प्राचीन मगानमधील नौकेच्या पुनर्बांधणीचा एक अनोखा प्रकल्प. मेसोपोटेमियातील सुमेरियन संस्कृतीत व्यापारी संबंधांच्या संदर्भात कांस्ययुगातील मगान, दिलमुन व मेलुहा या तीन प्रदेशांचे वर्णन केलेले आढळते. यांतील मगान हा भाग म्हणजे ओमान व सौदी अरेबिया यांचा प्रदेश असल्याचे मानले जाते.

मगान नौकेचे प्रारूप.

इटालियन पुरातत्त्वज्ञ मॉरिझिओ तोसी यांना ओमानमधील रास अल-जिंझ या स्थळाच्या उत्खननात नैसर्गिक डांबराचे (Bitumen) मोठे तुकडे मिळाले. या तुकड्यावर बोरूसारख्या वनस्पतीचे ठसे मिळाले. रीड अथवा बोरूसारख्या वनस्पतीच्या काठ्यांचे गठ्ठे बांधून (Reed bundles) मेसोपोटेमिया आणि पर्शियात ताम्रपाषाणयुगात नौका तयार केल्या जात. त्यांना जलरोधक बनवण्यासाठी या गठ्ठ्यांवर डांबराचे गोळे लावलेले असत. त्यामुळे काळ्या दिसणाऱ्या या नौकांना ‘काळ्या नौकाʼ (Black boats) असे म्हटले जात असे. रास अल-जिंझ येथे मिळालेल्या काही तुकड्यांवर बार्नाकल (Barnacle) या सागरी प्राण्यांची कवचे मिळाली. यावरून असे दिसते की, या नौका किमान तीन महिने पाण्यात असणार.

मगान प्रदेशातील नौकांची चित्रे इराकमधील पुरातत्त्वीय स्थळांवर आणि सिंधू संस्कृतीच्या काही मुद्रांवर आढळली आहेत. अशा चित्रणांचा आधार मॉरिझिओ तोसी, ग्रेगरी पोशेल व टॉम व्होस्मर यांनी प्रयोगासाठी घेतला. त्यांनी मेसोपोटेमियात वर्णन केलेल्या मगानमधील साडेचार हजार वर्षांपूर्वी वापरल्या जात असलेल्या ‘काळ्याʼ नौकांच्या पुनर्बांधणीचा एक प्रयोग २००० ते २००५ या दरम्यान हाती घेतला होता. हा नाविक पुरातत्त्व आणि प्रायोगिक पुरातत्त्व यांच्या एकत्रित वापराचा प्रयोग होता. या आंतरराष्ट्रीय प्रयोगात ऑस्ट्रेलिया, ओमान, इटली, फ्रान्स, अमेरिका आणि भारत अशा देशांमधील अनेक संशोधकांचा समावेश होता. भारतातर्फे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातील अधोजल पुरातत्त्वज्ञ अलोक त्रिपाठी हे त्यात सहभागी झाले होते.

सिंधू संस्कृतीच्या मुद्रेवरील मगान नौकेचे चित्रण.

या प्रकल्पात दोन नौका बांधण्यात आल्या. त्यासाठी माणसाच्या मांडीएवढ्या जाडीचे रीडचे सात गठ्ठे करून ते खजूराच्या झाडांपासून बनवलेल्या दोरखंडांनी बांधण्यात आले. ही नौकेची चौकट होती. रास अल-जिंझ येथील नैसर्गिक डांबर इराकमधले असल्याचे निष्पन्न झाले असल्याने प्रयोगासाठी इराकहून दोन टन नैसर्गिक डांबर आणण्यात आले. प्राचीन नौकेप्रमाणेच ही नौका तयार करून त्या काळात जसा माल नौकेवर लादला जाई त्याप्रमाणे तांब्याचे गोळे, सुकी मासळी व अन्नपाणी वगैरे घेऊन ही चाळीस फूट लांब नौका ओमानच्या सूर (Sur) या बंदरातून गुजरातच्या मांडवी या बंदराकडे जाण्यासाठी सप्टेंबर २००५ मध्ये निघाली; तथापि ती थोडीशीच पुढे जाऊन समुद्रात गेल्यावर नौकेत पाणी शिरल्याने तीस मिनिटांत बुडली. टॉम व्होस्मर हे या नौकेचे कप्तान होते. त्यांच्यासह एकूण आठजणांच्या चमूला भारतीय नौदलाच्या आयएनएस गोमती या  जहाजाने वाचवले. ही युद्धनौका भारताकडून प्रकल्पासाठी मुद्दाम पाठवण्यात आली होती.

हा प्रयोग अयशस्वी झाला असला, तरी त्यातून भविष्यातील अशा प्रकल्पांसाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या.

संदर्भ :

  • Cleuziou, S. & Tosi, M. ‘Black boats of Magan: some thoughts on Bronze Age water transport in Oman and beyond from the impressed bitumen slabs of Ra’s al-Junayzʼ, South Asian Archaeology, 1993, (Eds., Asko parpola & P. Koskikallio), pp. 745-762, Helsinki: Suomalainen Tiedeakatemia, 1994.
  • Cleuziou, S. & Tosi M. In the Shadow of the Ancestors, Muscat: Ministry of Culture and Heritage, 2007.
  • Vosmer, Tom, ‘The Magan Boat Project: a process of discovery, a discovery of processʼ, Proceedings of the Seminar for Arabian Studies, 33: 49-58, 2003. https://www.jstor.org/stable/41223753
  • छायाचित्र : मगान नौकेचे प्रारूप, स्रोतः http://www.salut-virtual-museum.org/index.php?id=380

समीक्षक : श्रीनंद बापट