संत्रे (सिट्रस रेटिक्युलॅटा) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे.

(स्वीट ऑरेंज). सिट्रस प्रजातीतील फळांपैकी काही फळांचा ‘संत्रा’ किंवा ‘नारिंग’ असा गट करतात. या गटात गोड नारिंग (स्वीट लाइम; सिट्रस लिमेटा), आंबट नारिंग (ॲसिड लाइम; सिट्रस ऑरँटिफोलिया) आणि मँडरिन नारिंग (मँडरिन ऑरेंज; सिट्रस रेटिक्युलॅटा) असे प्रकार आहेत. भारतात सामान्यपणे मँडरिन नारिंगाला संत्रे म्हणतात. ही वनस्पती मूळची चीनमधील असून जगाच्या उष्ण आणि उपोष्ण प्रदेशांत तिची फळांसाठी लागवड केली जाते. भारतात तिची लागवड इसवी सनाच्या सुरुवातीपासून झाली असावी, असे मानतात. भारतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, मिझोराम, मेघालय, नागालँड, कर्नाटक या राज्यांत संत्र्याची लागवड व्यापारी स्तरावर केली जाते.

संत्र्याचा वृक्ष सदाहरित, उलट्या (अधोमुख) शंकूच्या आकाराचा असून ९–१० मी. उंच वाढतो. याचे काही जुने वृक्ष सु. १५ मी. उंच वाढलेले दिसतात. त्यांच्या काही जाती काटेरी, तर काही बिनकाटेरी असतात. फांद्या बारीक असतात. पाने लिंबासारखी काहीशी लहान, संयुक्त एकपर्णी ४–१० सेंमी. लांब, एकाआड एक असून कडा सूक्ष्म दंतूर असतात; देठ आखूड व जवळजवळ पंखहीन असतो. फुले एकेकटी किंवा लहान गुच्छांत पानांच्या टोकाला येतात. फळ साधारणपणे टेनिसच्या चेंडूएवढे, गोलाकार किंवा वरून-खालून काहीसे चपटे असते. फळाची साल पातळ असून आतल्या गरापासून सहज सोलून काढता येते. कच्चे फळ हिरवे, तर पूर्ण पिकलेल्या फळाचा रंग नारिंगी, पिवळसर-नारिंगी किंवा लालसर नारिंगी होतो. फळांत १०–१२ फोडी आणि प्रत्येक फोडीच्या आत १-२ पांढऱ्या बिया असतात.

आयुर्वेदातील उल्लेखानुसार संत्र्याचे फळ शीतल, रेचक, कामोत्तेजक असून त्यामुळे तहान शमते. संत्र्याचे पिकलेले फळ चवीला गोड असते; फळांच्या फोडी खातात किंवा त्यांचा रस काढून पितात. फळांचा रस उत्साहवर्धक असतो. संत्रे हे फळ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. संत्रे फळाच्या १०० ग्रॅ. सेवनातून पुढील घटक मिळतात – पाणी ८५.२ ग्रॅ.; प्रथिने ०.८ ग्रॅ.; मेद ०.३ ग्रॅ.; कर्बोदके १३.४ ग्रॅ.; ऊष्मांक ५३ किकॅ.; कॅल्शियम ३७ मिग्रॅ.; लोह ०.१ मिग्रॅ.; पोटॅशियम १६६ मिग्रॅ.; जीवनसत्त्व ५३.२ मिग्रॅ. आणि -समूह जीवनसत्त्वे ०.७६ मिग्रॅ. इत्यादी.

भारताच्या निरनिराळ्या भागात संत्र्याचे विविध प्रकार जसे नागपुरी, खासी, कूर्ग, देशी, कमला, मुदखेड, शृंगार, बटवाल, कारा, दार्जिलिंग, मँडरिन, सीडलेस-१८२ इ. लागवडीखाली आहेत. नागपुरी संत्र्यांना वैशिष्ट्यपूर्ण दर्शनी रूप, चव आणि पोषक घटक यांवरून १९१४ साली जागतिक पातळीवर भौगोलिक निर्देशाचा (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मान देण्यात आलेला आहे. संत्र्यांच्या उत्पादनात ब्राझील, चीन आणि भारत हे देश आघाडीवर आहेत.