मँडेलस्लो, योहान आल्ब्रेख्त दी : (१५ मे १६१६ – १६ मे १६४४). प्रसिद्ध जर्मन प्रवासी. त्याचा जन्म जर्मनीतील श्योनबर्ग येथे झाला. लहान असताना उत्तर जर्मनीमधील ड्यूक फ्रेडरिक (तिसरा) याच्या दरबारात तो रुजू झाला.

वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याला पर्शिया व मॉस्को येथे व्यापारी मसलतीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळाबरोबर पाठवण्यात आले. प्रवास करत तो इराणमधील इस्फहान शहरात आला असताना त्याच्या वर्तणुकीमुळे इराणचा शहा सफी (पहिला) हा प्रभावित झाला. त्याने मँडेलस्लोला खूप मोठ्या पगारावर त्याच्या दरबारी राहण्याची विनंती केली; पण त्याने त्यास नकार दिला. इस्फहानमधून बरोबरच्या शिष्टमंडळाची परवानगी घेऊन तो होलश्टाईनला परत जाण्यासाठी निघाला (६ एप्रिल १६३८). पण तिकडे न जाता ईस्ट इंडिया कंपनीच्या ‘स्वान’ नावाच्या ३०० टनाच्या जहाजातून शिराझ, अब्बास बंदर व पर्शियाच्या आखातातून एकोणीस दिवसांचा प्रवास करत त्याने २५ एप्रिल १६३८ रोजी सुरत गाठले. या जहाजावर २४ तोफा असल्याचा उल्लेख तो करतो. इस्फहानमधील इंग्रज प्रतिनिधीने या जहाजाच्या कप्तानाला मँडेलस्लोच्या सन्मानासाठी त्याच्याकडून कोणताही खर्च घेऊ नये, अशा विशेष सूचना दिल्याचे तो आपल्या प्रवासवर्णनात लिहून ठेवतो.

मँडेलस्लो सुरतमध्ये पाच महिने राहिला. आपल्या गुजरातच्या वर्णनात तो १६३०-३१ मध्ये पडलेल्या प्रचंड दुष्काळाबद्दल लिहून ठेवतो. या दुष्काळामुळे गुजरातसारख्या सुपीक प्रदेशाचे कसे वाळवंट झाले व त्यामुळे परदेशी व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल तो वर्णन करतो. तत्कालीन सुरतच्या वर्णनात, तो शहराला एकूण तीन दरवाजे असून त्यांची नावे ‘कँबे’ वा ‘अहमदाबाद दरवाजा’, ‘बुऱ्हाणपूर दरवाजा’ व तिसरा ‘नवसारी दरवाजा’ अशी असल्याचे, येथे येणाऱ्या कुठल्याही मालावर साडेतीन टक्के, तर सोने व चांदीच्या कुठल्याही वस्तूंवर फक्त दोन टक्के जकात आकारली जात असल्याचे लिहितो. सुरतेमध्ये स्वाली हे बंदर असून या बंदरावर परदेशातून आलेला माल उतरवला जात असल्याचे तो लिहितो. पुढे तो शहरात असणाऱ्या ‘गोपी’ तलावाचेसुद्धा वर्णन करतो.

भरूचचे (भडोच) वर्णन करताना लिहितो, की हे शहर एका उंचवट्यावर असून शहराला दोन दरवाजे आहेत, एक जमिनीकडे तर दुसरा नदीकडे आहे. हे शहर खूप संपन्न असून येथे तांदूळ, गहू, बार्ली आणि कापसाचे भरपूर पीक काढले जाते.

मँडेलस्लो बडोद्याला पोहोचला असताना तेथील इंग्रज अधिकाऱ्याने त्याच्या स्वागतासाठी तेथील हिंदू स्त्रियांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. बडोदा शहराला तटबंदी असून पाच दरवाजे असल्याचे, येथे कापड विणण्याचे व ते रंगवण्याचे कारखाने असल्याचे तो आपल्या लेखनात नमूद करतो. बडोद्याहून तो पुढे ऑक्टोबर १६३८ मध्ये अहमदाबादला पोहोचला. या सुरत ते अहमदाबाद प्रवासाला त्याला १२ दिवस लागल्याचे लिहितो.

अहमदाबादमध्ये फिरताना त्याने तेथील मैदानशहा बाजार, भद्रा किल्ला व जैन मंदिर येथे भेटी दिल्याचे सांगतो. शहराचे वर्णन करताना येथील रुंद व सुंदर रस्ते, शहरातील टुमदार घरे, सुती व रेशमी कपड्यांचा बाजार, सोन्या-चांदीचा बाजार, येथील सुबत्ता, बंदोबस्त तसेच सूत व रेशमाचा एकत्रित वापर करून तयार केलेल्या कापडाचे तोंडभरून वर्णन करतो. येथील अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय शहरात गंधक, शिसे व बंदुकीची दारू विकण्यास बंदी असली, तरी या वस्तू विकण्याची परवानगी कोतवालाकडून सहज मिळत असे, अशी माहिती तो देतो. अहमदाबाद शहरात कोणतीही जकात जरी नसली, तरी येथील कोतवालाला प्रत्येक गाडी मागे १५ पेन्स म्हणजे अंदाजे १५ रुपये द्यावे लागत. या शहराचे एकूण उत्पन्न एक कोटी वीस लाख रुपये असल्याचे व येथील सुभेदाराजवळ बारा हजार घोडे असल्याचे, तसेच येथील माकडे किती त्रास देतात व ती हिंदूंना किती प्रिय आहेत, याचे तो वर्णन करतो. तो पुढे लिहितो की, येथील सुभेदार आझमखान असून त्याचे वय साठ वर्षे आहे, त्याच्याजवळ खूप जमीन व दहा कोटी इतकी संपत्ती आहे. आझमखान नुकताच त्याच्या मुलीला म्हणजे शाहजहानचा दुसरा मुलगा शुजा याच्या बायकोला भेटल्याचे, तसेच तिच्या लग्नात २० हत्ती, १००० घोडे, ६००० गाड्या भरून किंमती सामान व ४०० गुलाम दिल्याचे तो लिहून ठेवतो. आझमखानच्या भेटीच्या वेळी मान्डेस्लोचे वय २४ वर्षे होते. आझमखानचा पाहुणचार घेऊन त्याच्याबरोबर जेवण केल्याचा तो उल्लेख करतो. तो आझमखानाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल देखील लिहितो. पुढे तो कँबे म्हणजे सध्याच्या खंबायतचे वर्णन करतो. येथील लोकांचा व्यापार चीन, दिव, गोवा, मक्का व पर्शियाशी चालतो, असे तो लिहून ठेवतो. येथे त्याने सती जाण्याची क्रूर प्रथा प्रत्यक्ष पाहिल्याचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर तो येथील पान खाण्याच्या पद्धतीबद्दलही लिहितो.

मँडेलस्लो पुढे प्रवास करत आग्र्याला पोहोचला, आग्र्याच्या वर्णनात तो मोगल दरबाराचे व त्यांच्या ऐश्वर्याचे भरपूर वर्णन करतो. आग्र्यात काही दिवस राहून तो लाहोर येथे गेला. येथील सार्वजनिक हमामखान्याचे वर्णन तो लिहून ठेवतो. येथे त्याला इंग्लंडला जाणाऱ्या जहाजाबद्दल माहिती मिळाल्यामुळे लाहोरमधील मुक्काम आवरता घेऊन तो परतीच्या मार्गाला लागला असताना भरूचजवळ त्याच्या काफिल्यावर झालेल्या हल्ल्याचे तो रसभरीत वर्णन करतो. आपल्या प्रवासवर्णनात तो गोव्याबद्दल, तिथल्या भौगोलिक, राजकीय परिस्थितीबद्दल, तसेच गुलामांबद्दलसुद्धा विस्तृत लेखन करतो. १ जानेवारी १६३९ रोजी मँडेलस्लो व सुरतेचा मावळता गव्हर्नर मेथवाल्ड हे दोघे ‘मेरी’ नावाच्या जहाजातून परतीच्या प्रवासाला निघाले. दमण, वसई, गोवा, श्रीलंका, केप ऑफ गुड होप, मादागास्कर, इंग्लिश खाडी असा प्रवास करत इंग्लंडमार्गे मँडेलस्लो उत्तर जर्मनीत पोहोचला (१ मे १६४०).

पुढे त्याचे पॅरिसमध्ये निधन झाले.

मँडेलस्लो लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे इंग्रजी भाषांतर जे. डेव्हीस यांनी Mandelslo’s Travels या नावाने प्रकाशित केले (१६६२).

संदर्भ :

  • Commissariat, M. S. Mandelslos Travels In Western India AD 1638-9, Bombay, 1931.

                                                                                                                                                                                      समीक्षक : प्रमोद जोगळेकर