बीरूनी, अल्- : (४ सप्टेंबर ९७३ – ? डिसेंबर १०४८ ?) मध्य आशियातील मध्ययुगीन काळातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार, तत्त्वचिंतक व प्रवासी. त्याचे संपूर्ण नाव अबू अल्-रैहान मुहंमद इब्न अहमद. त्याचा जन्म निश्चितपणे कोणत्या देशात झाला, याबद्दल विद्वानांत मतैक्य नाही; तथापि त्याचा जन्म उझबेकिस्तानातील ख्वारिझम-कास (आधुनिक खीव्हा-रशिया) जवळील बीरून नावाच्या खेड्यात झाला, असे आता बहुतेक विद्वान मानतात. या खेड्यावरूनच त्यास बीरूनी हे नाव प्राप्त झाले असावे. त्याच्या वडिलांचे नाव अहमद अल्-बीरूनी होते.
उमय्या खिलाफतीच्या अखेरच्या दिवसांत किंवा तिच्या अस्तानंतर त्याचे नातेवाईक इराणमध्ये स्थायिक झाले. लहानपणी अबू नस्र मन्सूर याने त्यास गणित व सृष्टीचे निरीक्षण कसे करावे, याचे शिक्षण दिले. प्राथमिक शिक्षणानंतर खीव्हावरील हल्ल्यात त्यास शिक्षण सोडावे लागले (९९५). तो रे येथे गेला. त्याला ज्योतिषशास्त्रात विशेष रुची होती. तेथील प्रसिद्ध ज्योतिषी अल् खुजांदी याच्याशी त्याचा परिचय झाला. ते दोघे निसर्गातील विविध तारे व ग्रह यांचे निरीक्षण करून तत्संबंधी चर्चा करीत आणि अनुमाने मांडीत. तो पुन्हा खीव्हाला गेला. तेथे त्याने चंद्रग्रहण पाहून काही निरीक्षणात्मक माहिती लिहून ठेवली. तो भौतिकशास्त्र, गणित, ज्योतिषविद्या, नैसर्गिक विज्ञान या विषयांत पारंगत होता. त्याला मध्य आशिया व भारतातील अनेक भाषांची जाण असल्याचे त्याच्या लेखनावरून प्रत्ययास येते. त्याला अरबी, फार्सी, संस्कृत, हिब्रू, ग्रीक तसेच इंग्रजी या भाषा अवगत होत्या. त्याने विज्ञानाच्या जवळपास सर्व क्षेत्रांचा अभ्यास केला होता. या त्याच्या अभ्यासामुळे बूखारा येथील सामानिड वंशातील राजा इब्ननूह (दुसरा) मन्सूर (कार. ९९७-९९९) याच्या दरबारात त्यास नोकरी मिळाली. तेथे काही वर्षे राहून गीलान येथील इस्पहाबादच्या दरबारात तो गेला असावा. या सुमारास त्याला काही यूरोपीय राष्ट्रांची ऐतिहासिक जंत्री व माहिती मिळाली. त्यामुळे कालगणना करण्याची संधी त्यास लाभली. त्यावरील पुस्तक त्याने इ. स. १००० मध्ये प्रसिद्ध करून ते गुर्गानच्या झियारिद या राजपुत्रास अर्पण केले. या त्याच्या पुस्तकामुळेच पुढे इराणी इतिवृत्ते तयार करणे सुलभ झाले.
अल् बीरूनी पुढे गुर्गान येथे गेला. तेथे त्याला विद्वानांत स्थान मिळाले. राजाचा खास प्रवक्ता म्हणून त्याची नियुक्ती झाली. या सुमारास शाह व त्याचा मेहुणा गझनीचा सुलतान मुहम्मद यांत वितुष्ट आले आणि मुहम्मदने सर्व सत्ता आपल्या हाती घेतली (१०१७). तत्पूर्वी तो काही वर्षे खरेझमला जाऊन राहिला होता. नंतर मुहम्मदने त्यास गझनीस नेले (१०१७). पुढे त्यास काबूललाही स्वारीबरोबर पाठविले. मुहम्मद गझनीने भारतावर १०२२ व १०२६ साली दोन स्वाऱ्या केल्या. पहिल्या स्वारीच्या वेळी अल् बीरूनी त्याच्याबरोबर भारतात आला. त्याचे भारतात किती वर्षे वास्तव्य होते, याविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही; परंतु ज्या अर्थी त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास करून श्रुतिस्मृतिपुराणे आदी ग्रंथांचे वाचन केले आणि विविध प्रदेशांत प्रवास करून माहिती जमविली, त्या अर्थी तो सु. ८-१० वर्षे तरी भारतात असावा, असे काही इतिहासकार मानतात.
तहकीक मा लिल-हिंद वा तारीख अल्-हिंद (१०३०) हा त्याचा भारतीयांसंबंधीचा एकमेव ग्रंथ. त्यात अकराव्या शतकातील भारतीय जीवनासंबंधीची इत्थंभूत माहिती मिळते. भारतीय चालीरीती, जातिसंस्था, भाषा, तत्त्वज्ञान, मूर्तिकला यांची या पुस्तकात माहिती दिली असून अंधश्रद्धा, सण, उत्सव यांबरोबरच त्याने भारताची भौगोलिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक स्थिती यांचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, ’हिंदू हे स्वाभिमानी असून परकीयांना कमी लेखतात. सुशिक्षित हिंदू एक परमेश्वर या तत्त्वांवर विश्वास ठेवतात; परंतु एकूण सर्व समाज मूर्तिपूजेवर विश्वास ठेवतो. देशाची फार मोठी संपत्ती मंदिरांत आहे. बालविवाह व सतीची चाल सर्वत्र रूढ आहे, मात्र पुनर्विवाहास बंदी आहे.’ त्याने भारतीयांची जिज्ञासू वृत्ती, ज्ञान, वैज्ञानिक प्रगल्भता यांची प्रशंसा केली आहे. भारताबद्दल त्याला वाटणारी आत्मीयता, कुतूहल त्याच्या लेखनातून प्रतीत होते. पेशावर येथील कनिष्काने बांधलेला स्तूप, पूर्वेकडील उदनपूर येथे प्रचलित असलेली भैचुकी लिपी यांचे त्याने उल्लेख केले आहेत. तो म्हणतो, दक्षिण भारतीय लोक ताडपत्राचा तर मध्य व उत्तर भारतीय लोक भूर्जपत्राचा उपयोग लेखनासाठी करतात; जगातल्या कोणत्याही देशातील लोकांना हजारपुढील आकडे येत नाहीत. ते फक्त भारतीयांनाच येतात. भारतातील विचित्र रितीरिवाजांबद्दलही त्याने लेखन केले आहे. उदा., येथील लोक शरीरावरील कोणतेही केस कापत नाहीत. ते आपली नखे खूप वाढवितात वगैरे. भारतातील आयुर्वेदाबद्दल त्याने कौतुकोद्गार काढले आहेत. तो म्हणतो, येथील लोक ज्यांची जिवंत राहण्याची बिलकुल शाश्वती नाही, अशा लोकांना अनेक वनस्पतींचा रस एकत्र करून देतात व त्यांना आयुष्यवान बनवितात.
अल् बीरूनीला मुहम्मदाच्या भारतावरील स्वाऱ्या आवडल्या नाहीत, म्हणून त्याने कृत्यांवर टीका केली आहे. त्याने पतंजली, सांख्य वगैरेंवरचे संस्कृत ग्रंथ अरबीमध्ये भाषांतरित केले. त्यांपैकी तर्जमत किताब पतंजली फिल खलास मिन अल्-इर्तिबाक हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय त्याने ब्रह्मगुप्त, बलभद्र, वराहमिहिर, पहिला आर्यभट्ट, वित्तेश्वर, विजयनंदिनी, चरक, हसरीभट्ट इत्यादींच्या ग्रंथांचा अभ्यास केला. भारतीय पुराणे वाचणारा अल् बीरूनी हा पहिला मुस्लीम प्रवासी होता. त्याची ग्रंथसंपदा फार मोठी आहे. बीरूनीने सु. १५० पुस्तके लिहिली अशी वदंता आहे. त्यांपैकी फक्त २७ ग्रंथच आतापर्यंत उपलब्ध झाले आहेत. मुहम्मद गझनीच्या मृत्यूनंतर गादीवर आलेल्या मसूदने त्यास आश्रय दिला. कानून अल्-मसुदी हा ग्रंथ त्याने सुलतान मसूद यास अर्पण केला. यांशिवाय त्याचे अल्-जमाहिर फी मारिफत अल्-जवाहिर, अल्-तफ्हीम लि-अवाअल सिनाअत अल्-तनजीम, अल्-आसार अल्-बाकिया अन कुरून अल् खालिया, तहदीद निहायात अल्-अमाकिन लि तस्हीह मसाफात अल्-मसाकिन, अल्-सैदला फिल-तिब हे ग्रंथही लोकप्रिय झाले. यांशिवाय त्याचे विजयानन्दिनच्या करणतिलक याचे अरबी भाषांतरही प्रसिद्ध आहे. यांतून कालगणना,अक्षांशरेखांश आणि इतर भौगिलिक माहिती, तसेच गणितशास्त्र, भूमिती, त्रिकोणमिती, ज्योतिषशास्त्र, मानवी वैद्यक वगैरे विषयांची माहिती मिळते. त्याच्या बहुतेक ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर झाले. एडूआर्ट झाखौने तारीख अल्-हिंद याचे भाषांतर १८७८ मध्ये केले.
जॉर्ज सार्तोन अल् बीरूनीस मध्ययुगीन काळातील एक अनन्यसाधारण शास्त्रज्ञ मानतो. गॅलिलीओच्या पूर्वी सु. सहाशे वर्षे अल् बीरूनीने पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते, हे दाखवून दिले असून त्याने प्रकाश व ध्वनी यांच्या सापेक्ष गतीचा शोध लावला आहे. यांशिवाय सु. १८ मूल्यवान खड्यांच्या विशिष्ट घनतेसंबंधी त्याने निश्चित स्वरूपाची अशी माहिती लिहून ठेवली आहे; तीही शास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाची आहे.
तो गझनी येथे मरण पावला.
अल् बीरूनीची एक हजारावी जयंती १९७३ मध्ये जगभर साजरी झाली. त्याचवर्षी इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ ओरिएंटॅलिस्ट या जगन्मान्य संस्थेने अल् बीरूनीचे साहित्य प्रकाशित केले आणि चर्चासत्रे, व्याख्याने इ. कार्यक्रम वर्षभर आयोजित केले.
संदर्भ :
- Luniya, B. N. Some Historians of Medieval India, Agra. 1969.
- Mishra, J. S. Journal of Social Science Faculty : The Treatment of History in Tahaqiq-ma-lil Hind, Bhubaneshwar, 1978.
- Myers, E. A. Arabic Thought and the Western World in the Golden Age of Islam, London, 1964.
- Sachau, Edward, Alberuni’s India, London, 1910.
- अब्बासी, नूर नबी, अल्-बीरूनी, नॅशनल बुक ट्रस्ट, १९१४.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.