भोकर (कॉर्डिया मिक्सा) : लहान वृक्ष

बोरॅजिनेसी कुलातील भोकर या पानझडी वृक्षाचे शास्त्रीय नाव कॉर्डिया मिक्सा आहे. रक्तमूळ व भुरुंडी या वनस्पतीदेखील याच कुलात समाविष्ट आहेत. या वृक्षाला ‘इंडियन चेरी’ असेही म्हणतात. भोकर मूळचा चीनमधील असून आता तो जगातील सर्व उष्ण प्रदेशांत लागवडीखाली आढळतो. तो म्यानमारपासून पूर्व अफगाणिस्तानपर्यंत नैसर्गिकरीत्या वाढलेला दिसून येतो.

 

 

 

भोकर (कॉर्डिया मिक्सा) : पाने आणि फळांचे घोस यांसह फांदी

भोकराचा वृक्ष १२–१५ मी. उंच वाढतो. त्याची पूर्ण वाढ होण्यासाठी ५०–६० वर्षे लागतात. पूर्ण वाढलेल्या भोकराच्या खोडाचा घेर सु. १ मी. असतो. साल गर्द पिंगट व भेगाळलेली असते. पाने साधी, एकाआड एक, जाडसर व खरखरीत असतात. पानाच्या तळातून ३–५ शिरा निघतात. कोवळी पाने केसाळ असतात. फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. फुले लहान, पांढरी व सुवासिक असून नर-फुले आणि मादी-फुले एकाच वृक्षावर येतात. फळे लांबट, फिकट पिवळसर तपकिरी ते लालसर काळपट, चकचकीत आणि एकबीजी असतात. पिकलेली फळे चवीला गोड असून ती चिकट रसाने भरलेली असतात.

भोकराची साल स्तंभक व सौम्य पौष्टिक आहे. मुरडा झाल्यास सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर देतात. फळातील मगज शामक व सारक असून मूत्रमार्ग, फुप्फुस व छाती यांच्या विकारांवर उपयुक्त आहे. बियांचे चूर्ण नायट्यावर लावतात. भोकराच्या कच्च्या फळांची भाजी, तसेच लोणचे करतात. त्यांपासून मद्यही बनवितात. म्यानमारमध्ये पानांपासून चिरूट तयार करतात. खोडाच्या सालीत २% टॅनीन असून तिच्यातील धाग्यांपासून दोर बनवितात. या दोरांचा उपयोग नौकाबांधणीत करतात. सालीच्या लगद्यापासून कागदही करतात. लाकूड ताजेपणी पिवळे असून नंतर पिंगट किंवा तपकिरी होते. ते हलके, नरम व मध्यम प्रतीचे मजबूत असते. त्याला घासून व रंधून झिलई करता येते. हे लाकूड नौका, बंदुकीचे दस्ते, शेतीची अवजारे, चहाची खोकी, बैलगाड्यांचे भाग इ. वस्तू तयार करण्यासाठी वापरतात. या वृक्षावर लाखेचे कीटकदेखील पोसतात.

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा