एक तृणधान्य. मका ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव झीया मेझ आहे. ती मूळची मध्य अमेरिकेतील आहे. युरोपात मका प्रथम स्पॅनिश लोकांनी १४९४ च्या सुमारास नेला. आशियात या पिकाची सोळाव्या शतकाच्या आरंभी आयात झाली.

मका (झीया मेझ)

मका ही वनस्पती २-३ मी. उंच वाढते. खोड १८–२० पेरांनी बनलेले असते. त्या पेरांना संधिक्षोड म्हणतात. त्याची आगंतुक मुळे तंतुमय असतात. जमिनीलगतच्या २­३ पेरांपासून जाड आधारमुळे वाढलेली असतात. खोडाच्या प्रत्येक पेरावर एक साधे, मोठे, लवदार, लांब आणि रुंद पान असते. पान सु. १०० सेंमी. लांब आणि ८–१० सेंमी. रुंद असते. मक्याच्या रोपावर नर-फुले आणि मादी-फुले वेगवेगळ्या ठिकाणी फुलोऱ्‍यात येतात. या फुलोऱ्यांना सर्वसाधारणपणे तुरे म्हणतात. नर-फुलोरा स्तबक प्रकारचा असून तो झाडाच्या शेंड्याला येतो, तर मादी-फुलोरा पानांच्या बगलेत येतो.

मादी-फुलोरा छदकणिश प्रकारचा असून तो मोठ्या छदांनी वेढलेला असतो. मादी-फुले सहपत्री, लहान व बिनदेठाच्या किंवा देठाच्या लहान फुलोऱ्‍यात (कणिशकात) जोडीने येतात. मादी-फुलोऱ्‍यातील सर्व कणिशके बिनदेठाची असतात. प्रत्येक कणिशकातील दोन्हींपैंकी एक फूल (पुष्पक) वंध्य असून त्यात परिदलक नसतात; ही सर्व कणिशके एका रांगेत असून छदकणिशाच्या जाड दांड्यावर त्यांच्या ८–१६ आणि क्वचित प्रसंगी ३० पर्यंत रांगा असतात आणि त्या सर्वांवर मोठ्या, चिवट व काहीशा चौकोनी छदांचे आवरण असते. प्रत्येक मादी-फुलात एक अंडाशय, त्यावर ४०–५० सेंमी. लांब व मऊ केसासारखा कुक्षिवृंत आणि टोकाला लांब पण दुभागलेली कुक्षी असते. मादी-फुलातील सर्व कुक्षिवृंताचा शेंडीसारखा झुबका छदांच्या आवरणातून बाहेर लोंबत असतो. यालाच मक्याचे ‘रेशीम’ म्हणतात.

नर-फुलोऱ्‍याच्या कणिशकांच्या जोड्यांतील प्रत्येक कणिशकात दोन लहान फुले (पुष्पके, फुलोऱ्‍यातील एक फूल), दोन पुष्पी तुषे (तुष म्हणजे पातळ, परंतु कठीण उपांगासारखे आवरण), दोन बाह्यसहपत्रे, दोन अंत:स्तुषे व तळात दोन-दोन परिदलके असतात. प्रत्येक नर-फुलात तीन पुंकेसर असतात. नर-फुलोऱ्‍यातील परागकण वाऱ्‍यावर पसरत जाऊन अन्य कुक्षींवर पडतात आणि परपरागण घडून येते. मक्याची शुष्क दाणे छदकणिशावर तयार होतात.

मक्याच्या दाण्याचा उभा छेद आणि त्यातील भाग

मक्याचा प्रत्येक दाणा एकदलिकित बीज असते व त्याला ढालक म्हणतात. दाण्याचे भ्रूण, भ्रूणपोष, ढालक, ॲल्युरोन स्तर आणि बीजावरण हे भाग असतात. बीजावरण आतील भागाचे संरक्षण करते. बीजावरणाच्या आतील बाजूस प्रथिनयुक्त कणांचा स्तर असतो. या स्तराला ॲल्युरोन स्तर म्हणतात. भ्रूणपोषात स्टार्च आणि इतर अन्नघटक असतात. ढालकाद्वारे भ्रूणपोषातील अन्न भ्रूणाच्या वाढीसाठी शोषून घेतले जाते. या भ्रूणापासून मक्याचे नवीन रोप तयार होते. प्रत्येक भ्रूण तैलयुक्त असतो. मक्याच्या दाण्यात मेद, कर्बोदके आणि प्रथिने हे तीनही घटक असल्यामुळे मका हे परिपूर्ण अन्न मानले जाते.

मक्याचे अनेक उपयोग आहेत. मक्याची कणसे भाजून किंवा उकडून खातात. १०० ग्रॅ. मक्याच्या सेवनातून सु. ८६ ऊष्मांक मिळतात. मक्याच्या पिठाचा वापर निरनिराळ्या खाद्यपदार्थांमध्ये करतात. पूरक अन्न म्हणून त्याच्या पिठाच्या भाकरी केल्या जातात. भ्रूणपोषापासून मिळविलेल्या  पिठाला कॉर्नफ्लोअर म्हणतात. त्याचा वापर सॉस, सूप, कॉर्न सिरप, आइसक्रीम व पुडिंग तयार करण्यासाठी आणि कपड्यांना झिलई देण्यासाठी होतो. कॉर्नफ्लोअरवर अमायलेज या विकराची प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात ग्लुकोज ही एकशर्करा तयार करतात. जैवइंधन म्हणून देखील खोडाचा वापर केला जातो. पानांचा व खोडांचा वापर गुरांना चारा म्हणून देतात. मक्याचे दाणे जनावरांना खायला दिले जातात.

This Post Has One Comment

Khushal साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.