लामा तारानाथ : (१५७५ – १६३४). तिबेटीयन प्रवासी व धर्माभ्यासक. त्याचा जन्म १५७५ मध्ये तिबेटमधील ‘करक’ येथे तिबेटी भाषांतरकार रा-लोटस्वा-दोर्जे-ड्रॅक याच्या वंशांत झाला. याचे तिबेटी नाव ‘कुन-डगा-स्निंग-पो’ असून त्याला सर्वसामान्यपणे ‘लामा तारानाथ’ या नावाने ओळखले जाते. तो तिबेटी बौद्ध पंथातील जोनांग (Jonang) परंपरेतील लामा होता. त्याने वयाच्या ३३ व्या वर्षी रग्य-गाल-चोज-बायून म्हणजेच द हिस्ट्री ऑफ बुद्धिझम इन इंडिया हा ग्रंथ लिहिला (१६०८). त्याचा लेखनातून प्रामुख्याने तत्कालीन बौद्ध धर्माच्या विकासाबद्दल माहिती मिळते. त्याचे संस्कृत व भारतातील इतर काही भाषांवर प्रभुत्व होते. त्याने त्याच्या काळातील विद्वानांच्या म्हणजे क्षमेंद्रभद्र, इंद्रदत्त व भातंगती यांचे लेखन स्वतः वाचून आत्मसात केले होते व त्यांच्या ग्रंथांचे तिबेटी भाषेत भाषांतर केलेले होते.
तारानाथ लिहितो की, ‘मी चार वर्षांचा असताना आदरणीय तेनझिंग नवांग यांचे एका भारतीय साधूबरोबरचे बोलणे ऐकले होते, परंतु तेव्हा मला त्याचा अर्थ समजला नव्हता’. पण तो पुढे म्हणतो की, ‘माझ्या पूर्वजन्मामुळे मला भारताच्या भूगोलाबद्दल व भारतातील विविध भाषांबद्दल ज्ञान प्राप्त झालेले आहे’. तारानाथने आपल्या भारतीय गुरूचे नाव बुद्ध गुप्तनाथ असल्याचे नमूद केले आहे.
वयाच्या सोळाव्या वर्षी तारानाथला त्याच्या गुरूने लद्दाखमधील ‘झंस्कार’ व हिमाचल प्रदेशातील ‘गार-शा’ येथे जाऊन पुढील चार वर्षांत ज्ञान संपादून गुणवत्ता मिळवण्यासाठी जाण्याचा आदेश दिला. परंतु तो २० वर्षांचा असताना त्याच्या नाकातून रक्त वाहू लागल्यामुळे तो ३ महिने आजारी पडला होता. त्या वेळी त्याला स्वप्नात ‘जवलनाथ’ नावाचा भारतीय योगी दिसला, त्याने त्याला ‘तारानाथ’ हे भारतीय नाव दिले. काही अभ्यासकांच्या मते, भारतातील व्यक्तींची नावे, भूगोल, विविध भौगोलिक स्थाने यांबद्दल त्याचे लेखनातून दिसणारे ज्ञान पुरसे नसल्याने तो भारतात आलेला नसावा. त्याचे लेखन जरी सतराव्या शतकातील असले, तरी त्याने इ. स. पू. पाचव्या शतकातील भारतीय राज्यकर्त्यांच्या कालखंडातील बौद्ध धर्मासंबंधी घटना आपल्या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत. तसेच भारतभर बौद्ध स्तूप अथवा बौद्ध धर्मप्रसार केंद्रे कुठे अस्तित्वात होती, यांबद्दलची माहिती त्याच्या लेखनातून मिळते.
तारानाथच्या लेखनात इ. स. पू. पाचव्या शतकातील अजातशत्रू व सम्राट अशोक (इ. स. पू. ३०३—२३२) यांसारख्या अनेक राजांच्या कालखंडातील बौद्ध धर्माबद्दल विस्तृत माहिती मिळते. तसेच मौर्य राजा श्रीचंद्र याच्याबद्दलही तो माहिती देतो. तो चंद्रवंशातील मौर्य राजांची वंशावळ देतो. या वंशावळीत शेवटी चंद्र नाव असलेल्या सात राजांची नावे देतो. यानंतर चंद्रगुप्त, बिंदुसार व भाचा श्रीचंद्र, धर्म आणि इतर नऊ इतर राजांची नावे येतात. तो म्हणतो, ‘या नऊ राजांपैकी बिंदुसार सोडता इतर सर्व राजांच्या नावाच्या शेवटी चंद्र येतो’. याशिवाय त्याने आपल्या ग्रंथात वर्णन केलेल्या राज्यकर्त्यांच्या काळात पूर्वेपासून पश्चिमेस कोणते राजे राज्य करत होते, याबद्दल लिहून ठेवले आहे.
तारानाथच्या लेखनानुसार काश्मीरमधील काही ब्राह्मण पंडितांनी सरोंग-बसंग-गांपो यांच्याबरोबर शारदा व देवनागरी लिपीवर आधारित ३१ अक्षरे असलेली लिपी तिबेटला पाठवली. तो म्हणतो की, ‘काश्मीरमधे ७-८ व्या शतकात तेथील राजाच्या कारकिर्दीत काश्मिरी कला उदयास आली व तिची भरभराट झाली. या राजाने काश्मीरमधे चित्रकला व मूर्तिकला यांचे ज्ञान देण्यासाठी शिक्षणसंस्था सुरू केल्या’. पुढे तो ओरिसात (ओडिशा) सोळाव्या शतकातील ओरिसाचा राजा मुकुंददेवराय याच्या कारकिर्दीत बौद्ध धर्म अस्तित्वात असल्याचे लिहितो. तारानाथच्या लेखनाचा एकंदर विचार करता, तो मध्य भारताच्या दक्षिणेस गेला नसावा, असे दिसते. त्याच्या लेखनात काश्मीर ते मध्य भारत यांमधील अनेक राजांबद्दल रंजक माहिती वाचायला मिळते.
तारानाथ म्हणतो, ‘सर्व महायानपंथी योगाचार्याचे पालन करतात, कारण ते सर्व मूलतः अठरा पंथातून नियुक्त केले गेले असल्याने ते त्यांच्या अनुयायांमध्ये राहातात.’ पुढे तो मगधमधील शिवाची भक्ती करणाऱ्या ब्राह्मणांबद्दल म्हणतो की, ‘ते दोघेही तीर्थिका तसेच बौद्धांच्या तत्त्वज्ञानामध्ये पारंगत होते.’ हे ब्राह्मण कैलास पर्वतावर गेले, त्यांना कैलासावर शंकरपार्वती भेटले, शंकरांनी त्या ब्राह्मणांना ‘केवळ बुद्धाचा मार्ग मोक्षप्राप्तीकडे नेतो, जो इतर कोठेही सापडत नाही’, अशा रंजक कथाही तो लिहून ठेवतो. त्याच्या लेखनातून आपल्याला भारतातील बौद्ध धर्माच्या अधोगतीचे आणि घसरणीला कारणीभूत ठरलेल्या घटकांचे स्पष्ट संकेत मिळतात. तसेच नंतरच्या काळात भारतातील महायान बौद्ध धर्म ब्राह्मण धर्मात कसा विलीन होत गेला, याबद्दल माहिती मिळते.
तारानाथच्या लेखनामध्ये त्या काळात भारताचा बाहेरील जगाशी संबंध कसा होता, याची माहिती मिळते. भारत आणि यूरोपमधे चेटूक करणे, हा सामान्य प्रकार होता, असे तो लिहितो. ओडीविसा म्हणजे ओडिशा, ओतानतापुरी म्हणजे ओदांतपुरी, उद्याना म्हणजे आजचे काबूल आणि स्वात खोरे येथे त्या काळात सूर्यघड्याळ वापरले जात होते. त्या काळात स्त्रिया मद्य विक्री करत असत आणि आंतरजातीय विवाह देखील होत असत, असे तो नमूद करतो. मारू (राजपुताना) येथील राजाकडे ताजिकी (पर्शियन) सैनिक असत, अशा अनेक गोष्टींची माहिती तो देतो. परंतु तारानाथ हा प्रवासी म्हणून नेमका कोणकोणत्या ठिकाणी गेला होता, याबाबतची कोणतीही माहिती मिळत नाही.
तारानाथ मंगोलियाला गेला (१६१४) व तेथे त्याने अनेक बौद्ध मठांची स्थापना केली.
ल्हासा (तिबेट) येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Chattopadhyaya, Debiprasad, Taranatha’s History of Buddhism in India, Delhi, 1990.
- Datta, Bhupendranath, Mystic Tales of Lama Taranatha A Religio-Sociological History of Mahayana Buddhism, Calcutta, 1944.
- Mishra, S. C. Obscure Mauryan Kings : Fresh Perspective (From the History of Buddhism in India) By Taranath, Proceedings of the Indian History Congress, Vol. 73, pp. 35-45, 2012.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर