पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस गणाच्या स्टर्निडी कुलातील एक पक्षी. भोरडा या पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्टर्नस रोझियस आहे. त्याला भोरडी सारिका, गुलाबी सारिका अथवा गुलाबी साळुंकी असेही म्हणतात. भोरडा पक्षी पूर्व यूरोप आणि मध्य व पश्चिम आशिया येथील असून तो समूहाने राहतो. तो स्थलांतर करणारा पक्षी असून जुलै-ऑगस्ट महिन्यांत भारतात येतो व एप्रिलमध्ये परत जातो. भारतात तो सगळीकडे आढळतो; परंतु पंजाब आणि महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचे थवे दिसून येतात. एका थव्यात सु. ५०० पर्यंत भोरडे असू शकतात. भारतातील पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी अफगाणिस्तानामधील भोरड्यांच्या जीवनशैलीचा व स्थलांतराचा अभ्यास केल्याच्या नोंदी आहेत.
भोरडा आकाराने साळुंकीएवढा असतो. त्याच्या शरीराची लांबी २०–२४ सेंमी. असते. डोके, मान, कंठ, पंख व शेपटी हे भाग तकतकीत काळ्या रंगाचे असतात. बाकी शरीराचा रंग फिकट गुलाबी असतो. चोच पिवळसर गुलाबी रंगाची असते. मादीच्या गुलाबी रंगात किंचित करडी झाक असते. नर आणि मादी या दोघांच्या डोक्यावर मागे वळलेला पिसांचा तुरा असतो. विणीच्या हंगामात नराच्या डोक्यावरील पिसांचा तुरा अधिक उठून दिसतो. पिलांना तुरा नसतो.
ज्वारी-बाजरीचे पीक तयार झाल्यावर भोरड्यांचे थवेच्या थवे पिकांच्या कणसांतील दाणे प्रचंड प्रमाणात खातात आणि पिकांचे नुकसान करतात. परंतु त्याचबरोबर पिकांचा नाश करणारे टोळही ते खाऊन टाकतात. वड, पिंपळ, टणटणी, तुती, सावर, पांगारा इ. वृक्षांवर भोरड्यांचे थवे असतात. पळस, पांगारा व शेवरीच्या फुलातील मकरंद ते पितात, तसेच ते या झाडांची फळे खातात. भोरड्यांच्या विष्ठेतील फळांच्या बिया पावसाळ्यात लगेच जमिनीत रुजतात. अशा रीतीने बीजप्रसार होण्यास मोठी मदत होते. परागणाचेही कार्य भोरडे करतात. त्यांचे थवे दुपारी वडाच्या झाडांवर दाट पालवीत विश्रांती घेतात. त्यावेळी ते कर्कश आवाज करून गोंधळ घालतात. मात्र, अधूनमधून ते गोड आवाजही काढतात.
भोरड्यांच्या प्रजननाचा हंगाम मे-जूनमध्ये असतो. पूर्व यूरोप आणि मध्य व पश्चिम आशियात त्यांची वीण होते. ते खडक-टेकड्यांच्या बिळांत घरटी तयार करतात. मादी ३–५ फिकट निळ्या रंगाची अंडी घालते.
चीनमधील शिनजियांग प्रदेशातील शेतकरी टोळ मारण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करीत. १९८०च्या दशकात तेथील तज्ज्ञांच्या लक्षात आले की, चीनमध्ये स्थलांतर करून आलेल्या भोरड्यांचा वापर टोळनियंत्रणासाठी होऊ शकतो. त्यासाठी त्यांनी कृत्रिम घरटी तयार करून शेतात लावली. ही युक्ती एवढी यशस्वी झाली की भोरड्यांना खाण्यासाठी टोळ कमी पडले आणि त्यांची काही पिले उपासमारीमुळे दगावली. टोळनियंत्रणाच्या या जैविक पद्धतीमुळे २००० सालानंतर शिनजियांगमध्ये कीटकनाशकांचा वापर कमी झाला आहे.