भगवंतराव अमात्य : ( ७ फेब्रुवारी १६७७— ? १७५५). कोल्हापूर व सातारा संस्थानांचे अमात्य. शिवकाळातील मुत्सद्दी व आज्ञापत्राचे कर्ते रामचंद्रपंत अमात्य (सु. १६५० ? —१७१६) यांचा ज्येष्ठ मुलगा. रामचंद्रपंतांना एकूण तीन मुले व एक मुलगी. भगवंतराव उर्फ बाजीराव, मोरेश्वर उर्फ आप्पाजीराव, शिवरामपंत आणि व्यंकूबाई.

छ. शिवाजी महाराज यांच्यानंतरच्या काळात रामचंद्रपंत आणि छत्रपती संभाजी यांचे संबंध सलोख्याचे नव्हते. छ. राजाराम यांनी रामचंद्रपंतांना परत अमात्यपद दिले (१६९३). पुढे मोगलांच्या कैदेतून छ. शाहूंची सुटका झाल्यानंतर रामचंद्रपंतांनी महाराणी ताराबाईंचा पक्ष उचलून धरत छ. राजारामांचा पुत्र दुसरा शिवाजी यांस छत्रपती बनविले व पन्हाळगडावर मराठ्यांची दुसरी राजसत्ता निर्माण केली. पुढे ताराबाईंशीदेखील न पटल्याने रामचंद्रपंतांनी ताराबाई आणि दुसरा शिवाजी यांस पदच्युत करून छ. राजारामांची दुसरी पत्नी राजसबाई यांचा पुत्र दुसरा संभाजी यांस छत्रपतीपद मिळविण्याच्या कामी साहाय्य केले. रामचंद्रपंतांनंतर भगवंतराव कोल्हापूर राज्याचे अमात्य झाले.

रामचंद्रपंतांनी छत्रपती संभाजी (दुसरे) यांच्या कारकिर्दीत तटस्थता स्वीकारली होती. त्यामुळे साहजिकच छ. संभाजी (दुसरे) व छ. शाहू यांची या घराण्यावर इतराजी झाल्यामुळे त्यांना देशाच्या राजकारणात स्थान नव्हते. भगवंतराव हे तेजस्वी, बाणेदार होते; मात्र त्यांच्या कर्तृत्वाला वाव नव्हता. तेव्हा त्यांनी छ. शाहू यांना पत्र लिहिले की, ‘माझ्या मनात तुमची सेवा करावी हा प्रबळ हेतू आहे, मात्र मागे वडिलांच्या हातून सातारा गादीच्या सेवेत अंतर पडले असले तरी आम्ही पुन्हा राजघराण्याची सेवा करीत आलोच आहोत. आमचा उत्कर्ष झाला नाही, मात्र आपल्या दरबारी अनेक सामान्य लोकांचा उत्कर्ष झाला आहे. आम्ही उपेक्षित आहोत म्हणून माझे मन उद्विग्न आहे. आपण दया दाखवून सन्मानपूर्वक आमची सेवा मागितली तरी मी हजर आहे’. परंतु छ. शाहूंनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही, तेव्हा उदाजी चव्हाण यांस हाताशी धरून त्यांनी छ. संभाजींच्या बाजूने लढण्याची सर्व शिकस्त केली; पण यश आले नाही. आपल्या विरुद्ध कट करतो, असे वाटून छ. संभाजींनी त्यांची गावे जप्त केली.

वारणेच्या तहाच्या प्रसंगी आपली व्यवस्था लावण्यासाठी भगवंतराव साताऱ्याला गेले, पण दखल घेतली गेली नाही. पुन्हा ते १७४० मध्ये छ. संभाजींबरोबर साताऱ्याला गेले. तेथे छ. शाहूंनी छ. संभाजी व त्यांची समजूत काढून अमात्यांची नीट व्यवस्था लावण्याबद्दल छ. संभाजींकडून शपथ घेतली. तरी देखील पराक्रमाला वाव नसल्यामुळे भगवंतराव निजामाकडे जाण्याच्या बेतात होते. पुढे छ. शाहूंना सातारा गादीवर रामराजे यांना दत्तक घेण्याच्या कामी  भगवंतरावांची गरज लागली. याचे मुख्य कारण ताराबाई होत्या. जेव्हा सातारा गादीच्या वारसांचा प्रश्न उद्भवला. त्या वेळी ताराबाई यांनी छ. शाहूंना सांगितले की, माझा नातू दुसरे शिवाजी यांचे पुत्र रामराजा जिवंत असताना दुसरीकडून दत्तक घेण्याची गरज नाही. तथापि यास प्रमाण काय, असा प्रश्न छ. शाहूंनी विचारला. तेव्हा ताराबाईंनी पुत्र जन्माची सविस्तर हकिकत सांगितली. पुत्र जन्मतः मृत्यू पावला, अशी आवई उठवून, त्या पुत्रास बावडा येथे भगवंतराव अमात्य यांच्याकडे सुखरूप ठेवले होते, असे सांगितले. यावर छ. शाहूंनी सांगितले की, स्वत: भगवंतरावांनी हे वचन कृष्णेचे पाणी हातावर सोडून शपथपूर्वक सांगावे. त्या प्रमाणे भगवंतराव अमात्य यांनी शाहूंना शपथपूर्वक खातरी दिली. पुढे छ. शाहूंचे निधन झाले (१७४९) व दुसऱ्याच दिवशी पेशव्यांनी भगवंतराव अमात्य यांना सर्व सरंजाम देऊन रामराजा यांना आणण्यासाठी पानगाव येथे पाठविले आणि ४ जानेवारी १७५० मध्ये रामराजे सातारा गादीवर बसले.

छ. रामराजे गादीवर आल्यावर साताऱ्याचे अमात्यपद भगवंतराव यांना मिळाले. सांगोला येथील तहानुसार पेशव्यांनी छत्रपती पदच नामधारी होऊन सर्व सत्ता पेशव्यांच्या हाती आली. पेशव्यांच्या या कृतीमुळे सातारा राजदरबारातील अमात्यांचे महत्त्वही कमी झाले.

पुढे त्यांनी कोल्हापूरच्या गादीचे अमात्यपद सु. ३० वर्षे भूषवले. अमात्यांच्या मुलखास लागून सावंतवाडीकर व आंग्रे यांचा मुलूख येत असल्याने त्यांना या दोघांपासून आपल्या मुलखाच्या संरक्षणासाठी झगडावे लागले. तसेच छ. संभाजी व छ. शाहू यांच्यामध्ये झालेल्या वारणेच्या तहाने (एप्रिल १७३१) त्याच्या रत्नागिरी मुलखाचा ताबा व काही उत्पन्ने  तहानुसार छ. शाहुंकडे गेली. छ. शाहूंनी पुढे तो मुलूख पेशव्यांकडे सोपविला. पेशव्यांकडे गेलेला मुलूख सोडवण्यासाठी भगवंतराव सतत पुणे व सातारा येथे फेऱ्या घालीत राहिले. पेशव्यांना हा मुलूख परत द्यायचा नव्हता, म्हणून त्या बदल्यात भगवंतरावांना काही नक्त रक्कम व खर्चास काही रक्कम पेशव्यांकडून मिळत असे.

भगवंतराव यांचे पुणे निधन झाले. पुढे त्यांचे पुत्र कृष्णराव प्रतिनिधी यांस कोल्हापूरचे अमात्यपद मिळाले (१७५०).

संदर्भ :

  • गोरे, रामचंद्र महादेव, श्रीमंतपंत अमात्य संस्थान बावडा वंशवृत, कोल्हापूर, १९१५.
  • सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, पुणे, १९२१.

                                                                                                                                                                                     समीक्षक :  कौस्तुभ कस्तुरे