नाथ संप्रदायातील प्रसिद्ध नऊ नाथ-योगी. नवनाथांच्या सर्व सूचींमध्ये एकवाक्यता नाही. नवनाथ विषयावरील ग्रंथांमध्ये नऊ नावे सर्वच ठिकाणी एकसारखी येत नाहीत. तेव्हा अमुकच नऊ नाथ आद्य नाथसिद्धांपैकी प्रमुख होते, असे दिसून येत नाही. निरनिराळ्या परंपरांत स्थानिक महत्त्वानुसार व कमी-जास्त आदरभावनेनुसार या गणना झाल्या असाव्यात, असे रा. चिं. ढेरे यांचे मत आहे. असे असले तरी, नवनाथांच्या विभिन्न सूचींमधील काही नाथ-योग्यांची नावे ८४ सिद्धांच्या सूचीत मात्र आढळून येतात. या ८४ सिद्धांनाही नाथ संप्रदायात विशेष स्थान आहे. या संप्रदायात त्यांना देवत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. सिद्धांनी योगविद्या, रसविद्या तसेच तंत्रविद्येच्या साहाय्याने सिद्धी प्राप्त केल्याची धारणा नाथ संप्रदायात आहे. अशाच प्रकारची धारणा नवनाथांविषयीआहे. त्यामुळे नवनाथांना पुढे नाथ संप्रदायात आदराचे स्थान प्राप्त झाले असावे.
नवनाथांविषयी ऐतिहासिक व मूर्तिशास्त्रीय पुरावे तपासल्यास अनेक नवीन गोष्टी माहीत पडतात. नवनाथांची संकल्पना नाथ-संप्रदायाशी संबंधित आद्य ग्रंथांत पाहायला मिळत नाही. त्यांच्याविषयीचा सर्वप्रथम ज्ञात उल्लेख सु. तेराव्या शतकातील महानुभाव पंथाच्या दामोदर पंडित लिखित अन्वयस्थळ या ग्रंथात ‘नवनाथ कहे सो नाथपंथी’ असा आलेला आढळून येतो.
हजारीप्रसाद द्विवेदी, रा. चिं. ढेरे आणि अन्य विद्वानांनी नवनाथांच्या बऱ्याच सूची त्यांच्या ग्रंथांत दिलेल्या आहेत. या सूची नाथ-संप्रदायाशी संबंधित अनेक ग्रंथांमधून घेतलेल्या आहेत.
नवनाथचरित्रमु, गोरक्षसिद्धांतपद्धती, गोरक्षसिद्धांतसंग्रह, सुधाकरचंद्रिका, महार्णवतंत्र, नवनाथभक्तिसार, कदलीमंजुनाथमाहात्म्य, योगसंप्रदायाविष्कृती, शिवदिनमठसंग्रह सूची, पंचीकृतविवेक या ग्रंथांत नवनाथांची नावे दिलेली आहेत. राजाराम प्रसादीने भक्तमंजरीमालेत जे नवनाथ चरित्र गायले आहे, त्यात ज्ञानेश्वरोत्तर परंपरेतील नवनाथांची नावे आहेत. त्यामध्ये सत्यामलनाथ, गैबीनाथ, गुप्तनाथ, उद्बोधनाथ, केसरीनाथ, शिवदिननाथ, नरहरीनाथ, लक्ष्मणनाथ व मल्हारनाथ यांचा समावेश आहे. या उपलब्ध नवनाथांच्या सूचींमध्ये बरीच विविधता आढळून येते. यांतील सर्व नावे एक सारखी नसून प्रदेशभिन्नत्वे त्यामध्ये विविधताही पाहायला मिळते. काही स्थानिक प्रसिद्ध नाथ-योगींना नवनाथांमध्ये स्थान दिल्याचे दिसून येते; तथापि मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, जालंधरनाथ व कानिफनाथ यांची नावे प्रामुख्याने नवनाथांच्या सूचीत पाहायला मिळतात.
नवनाथांविषयी सर्वांत जुनी ज्ञात उपलब्ध सूची नवनाथचरित्रमु या १४-१५ व्या शतकातील तेलुगू ग्रंथात दिलेली आहे. या ग्रंथात नवनाथांच्या नामावलीत शिवनाथ, मीन, सारंगधर, गोरक्ष, मेघनाद, नागार्जुन, सिद्धबुद्धू, विरुपाक्ष आणि कणिका या नाथ-योगींचा समावेश केला आहे.
डेविड गॉर्डन व्हाइट यांच्या मते, नवनाथांचा सर्वप्रथम संदर्भ कुब्जीका माता या ग्रंथात आलेला आहे. या ग्रंथात त्यांना ‘नवचक्रांचे स्वामी’, ‘सर्व सिद्धांचे संस्थापक’, ‘षड् नगरींचे क्षेत्रपाल’ (चक्र), ‘कौलांचे स्वामी व प्रणेते’ असे म्हटले आहे. बंगालमधील सतराव्या शतकातील सूचीमध्ये आदिनाथ, मीननाथ, जालंधरीपा, गोरखनाथ, मयनामती, कान्हपा, गोपीचंद, बाईलभाडाई अशा फक्त आठच नाथांची नावे दिलेली आहेत. सोळाव्या शतकातील, पंजाबमधील नवनाथ परंपरेनुसार, नवनाथांमध्ये शिव, उदे, मत्स्येंद्र, जालंधरीपा, गोरख, अर्जन नाग, निमनाथ/पारसनाथ, भर्तृहरी व काणिपा यांची नावे येतात. महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध सांप्रदायिक श्लोकानुसार गोरक्ष, जालंधर, चरपट, अडबंग, कानिफ, मच्छिंद्र, चौरंगी, रेवण, भर्तृहरी यांची नावे आलेली आहेत. नवनाथ भक्तिसार या सांप्रदायिक मराठी ग्रंथात नवनाथ हे नव-नारायणांचे अवतार मानले आहेत. या प्रमाणे मत्स्येंद्रनाथांना कविनारायण, गोरक्षनाथांना हरिनारायण, जालंधरनाथांना अंतरिक्षनारायण, कानिफनाथांना प्रबुद्धनारायण, चर्पटीनाथांना पिप्पलायन, नागनाथांना अविर्होत्र, भर्तृहरींना द्रुमिलनारायण, रेवणनाथांना चमसनारायण व गहिनीनाथांना करभाजन नारायणाचा अवतार मानले गेले आहे. दिनकरस्वामींनी स्वानुभवदिनकरात नवनाथांचा निर्देश केला आहे. गोरखबाणीत ‘नौ नाथ नै चौरासी सिद्धा’ असा उल्लेख आढळून येतो.
वर्तमान काळात नाथ संप्रदायात जी नवनाथांची सूची प्रचलित आहे, त्यात आदिनाथ, उदयनाथ, संतोषनाथ, गजबली गजकंथरनाथ, अचला अचंभेनाथ, सत्यनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ यांचा समावेश केला जातो.
नवनाथांशी संबंधित काही मूर्ती-शिल्पेही अलीकडच्या काळात उपलब्ध झालेली आहेत. नवनाथांचा एक शिल्पपट गुजरात राज्यातील अरवली जिल्ह्याच्या ‘मोडासा’ येथील वंजारी वावेत पहायला मिळतो. नवनाथांची शिल्पे वावेच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या तुळईवर कोरण्यात आलेली आहेत. ही वाव साधारणतः १२-१३ व्या शतकातील सांगितली जाते. भारतातील नवनाथांच्या ज्ञात शिल्पपटांपैकी वंजारी वावेतील हा शिल्पपट सर्वांत प्राचीन आहे. या वावेत इतर देवी-देवतांच्या शिल्पांसह नाथ-योग्यांची अन्य शिल्पेदेखील कोरण्यात आलेली आहेत.
नवनाथांसंबंधित पंधराव्या शतकातील शिल्पे श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या प्राकारावर दक्षिणी गोपुराच्या उजव्या भिंतीवर, वरच्या बाजूला कोरण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त बंगळुरूजवळील १६-१७व्या शतकातील ‘कलासीपाल्यम’ येथील जलकंठेश्वर मंदिराच्या स्तंभांवर व ‘उलसुर’ येथील सोमेश्वर मंदिराच्या जंघेवर देखील नवनाथांच्या प्रतिमा पाहायला मिळतात.
एकंदरीत सर्व पुराव्यांना लक्षात घेता नवनाथांची संकल्पना साधारणतः १३व्या शतकापूर्वीपासूनच नाथ संप्रदायात प्रचलित असावी, असे निदर्शनास येते. या संप्रदायात ‘नवनाथ’ ही संकल्पना आजही टिकून आहे. ‘नवद्वारां’चे अधिष्ठाते ते नवनाथ, अशा विचारसरणीतून नवनाथकल्पनेचा उगम झाला असावा. पुढे ज्याला जे नाथ आदरणीय वाटले, ते ‘नऊ’ या संख्येत बसवून, त्याने आपली ‘नवनाथसूची’ सिद्ध केली असणार, असे रा.चिं. ढेरे यांचे मत आहे.
शब्दसंकेत: नवनाथ, नवनाथचरित्रमु, उलसुर, जलकंठेश्वर मंदिर, वंजारी वाव.
संदर्भ :
- Sarde, Vijay, Archaeological Investigations of the Natha Sampradaya in Maharashtra (C.12th to 15th century CE), Unpublished thesis submitted to the Deccan College, Pune, 2019.
- White, D. G. The Alchemical Body (Siddha tradition in Medieval India), Chicago, 1996.
- ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
- द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.
समीक्षक : अभिजित दांडेकर