बर्निअर, फ्रान्स्वा : (२५ सप्टेंबर १६२० – २२ सप्टेंबर १६८८). मोगल काळात भारतात आलेला फ्रेंच प्रवासी. पश्चिम फ्रान्समधील अँजू प्रांतातील झ्वे येथे एका शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे पालनपोषण त्याचे काका कर-दे-चेन्झॉक्सन यांनी केले. वयाच्या १५ व्या वर्षी तो पॅरिस येथील डी-क्लेरमोंट म्हणजेच सध्याच्या लासी-लुईस-ली-ग्रँड या महाविद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाला. १६४७ ते १६५० या काळात त्यांने उत्तर जर्मनी, पोलंड व इटली येथे प्रवास केला. १६५२ मध्ये तत्त्वज्ञान या विषयाचे शिक्षण घेत असताना त्याचा संपर्क प्रसिद्ध तत्त्वज्ञ सीरानो द बेर्झीराक आणि मोल्येर यांच्याशी आला. प्येअर गासँदी या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या मार्गदर्शनाखाली शारीरक्रियाविज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून १६५२ मध्ये एम्. डी. ही पदवी संपादन केली व नंतर त्याच वर्षी तो पॅरिसला गेला. त्याने १६५४ मध्ये पॅलेस्टाइन व सिरिया या देशांना भेटी दिल्या. नंतर तो १६५६-५८ या काळात ईजिप्तला गेला. तेथे त्याला प्लेगच्या आजाराने पछाडले, कैरोत एक वर्ष राहून तो भारतात सुरत येथे १६५८ मध्ये आला. त्यानंतर भारतात तो जवळजवळ बारा वर्षे होता.
बर्निअर भारतात आला त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर शाहजहान होता व तेव्हा त्याचे वय ७० होते. बर्निअरने आपल्या लेखनात शाहजहान हा तैमुर घराण्याची १० वी पिढी असल्याचे नमूद करतो. शाहजहानच्या मुलांत दिल्लीच्या तख्तासंबंधी संघर्ष सुरू झालेला होता. बर्निअर व दारा शुकोव्ह यांची गाठ अहमदाबादजवळ पडली आणि दाराने त्याला आपला वैद्य म्हणून येण्याचा आग्रह केला, पण औरंगजेबाच्या सैन्याचा पाठलाग चुकविण्यासाठी दाराला सिंधकडे जावे लागले. दरम्यान औरंगजेब व दारा यांच्यात अजमेरजवळील देवराई येथे युद्ध झाले (१६५९), दाराला पकडण्यात येऊन त्याचा वध केल्याचे बर्निअर लिहून ठेवतो. पुढे बर्निअर औरंगजेबाच्या दरबारात सुमारे आठ वर्षे राजवैद्य म्हणून राहिला. औरंगजेबाबद्दल तो लिहितो की, हा अतिशय धूर्त आणि कपटी असून आपल्या मनातल्या गोष्टी तो उघडपणे कधी बोलत नाही. पुढे तो शाहजहानच्या मुलींच्या खासगी जीवनाबद्दलही लिहितो. या काळात ताव्हेर्न्ये व शार्दिन या दोन फ्रेंच प्रवाशांशी त्याचा परिचय झाला. १६६६ मध्ये ताव्हेर्न्येबरोबर त्याने बंगालचा प्रवास केला. राजदरबारच्या कामात व रीतीरिवाजात तो तरबेज होता. भारतातील वास्तव्यात त्याने दिल्ली, आग्रा, काश्मीर, बंगाल, अलाहाबाद, लाहोर, मच्छलीपटनम्, गोवळकोंडा इ. स्थळांना भेटी दिल्या. सुरतहून तो १६६८ मध्ये मायदेशी परतण्यासाठी शीराझ (इराण) येथे गेला व पुढे मार्सेहून पॅरिसला पोहोचला.
शीराझ येथून १६६८ मध्ये चॅप्लीन यांना पॅरिस येथे पाठवलेल्या पत्रातून त्याने दिल्लीमध्ये असताना यमुनेच्या तीरावरील घरातून सूर्यग्रहण पाहिल्याचे कळविले आहे. याच सूर्यग्रहणाच्या वेळी यमुना नदीच्या दोन्ही तीरांवर तेथील सामान्य जनता व धनीक कशा प्रकारे पूजाविधी करतात, कसे कपडे घालतात याचे वर्णनसुद्धा केले आहे. या वेळी यमुनेच्या तीरावर दीड लाख माणसे जमल्याचे त्याने नमूद केले आहे. त्याच्या लेखनात विजापूरचा उल्लेख ‘विसापूर’ म्हणून, तर गोवळकोंड्याचा उल्लेख ‘गोलकोंडा’ म्हणून केला आहे. छ. शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘सेवा-गी’ किंवा ‘लॉर्ड सेवा’ असा केला असून सावधगिरी बाळगणारा, दूरदृष्टी असणारा आणि पूर्णपणे वैयक्तिक सुरक्षा घेणारा असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या महसुलाचे आकडे त्याने लिहून ठेवलेले दिसतात. मोगली फौज, फौजेतील लोकांचे पगार व मोगली तोफखाना यांचे पण विस्तृत वर्णन त्याने केले आहे. पायदळातील सैनिकाला १० रु. ते २० रु. महिना पगार मिळतो, तर तोफखान्यातील एतद्देशीय सैनिकांपेक्षा परकीय म्हणजे इंग्लिश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन मंडळींना जास्त पगार मिळत असल्याचे त्याने लिहिले आहे. जड आणि हलक्या अशा दोन प्रकारच्या तोफा वापरात होत्या. हलक्या तोफा प्राण्यांच्या पाठीवर ठेवल्या जात असत. उन्हाळ्यात लाहोरहून काश्मीरला जाताना फौजेत ७० पितळी तोफा होत्या, हे ही त्याने नमूद केले आहे.
परतीच्या प्रवासात त्याने आपल्या भारतातील प्रवासवर्णनाची सर्व तयारी केली आणि फ्रान्सच्या राजाकडे छपाईची परवानगी मागितली. २५ एप्रिल १६७० रोजी त्याला प्रवासवर्णन छापण्याची परवानगी मिळाली. त्याचवर्षी त्याने १३ ऑगस्ट रोजी ते प्रकाशित केले. पुढे तो पॅरिस येथेच स्थायिक झाला. मध्यंतरी १६८५ मध्ये त्याने इंग्लंडची एक सफर केली होती.
पॅरिस येथे मस्तिष्कघाताने त्याचे निधन झाले.
बर्निअरच्या प्रवासवर्णनावरून तसेच त्याने लिहिलेल्या पत्रांवरून शाहजहानची अखेरची वर्षे व औरंगजेबाची प्रारंभीची कारकिर्द यांविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळते. त्यामुळे औरंगजेबाच्या प्रारंभीच्या कारस्थानावर बराच प्रकाश पडतो. छ. शिवाजी महाराजांची पहिली सुरत-लूट, शायिस्तेखानावरील हल्ला व छ. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेसंबंधी विस्तृत वर्णन त्याच्या लेखनात आढळते.
बर्निअरची लेखनशैली साधी पण प्रभावी होती. त्याच्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर ट्रॅव्हल्स इन द मोगल एम्पायर या नावाने १८९१ मध्ये प्रसिद्ध झाले. यांशिवाय तत्कालीन विचारवंतांत तो मुक्त तत्त्ववेत्ता म्हणून प्रसिद्ध होता. त्याने तत्त्वज्ञानावर दोन ग्रंथ लिहिले आहेत. मोगल इतिहासावर प्रकाश टाकणारे एक महत्त्वाचे ऐतिहासिक साधन म्हणून त्याच्या प्रवासवर्णनाचे महत्त्व आहे.
संदर्भ :
- Bernier, Francois; Trans, Constable, Archibald, The Travels in the Mogul Empire, A. D. 1656-1668, New Delhi, 1968.
- गुप्त, गंगा प्रसाद, संपा. बर्नियर की भारत यात्रा, नवी दिल्ली, १९९७.
समीक्षक : महेश मंगेश तेंडुलकर