिथ्या म्हणावयाचे; जे पाहिजे होते, ते मिळाले, असे वाटत नाही, इच्छेचे स्वरूप कळत नाही, म्हणून मिथ्या; इष्ट गोष्टींचा पाऊस पडला, तरी समाधान होत नाही म्हणून ब्रह्माखेरीज इतर सर्व मिथ्या ह्याची फोड करताना त्यांनी ब्रह्मानुभवाची सांगड मोक्ष, निर्वाण, ब्रह्मविहार या संकल्पनांशी घालून लोकसंग्रह कसा साधला जातो, याचे सूचन केले आहे.

नीतिमीमांसा  या ग्रंथास उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्यपुरस्कार प्राप्त झाला. मुंबई व शिवाजी विद्यापीठांकडूनही पारितोषिके प्राप्त झाली. भारतीय तत्त्वज्ञानासही अनेक बक्षिसे मिळाली आहेत. निराग्रही पद्धतीने आपले म्हणणे वाचकांपर्यंत पोहोचविणारे हे ग्रंथ तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांस पाच दशकांहून अधिक काळ मार्गदर्शक ठरले आहेत. ‘प्रत्येक मनुष्य हा साध्यमूल्य आहे’, ‘नीती ही सामाजिकच असते का?’, ‘चार्वाकांपासून वेदांताकडे’ हे त्यांचे शोधनिबंध भावी संशोधकांस विचारप्रवृत्त ठरणार आहेत.

श्रीनिवास दीक्षित यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : भारतीय तत्त्वज्ञान (१९६३), तर्कशास्त्र (१९६७), तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक विवेचनपद्‌धती, इंद्रधनुष्य (१९७५), नैतिक आणि सामाजिक तत्त्वज्ञान (१९७५), सात दिवस सात रात्री (१९७६), इहवाद, धर्म व नीती (१९७७), नीतिमीमांसा (१९८२), तत्त्वज्ञानातील समस्या, इ. स. १९०० पासूनचा नीतिविचार.

संदर्भ :

  • दाभोळे, ज. रा. संपा. आठवणीतील प्रा. श्रीनिवास दीक्षित,  पुणे, २०१६.

                                                                                                                                                समीक्षक – प्रदीप गोखले