संस्कृत ध्वनिविषयक धार्मिक कल्पना : वेदमंत्र अनर्थक आहेत असे कौत्साने सांगितले असे निरुक्त या ग्रंथात यास्काचार्याने म्हटले आहे, पण तरी देखील वेदमंत्रांच्या विनियोगाला त्याने विरोध केलेला दिसत नाही. त्यावरून फल देण्याची मंत्रांची शक्ती त्या मंत्रांच्या अर्थात नसून त्या मंत्रांच्या वर्णांमध्येच आहे असे काहीसे त्याचे मत असावे. ॐकाराच्या अ+उ+म् या घटकांच्या तात्पर्याबद्दल उपनिषदांमध्ये केलेल्या प्रदीर्घ चर्चेत असेच काहीसे मत व्यक्त होते.अथर्ववेदाच्या अनुलोमकल्प या परिशिष्टात गायत्री मंत्राचे विलोम म्हणजे उलटे पठण कसे करावे हे सांगितले आहे. या मंत्राचे अनुलोम किंवा सुलटे पठण “तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात् ।।” असे आहे, तर विलोम पठण “त् या द चो प्र न: यो यो धि । हि म धी स्य व दे र्गो भ यं णी रे र्व तु वि तस त त् ।।” असे आहे. अनुलोमकल्पानुसार या मंत्राच्या अनुलोम किंवा विलोम पठनामुळे पाठकाच्या सर्व कामनांची सिद्धी होते आणि त्याला कुठल्याच अनर्थाला तोंड द्यावे लागत नाही. अशा विलोम पठनासारख्या प्रथांवरूनही शब्दाच्या मंत्राच्या अर्थापेक्षा ध्वनींवरच भर दिलेला दिसतो. अशा प्रकारचे संस्कृत भाषेच्या वर्णांना दिलेले महत्त्व तंत्रशास्त्राच्या परंपरेत आणखी विकसित झालेले दिसते. तंत्रशास्त्रातील ग्रंथांमध्ये संस्कृतभाषेतील प्रत्येक वर्णाला काही तरी बीजमंत्ररूपाने प्रयोजन लावलेले दिसते. वेगवेगळ्या बीजांना एकत्र करून नवीन मंत्र तयार केलेले दिसतात. उदाहरणार्थ कामकलाविलास या तंत्रशास्त्रातल्या ग्रंथात (श्लोक ३) असे म्हटले आहे – “वर्णमालेतील प्रथम अक्षर ‘अ’ आणि शेवटचे अक्षर ‘ह’ यांच्या संयोगातून शक्तीची अभिव्यक्ती होते.” प्रत्येक अक्षराचा काहीतरी अर्थ बसवून मग शब्दांचे व ग्रंथांचे अर्थ लावण्याचे काही प्रयत्न झालेले आहेत. अशा प्रयत्नांच्या विश्वसनीयतेबद्दल जरी शंका व्यक्त केली, तरी असे प्रयत्न झालेले आहेत आणि अशा प्रयत्नांतून कौत्साची परंपरा पुढे कुठल्या दिशांनी चालू राहिली हे दिसून येते.
संदर्भ :
- Deshpande, Madhav M., Sanskrit & Prakrit Sociolinguistic Issues, Motilal Banarsidass, Delhi, 1993.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.