प्रस्तावना : व्यक्तीच्या आरोग्य या संकल्पनेमध्ये आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचाही समावेश होतो. तणावपूर्ण, स्पर्धात्मक व जलद जीवनशैली मधील प्राप्त परीस्थितीस आनंदाने, शांतपणे व तत्परतेने सामना करण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य निरोगी ठेवणे गरजेचे आहे.

व्याख्या : १) वेब्स्टर यांच्या मते, मानसिक आरोग्य म्हणजे मनाची नैसर्गिक रीत्या झालेली निकोप, सुदृढ वाढ व विकास होय.

२) ‘मानसिक स्वस्थता, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या क्षमतेचा अनुभव येतो, ती व्यक्ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळून, समाजाला योगदान देऊ शकते.

— WHO(जागतिक आरोग्य संघटना )

मानसिक आरोग्य परिचर्या : मानसिक आजार हा मेंदूचा एक शारीरिक आजार आहे त्यामुळे व्यक्तीच्या विचार, वर्तन, ऊर्जा किंवा भावना या क्षमतांमध्ये अडथळा निर्माण होतो. मनोरुग्ण शुद्धीवर असला तरी त्याचे बौद्धिक कार्य मोठ्या प्रमाणावर बिघडलेले असते. अशा परिस्थितीत रुग्णाला समजून घेवून त्यांच्यावर उपचार करणे, त्याची शुश्रूषा करणे म्हणजे मनोरुग्ण परिचर्या होय.

मानसिक आरोग्याचे घटक (Components of Mental Health) :

१. स्वत:ला स्वीकारणे / आत्मसन्मान : मानसिक दृष्ट्या निरोगी असलेली व्यक्ती स्वत:बद्दलची कमतरता, उणीवा मान्य करून, त्या भरूण काढण्याचा प्रयत्न करतात.

२. इतरांच्या भावनाबददल जागरूक असणे : या व्यक्तींना दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटते व इतरांना सहकार्य करण्यास नेहमी तत्पर असतात.

३. जीवनातील सर्व कार्य पूर्ण करण्याची क्षमता : या व्यक्ती स्वत:चे उद्दिष्ट किंवा ध्येय ठरवून ते पूर्ण करण्यास प्रयत्नशील असतात.

मानसिक आरोग्याचे संकेतांक (Indicators of Mental health) : हे संकेतांक “मानसिक रोग प्रतिबंधात्मक” परिचर्येच्या संकल्पनेमध्ये समाविष्ट केले जातात.

  • स्वताबद्दल सकारात्मक दृष्टीकोन
  • स्व -विकास
  • एकत्रीकरण (Integrity in behavior )
  • स्वायत्तता / स्वावलंबी
  • वास्तवाची समज (Presence of mind)
  • परिस्थितीवरती नियंत्रण

मानसिक स्वास्थ्याचे निकष : मनोरुग्ण तज्ञाबरोबर किंवा क्लिनिक मध्ये काम करताना परिचारिका मानसिक स्वास्थ्याचे निरीक्षण तीन पातळीवर करतात :

      वैयक्तिक सामाजिक निकष क्रियात्मक (प्रत्यक्ष कृती)
मानसिक ताणतणावांना यशस्वीपणे तोंड देणे समाजातील अनेक घटकांशी जुळवून घेणे ताणतणावात्मक प्रंसंगावर कुशलतेने मात करणे.
सहनशीलता जबाबदारीची जाणीव समाजमान्य वर्तन करणे परीपक्व दृष्टीने धनात्मक मार्गाने कृती करणे.
आत्मविश्वास सामाजिक स्वीकृती आत्मवास्तविकरण होते.
स्व-प्रतिमा सहिष्णुता —-
स्वत:बद्दल सार्थ अभिमान सामाजिक रूढी , परंपरा, नितीनियमांचे पालन करणे.          —-
समायोजनाच्या उपाययोजना आत्मसात करणे         —-         —-

 

मानसिक दृष्ट्या आरोग्यदायी  व्यक्तीची  वैशिष्ट्ये :

१. या व्यक्ती आपल्या बुद्धीचा व कर्तृत्वाचा  योग्य ठिकाणी योग्य तऱ्हेने वापर करतात.

२. या व्यक्तीला स्वत:बद्दल अभिमान वाटतो. आत्मविश्वासाने कामे तडीस नेतात व स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास समर्थ असतात.

३. अशा व्यक्तीस आपल्यामधील गुण, अवगुण, उणीवा तसेच स्वत:च्या मर्यादा माहित असतात.

४. अशी व्यक्ती वास्तववादी असून, वस्तुनिष्टपणे आपल्या वर्तनाचे निरीक्षण करू शकते. आपल्या समस्या सोडविण्यासाठी विचारपूर्वक योजना आखते.

५. या व्यक्तींना समूहात राहण्यास आवडते व तेथे त्यांना सुरक्षित वाटते.

६. या व्यक्तींना दुसऱ्याबद्दल आपुलकी वाटते. त्यांच्या भावनाची कदर करते. म्हणजेच इतरांच्या भावनाबाद्दल जागरूक असतात.

७. यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असतो.

८. अशी व्यक्ती चिंता, काळजी कमी करण्यासाठी विधायक कार्यात स्वत:ला गुंतवूण घेते.

९. आलेल्या प्रसंगांना, अडचणींना, नुकसान, नैराश्य या सर्वांना प्राप्त परीस्थितीमध्ये  तोंड देण्याचे सामर्थ्य अशा व्यक्तींमध्ये असते, त्यामुळे ती समाधानी असते.

 

संदर्भ :

  • Sreevani, A Guide to Mental Health and Psychiatric Nursing, 4th Ed., Mumbai 2018.
  • पार्क के. सामाजिक आरोग्य परिचर्या, ६ वीआवृत्ती, २०१६.

समीक्षक : रोहिदास बिरे