महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. हे ठिकाण उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून ८७ किमी., तर परांडा या तालुक्याच्या ठिकाणापासून १५ किमी. अंतरावर सीना नदीजवळ वसलेले आहे.

काळभैरवनाथ मंदिर, सोनारी.

‘सोनारी’ या नावाविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यानुसार काळभैरवनाथांनी भद्रकाली देवीच्या सहकार्याने सुवर्णासुर नावाच्या राक्षसाचा या ठिकाणी वध केला होता. त्यामुळे या ठिकाणाचे नाव ‘सुवर्णपूर’ पडले. पुढे सुवर्णपूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव ‘सोनारी’ झाल्याची आख्यायिका भैरवनाथ माहात्म्यात दिलेली आहे. संत रामदासस्वामींचे शिष्य कल्याणस्वामींनी भैरवनाथ माहात्म्य लिहिल्याचे म्हटले जाते. कल्याणस्वामींचे वास्तव्य सोनारीपासून ४.२ किमी. वर असणाऱ्या डोमगाव येथे होते. तेथे त्यांची समाधी आहे. अनेक भाविक सोनारी या तीर्थक्षेत्रास ‘सोनारसिद्ध’ या नावानेही ओळखतात.

सोनारी येथे काळभैरवनाथ मंदिराबरोबरच नाथ संप्रदायाचा एक भैरवनाथ मठही आहे. या मठाची स्थापना चौदाव्या शतकात झाली असावी. या मठाला मध्ययुगात अनेक इनामे दिली गेली. काळभैरवनाथ मंदिर व सोनारी या स्थानाशी नाथ संप्रदायाचा असणारा कागदोपत्री संबंध पंधराव्या शतकापर्यंत मागे नेता येतो. याबाबत १७९४ मधील महादजी शिंदे यांचे निवाडापत्र, तसेच १७९५ सालचे सवाई माधवरावांचे आज्ञापत्र उपलब्ध आहे. महादजी शिंदे यांनी दिलेल्या निवाडापत्रात या स्थानाची माहिती भैरवनाथ मठाच्या अनुषंगाने आलेली आहे. सदर निवाडापत्रानुसार येथील भैरवनाथ मठातील चौक, पूजा, पातर इ. पुजाविधींचे अधिकार मिळविण्यासाठी नाथ संप्रदायातील मलिक जोगी (राऊळ) शाखेचे नाथ-योगी व डवरी कानफाटे गोसावी यांच्यामध्ये वाद-विवाद होते. या वाद-विवादांची मालिका १४७५ पासून १७९४ पर्यंत चालू राहिली. यातील दोन्ही पक्षकारांनी यावेळी आपल्याकडील पुराव्यांची जंत्रीच सादर केली होती. प्रारंभी १४७५ साली बहमनी राजवटीत नाथ संप्रदायातील रावळ शाखेतील एका परिवारात अवधूतनाथ व निंबनाथ यांच्यामध्ये पूजाविधीसाठी वरिष्ठ व कनिष्ठ पदावरून वादाची ठिणगी पडली. दोन्ही पक्षकार स्थानीय पंचायतीत गेले. त्यानंतर तेथे समाधान न झाल्याने हा वाद अंबाजोगाई येथील जात पंचायतीत (पंढरी) मिटविण्यात आला.

सुवर्णतीर्थ (बारव) सोनारी.

इ. स. १६६८ मध्ये पुन्हा हा वाद उफाळून आला. यावेळी भैरवनाथ मठाचे व्यवस्थापन रावळ शाखेचे तुकनाथ यांच्याकडे होते. काही कारणास्तव त्यांना मठ व्यवस्थापनेपासून दूर राहावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीत दोन कानफाटे जोगी बरावनाथ व बुधनाथ सोनारीला आले व पूजापाठ विधी करू लागले. त्यांनी क्रमशः बहिराई व मंगलाई यांच्याशी विवाह केला. या दोघींनी स्वतःचे कर्ण संस्कार करवून घेऊन मठातील पूजा विधी करण्यास सुरुवात केली. या दरम्यान तुकनाथ वापस आले व त्यांनी आपल्या वतनाची मागणी केली. न्यायालयात निकाल त्यांच्याकडून लागला. १७५६ साली या संबंधीचे एक थालपत्र पैठणकरांनी राऊळ मलिक जोगींच्या नावे करून दिले होते. पुढे जानोजी जसवंत निंबाळकरांनी यासंबंधी कौल दिला होता. परंतु परिस्थिती अधिकच चिघळत चालल्याने पुण्यातील पेशव्यांना या प्रकरणात भाग घ्यावा लागला. अखेर १७९४ साली राऊळांची बाजू ग्राह्य धरून महादजी शिंदे यांनी निवाडापत्र जारी केले.

महादजी शिंदे यांचे हे निवाडापत्र ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सदर पत्रात ‘पातर’ पूजेचा उल्लेख आलेला आहे. ही पातर पूजा म्हणजेच आज नाथ संप्रदायात प्रचलित असलेली ‘पात्र पूजा’ असावी. नाशिक-त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळ्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्रिंबकेश्वर येथून हजारो नाथ-योगी पात्रदेवतेसोबत कर्नाटकातील कदरीपर्यंत पदयात्रा करतात. यावेळी नाथ संप्रदायाच्या विभिन्न मठातील महंतांची नव्याने नेमणूक केली जाते. ही नेमणूक १२ वर्षे म्हणजेच नाशिक येथील पुढच्या कुंभमेळ्यापर्यंत वैध असते. याच नवनाथ झुंडी यात्रे दरम्यान झुंडीतील काही नाथ-योगी सोनारी येथे येऊन भैरवनाथ मठाच्या नवीन महंताची नेमणूक करतात. ही परंपरा काही शतके जुनी मानली जाते. त्यामुळे महादजी शिंदे याच्या निवाडापत्रावरून नवनाथ झुंडीची परंपरा कमीतकमी पंधराव्या शतकापासून तरी प्रचलित असावी, असे दिसते.

काळभैरवनाथ मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडील एका विशाल प्रवेशद्वारातून जावे लागते. येथे नगारखाना आहे. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर बाजूलाच एक लाकडी सुंदर रथ दिसतो. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक विशाल ‘पुष्करणी’ (बारव) आहे. त्यात उतरण्यासाठी दोन मार्ग असून चारीबाजूंनी देवकोष्ट बनविली आहेत. ही बारव ‘सुवर्णतीर्थ’ या नावानेही ओळखली जाते. याच्या स्थापत्य रचनेनुसार ही बारव १५-१६व्या शतकातील वाटते. बारव पार करून गेल्यानंतर समोर दोन उंच दीपमाळ लागतात. दीपमाळांसमोर काळभैरवनाथाचे मंदिर आहे. मंदिराच्या सभामंडपाच्या तुलनेने अंतराळ, गर्भगृह व मंदिराचे शिखर थोडे जुन्या धाटणीचे दिसते. पूर्वी सभामंडपातील स्तंभ लाकडी होते. गर्भगृहात एका उंचवट्यावर काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांच्या उत्तर मध्ययुगीन दगडी प्रतिमा ठेवल्या आहेत. मूळ प्राचीन प्रतिमा खंडित झाल्याने त्या मंदिरात एका बाजूला ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या चारी बाजूंनी बंदिस्त कुंपण असून पश्चिमेला एक अन्य प्रवेशद्वारही आहे. चैत्र व कार्तिक महिन्यात येथे जत्रा भरते. यावेळी येथील रथातून काळभैरवनाथाची मिरवणूक काढून मंदिरात गुलालाची उधळण केली जाते.

काळभैरवनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मठ आहे. मठात भद्रकाली देवीची गुफा, धूना, नाथ-योगींच्या समाधी, हिंगलजा मातेचा तांदळा इ. वास्तू व अवशेष दिसतात. या मठात मंदिराच्या उदुंबराचे (उंबरठा) अवशेष येथील एका भिंतीत लावलेले आहेत. त्याच्या मंदारकावर दोन्ही बाजूला दोन कीर्तिमुखे कोरलेली आहेत. बहुधा हे अवशेष मूळ काळभैरवनाथ मंदिराचे असावेत. सध्या या मठाची व्यवस्था ‘अखिल भारतवर्ष नवनाथ झुंड ट्रस्ट’ मार्फत चालते. या मठास स्वतःची दान मिळालेली शेतजमीनही आहे.

विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील ‘मढी’ या तीर्थक्षेत्राप्रमाणे सोनारी येथेही डवरी गोसाव्यांची जात पंचायत भरत असे. सोनारी येथे लोहतीर्थ (लोहाबाई), नागनिर्झरी तीर्थ, बगनाथ मंदिर, चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, गढीचे अवशेष, वीरगळ, नाथ-योगींच्या समाधी पाहावयास मिळतात. काळभैरवनाथ अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे.

संदर्भ :

  • Briggs, G. W. Gorakhnāth and the Kānphaṭā Yogīs, Delhi, 2007.
  • Chitnis, K. N. Socio-Economic History of Medieval India, New Delhi, 2002.
  • Maharashtra State Gazetteers, Osmanabad District, Bombay, 1972.
  • Sarde, Vijay, Archaeological Investigations of the Natha Sampradaya in Maharashtra (C.12th to 15th century CE), Unpublished thesis submitted to the Deccan College, Pune, 2019.

                                                                                                                                                                                  समीक्षक : अरुणचंद्र पाठक