फ्रेंच प्रवासी, इतिहासकार आणि कॅथलिक धर्मगुरू. पूर्ण नाव ॲबेडॉमीनुस बार्थेलिमे कॅरे दी चेंबॉन. त्याचा जन्म फ्रान्समधील चेंबॉन येथे झाला. त्याचे प्रारंभिक जीवन आणि मृत्यू यांबद्दल तपशील मिळत नाहीत. चौदाव्या लुईच्या दरबारात तो मोठ्या पदावर काम करत होता. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात तो भारतात आला. त्याने भारताला दोन वेळा भेट दिल्याचे दिसून येते.

ॲबे कॅरे फ्रान्समधून मार्च १६६६ मध्ये प्रवासाला निघाला. तेथून तो मादागास्कर येथे आला व तेथे ऑक्टोबर १६६७ पर्यंत मुक्काम करून सुरतला पोहोचला (१६६८). येथून तो एका फ्रेंच जहाजात बसून दक्षिणेकडे प्रवास करत मराठ्यांच्या मुलखातून मलबारच्या किनाऱ्याकडे गेला आणि सुरतमार्गे फ्रान्सला परतला. या प्रवासातील दैनंदिनीत त्याने छ. शिवाजी महाराजांचा शाहिस्तेखानावरील छापा, जयसिंगाची दख्खन मोहीम, महाराजांची आग्र्याहून सुटका, सुरतेची दुसरी लूट यांबद्दल लिहून ठेवलेले आहे; परंतु या घटना त्याने स्वतः बघितल्या नसल्यामुळे या ऐकीव घटना त्याने विस्तृत लिहिलेल्या आहेत.

ॲबे कॅरे पॅरिसमधून निघून मार्सेयला आला (१६७२). तेथे काही इंग्रज व फ्रेंच जहाजे पूर्वेकडे निघण्याच्या तयारीत होती; परंतु वारा अनुकूल नसल्याने ती प्रवासास निघण्यास उशीर होणार असल्याने तो जमिनीवरून प्रवासास निघाला (१० एप्रिल १६७२). प्रवास करत तो इटलीतील पिसा मार्गे सध्याच्या लिवोर्नो येथे पोहोचला. येथून इंग्लिश जहाजात बसून तो ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावर उतरला. येथून तो सध्याच्या सिरियातील आलेप्पो शहरात पोहोचला (१ जून १६७२). येथून बगदादच्या प्रवासात त्याला वाटेत दरोडेखोरांनी लुटले, अंगावरचे कपडे, महत्त्वाची काही कागदपत्रे व घोडा एवढे वाचवून तो सहा दिवसांचा प्रवास करत बगदाद येथे पोहोचला. बगदादमध्ये त्याने एका कॅपुचिन धर्मगुरूसोबत काही दिवस काढले. येथे त्याला एका अरब माणसाने मदत केली. तेथून पुढे तो बसरा येथे पोहोचला. वाटेत त्याने फ्रेंच वैद्य म्हणून काही अरब स्त्रियांवर औषधोपचार केले. नंतर मस्कत येथून गोव्याला जाणाऱ्या एका पोर्तुगीज जहाजातून प्रवास करत तो दीव, घोघा, भरूच मार्गे सुरतला पोहोचला (२ नोव्हेंबर १६७२). मार्सेय ते सुरत या प्रवासास त्याला २०६ दिवस लागले, असे त्याने नमूद केले आहे.

सुरतच्या फ्रेंच वखारीत काही दिवस काढून त्याने आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केली व तो दमण मार्गे जमिनीवरून प्रवास करत वसईला पोहोचला. येथून घोडबंदर, ठाणे मार्गे तो मुंबईला आला. मुंबईचा गव्हर्नर गेराल्ड आँगियर याची भेट घेऊन तो चौल येथून अष्टमी, गोरेगाव, दासगाव, खेड, चिपळूणमार्गे राजापूरच्या वखारीत पोहोचला. खेडहून चिपळूणकडे जाताना त्याने अनेक स्त्री-पुरुष आपल्या पाठीवर तांदूळ व इतर धान्य घेऊन छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्याकडे जाताना पाहिले. चिपळूणला त्याने मराठ्यांचे सैन्य दाभोळ लुटून सिद्दीवरील मोहिमेसाठी जमा झाल्याचे बघितले. ॲबे कॅरेने संगमेश्वर जवळच्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याचे लिहून ठेवले आहे. येथून तो खारेपाटण, डिचोलीमार्गे गोव्यात पोचला. येथील वास्तव्यात त्याने काही फ्रेंच माणसांना गोव्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण तेथील गव्हर्नरच्या दक्षतेमुळे तो फसला. पुढे गोव्यातून तो रामघाटामार्गे हुक्केरीला आला आणि आजारी पडला. येथून रायबाग, अथणीमार्गे तो विजापूरला पोहोचला. विजापूरचा उल्लेख तो विसापूर म्हणून करतो. विजापुरात इंग्रजी डॉक्टर नसल्यामुळे त्याला तेथे सात आठवडे राहावे लागले. रायबाग येथील सरदार उच्चकुलीन हिंदू असल्याचे त्याने लिहून ठेवले आहे. यानंतर तो गोवळकोंड्याला जायला निघाला. गोवळकोंड्याबद्दल तो लिहितो की, ‘येथील रस्ते माणसांनी फुललेले आहेत. सर्व प्रकारच्या बाजारामुळे हे शहर खूप श्रीमंत आहे. सर्वत्र सजवलेले हत्ती, घोडे असून येथे सर्व बाजूंनी येणाऱ्या सैन्याला व सरदारांना सेंट थॉमसवरील हल्ल्यासंबंधी सूचना देण्यात येत होत्या. तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर आम्हाला आम्ही फ्रेंच असल्यामुळे येथे जास्त काळ राहू नका, असे सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच दोन फ्रेंच माणसांना येथील लोकांनी ठार मारले होते.ʼ येथून पंधरा दिवसांचा प्रवास करून तो विजापूरला आला व नंतर गोव्याकडे निघाला.

ॲबे कॅरेच्या लेखनात छ. शिवाजी महाराजांच्या लष्करी हालचालींबद्दल समकालीन माहिती मिळते. तो म्हणतो,  ‘शिवाजी महाराजांकडे माहितीची कमतरता नव्हती. त्यांचे भारतभरात पसरलेले हेर त्यांना सर्व प्रकारची माहिती पुरवत असत. त्यामुळे अलेक्झांडर प्रमाणेच कमी वेळात ते त्यांच्या योजना आखत. त्यांच्या मनातील योजना कोणालाही समजत नसत.’

ॲबे कॅरेच्या हस्तलिखिताची दैनंदिनी जॉन वॉकर याला १८२० मध्ये सापडली. ती त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडन कार्यालयाच्या संचालकांकडे सुपुर्द केली. छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, भारतातील व भारताबाहेरील भौगोलिक स्थिती, निसर्ग, लोकांच्या सवयी यांविषयीची सखोल माहिती त्याच्या वृत्तांतातून समजते; तथापि ऐतिहासिक घटनांचा कालखंड देताना ॲबे कॅरेकडून काही चुका झाल्या आहेत.

संदर्भ :

  • Burn, Sir Richard; Ed., Fawcett, Sir Charles, ‘The Travels of the Abbé Carré in India and the Near East, 1672 to 1674ʼ, Review by  S. T. S., The Geographical Journal, Vol. 113, pp. 109-111, 1949.

                                                                                                                                                                               समीक्षक :  प्रमोद जोगळेकर