नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा कालखंड : (१९५०–१९९०).

विविध उत्खनने, जगाच्या निरनिराळ्या भागांत सांस्कृतिक क्रमाचे आकलन आणि प्रागितिहास व इतिहासपूर्व काळ यांची सुसूत्र मांडणी यांमुळे दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्त्वाचा नवीन टप्पा सुरू झाला. सन १९५० नंतर पुरातत्त्वात झालेल्या अनेक बदलांमध्ये पुरातत्त्वविज्ञानाचा उदय ही एक महत्त्वाची घडामोड होती. त्याचप्रमाणे या काळात पुरातत्त्वीय सिद्धांतांमध्ये आमूलाग्र बदल घडून आले. नवपुरातत्त्वाचा (New Archaeology) उदय झाला आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून प्रक्रियावादोत्तर पुरातत्त्वाच्या (Post-Processual Archaeology) अनेक विचारधारा निर्माण होण्यास एक पार्श्वभूमी तयार झाली.

ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ ग्रॅहम क्लार्क (१९०७–९५) यांनी तत्कालीन सांस्कृतिक-ऐतिहासिक दृष्टिकोन बाजूला ठेवून इंग्लंडमधील स्टार कार येथील उत्खननात परिस्थितिविज्ञानाचा वापर केला. मानवसमूह निरनिराळ्या पर्यावरणांत आपल्यामध्ये कसे अनुकूलन घडवतात, हे त्यांनी पुरातत्त्वीय विवेचनातून दाखवून दिले. स्टार कार उत्खनन हा पुरातत्त्वाच्या इतिहासात मैलाचा दगड मानला जातो. विज्ञानाच्या वापरामुळे पुरातत्त्वीय निष्कर्षांमध्ये कशी मोलाची भर पडते, हे स्टार कार येथील उत्खननातून दिसून आले.

पुरातत्त्वविद्येच्या इतिहासात १९६० ते १९८० दरम्यानची वीस वर्षे अत्यंत खळबळजनक मानली जातात. कारण याच कालखंडात नवपुरातत्त्व या नावाने भूमिका मांडणाऱ्यांनी जुन्या पठडीच्या वर्णनात्मक आणि व्यक्तिसापेक्ष पुरातत्त्वीय निष्कर्षपद्धतीवर कडाडून हल्ला चढवला. याची सुरुवात जे. सी. गरदाँ या फ्रेंच संशोधकांनी केली. त्यांनी पुरातत्त्वीय पुराव्यांचा अर्थ लावण्यासाठी अधिक सक्षम नवीन पद्धत असावी, असे सुचवले. पाठोपाठ लाप्लास या त्यांच्या देशबांधवाने दगडी हत्यारांचा अभ्यास करताना अनुभवपूर्व संकल्पना वापरण्यावर आक्षेप घेतला. स्वीडिश पुरातत्त्वज्ञ एम. पी. माल्मर यांनी तत्कालीन पद्धत पूर्णपणे व्यक्तिगत पात्रतेवर अवलंबून असल्याने ती सापेक्ष आहे व त्यात अचूकपणाचा अभाव आहे, असे मत मांडले (१९६२). याच वर्षी अमेरिकन मानवशास्त्रज्ञ लुई बिनफोर्ड यांनी नवपुरातत्त्वाला जन्म दिला, असे म्हटले जाते. त्यांनीच पुढील काळात नवपुरातत्त्वामागील वैज्ञानिक विचारसरणीचे समर्थन केले आणि रीतसर सैद्धांतिक मांडणी केली.

कोणतीही ठाम उद्दिष्टे नसलेली पुरातत्त्व ही एक बेशिस्त शाखा आहे, अशी टीका डेव्हिड क्लार्क (१९३७–१९७६) यांनी केली (१९६८). नवपुरातत्त्वाच्या उदयानंतर पुरातत्त्वीय काम आणि त्यामागील विचारसरणीत झालेल्या बदलांचे उत्कृष्ट वर्णन व विश्लेषण क्लार्क यांनी त्यांच्या ‘आर्किऑलॉजी : द लॉस ऑफ इनोसन्सʼ (१९७३) या लेखात केले. दुसऱ्या महायुद्धानंतर पुरातत्त्वविद्येत एकप्रकारे असणारा निरागसपणा अथवा बालिशपणा जाऊन चिकित्सकपणाचे आत्मभान आले, असे त्यांचे प्रतिपादन आहे. डेव्हिड क्लार्क यांचे  ॲनालिटिकल आर्किऑलॉजी (१९६८) आणि पेटी जो वॉटसन आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांचे एक्स्प्लनेशन इन आर्किऑलॉजी  (१९७१) हे नवपुरातत्त्वाचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.

नवपुरातत्त्वाबरोबरच प्रक्रियावादी पुरातत्त्व (Processual Archaeology) ही एक विचारधारा १९६०–८० दरम्यान अस्तित्त्वात आली होती. मानवी संस्कृतींच्या अभ्यासातून काही सर्वसामान्य नियम बनवता येतात आणि त्या नियमांच्या आधारे कोणत्याही संस्कृतीमधील संरचना आणि प्रक्रिया यांचे स्पष्टीकरण करणे, हे या प्रक्रियावादी पुरातत्त्वाचे मुख्य उद्दिष्ट होते. नवपुरातत्त्व आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाच्या समर्थकांनी ⇨ कार्ल राइमुंट पॉपर (१९०२–९४) आणि कार्ल जी. हेम्पेल (१९०५–९७) या दोन प्रसिद्ध तत्त्वज्ञांच्या प्रारूपांचा वापर केला होता. तसेच नवपुरातत्त्वात विज्ञानाच्या तत्त्वज्ञानातील अनुभववाद (Empiricism) आणि तर्कशास्त्रीय प्रत्यक्षार्थवाद (Logical Positivism) या दोन विचारसरणींचा मिलाफ होता.

प्रक्रियावादी पुरातत्त्वज्ञ वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करत असल्याने कालांतराने चर्चेच्या ओघात नवपुरातत्त्व आणि प्रक्रियावादी पुरातत्त्व हे समानार्थी शब्द झाले. निव्वळ पुरातत्त्वीय, ऐतिहासिक अथवा मानवी संस्कृतीच्या निरीक्षणाचा वर्णनात्मक पुरावा गोळा करणे पुरेसे नाही. इतर कोणत्याही भौतिक वस्तूंप्रमाणे मानवदेखील विश्वाचा एक सामान्य घटक आहे. त्या इतर भौतिक वस्तूंच्या अभ्यासासाठी आपण ज्या पद्धती वापरतो, त्याच मानवाच्या व मानवी समाजाच्या अभ्यासाला लागू पडतात. वैज्ञानिक पद्धत वापरून सिद्धांतकल्पना (Hypothesis) मांडाव्यात. आपण मांडलेल्या पर्यायी सिद्धांतकल्पनांचे योग्य परीक्षण करताना निगमन (Deduction) या तर्कशास्त्रीय साधनाचा उपयोग केला पाहिजे. तसेच मिळालेले ज्ञान हे सतत कठोर परीक्षण करूनच स्वीकारावे. कोणाचाही शब्द ती व्यक्ती महान आहे म्हणून मान्य करू नये. केवळ परीक्षण, चिकित्सा आणि व्यक्तिसापेक्षपणाशी फारकत करून जे ज्ञान मिळेल, तेच ग्राह्य धरले जावे, अशी नवपुरातत्त्वाची भूमिका आहे. या विचारसरणीत संख्यात्मक विश्लेषणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच नवपुरातत्त्वामध्ये एकूणच वैज्ञानिक पद्धतीत संख्याशास्त्र  अणि गणित यांचा वाटा मोठा आहे. पुरातत्त्वीय अभ्यासातील सर्वेक्षण, उत्खनन आणि वर्णन या मुख्य गोष्टी नवपुरातत्त्वात बदलल्या नाहीत; तर तर्कशास्त्रीय पद्धतीवर आधारित अर्थबोधातून ज्ञान मिळवणे हा पुरातत्त्वीय कार्याचा मुख्य उद्देश झाला. वैज्ञानिक पद्धतीच्या वापरामुळे अवशेषांचे कलात्मक रसग्रहण, आलंकारिक भाषेतील वर्णन आणि पुरातत्त्वज्ञाच्या वैयक्तिक आवडीनिवडीनुसार अनुमान काढण्याची पद्धत यांना नवपुरातत्त्वामुळे स्थान राहिले नाही.

नवपुरातत्त्वाची भूमिका सहजासहजी स्वीकारली गेली नाही. नवपुरातत्त्वामुळे पुरातत्त्वीय संशोधनात वैज्ञानिक पद्धत चांगलीच रुजली. तथापि पुरातत्त्वातील मुख्य प्रवाहातील लोकांनी याला दोन प्रकारे प्रतिसाद दिला : पारंपरिक मार्गाने शिक्षण घेतलेल्या काही पुरातत्त्वज्ञांनी नवीन विचार फार दुर्बोध आहे (कारण त्यात त्यांना न कळणारी भाषा होती), असे म्हणून सरधोपट प्रकारे पुरातत्त्वाला वैज्ञानिक बनवण्याचा धिक्कार केला, तर काहींनी स्वतः अभ्यासाचे फारसे कष्ट न करता सगळे चिकित्सेशिवाय स्वीकारण्याचे धोरण अवलंबले. पुरातत्त्व ही प्रत्यक्षात मानव्यविद्या असल्याने पारंपरिक वळणाच्या पुरातत्त्वज्ञांनी नवपुरातत्त्वाच्या समर्थकांवर टीका केली. मानवी वर्तनाला भौतिक विज्ञानातील नियमांप्रमाणे तर्कशास्त्रीय साच्यांमध्ये बसवता येणार नाही; म्हणून पुरातत्त्वाचे मानवविद्या हे जुने स्वरूपच असावे आणि त्यातील विज्ञान निपटून टाकावे, असा विचारप्रवाहदेखील मूळ धरू लागला.

भारतीय पुरातत्त्वाच्या संदर्भात नवपुरातत्त्वाचा विचार केला, तर काहीसे निराशाजनक चित्र समोर येते. भारतीय उपखंडातील पुरातत्त्वीय संशोधन काही अपवाद वगळता प्रामुख्याने जुन्या आणि वर्णनात्मक मार्गाने चालल्याचे दिसते. भारतात पुरातत्त्वीय संशोधक अधिकारी, विद्यार्थी आणि अध्यापकांमधे आपल्या विषयाच्या सैद्धांतिक आधारांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आहे. शिवाय केवळ रिकामटेकडे आणि उन्हात काम करायला घाबरणारे लोक पुरातत्त्वीय सिद्धांतांची मांडणी करतात, अशी टीका केली जाते. नवपुरातत्त्व किंवा काय, हवे ते लिहू देत; आम्ही आमचे उत्खननाचे आणि केवळ त्यांचे वर्णन करण्याचे संशोधन चालूच ठेवतो, असे चित्र एका बाजूला आहे; तर दुसरीकडे विज्ञानाच्या वापराने पुरातत्त्वीय संशोधन दुर्बोध होत आहे, अशीही टीका होताना दिसते.

संदर्भ :

  •   Binford, L. R., A Consideration of Archaeological Research Design, American Antiquity, 1963.
  •  Chapman, Robert Analytical Archaeology and After – An Introduction, in Analytical Archaeologist, London, 1979.
  •  Clarke, D. L. Analytical Archaeology, London, 1968.
  •  Gardin J. C. ‘Four Codes for the Description of Artifacts : an Essay in Archaeological Technique and Theoryʼ, American Anthropologist, 1958.
  •  Kelly, J. H. and Hanen, M. P. Archaeology and the Methodology of Science, Albuquerque, 1990.
  •  Paddayya, K. New Archaeology and Aftermath, Pune, 1990.
  •  Popper, Karl The Poverty of Historicism, London, 1963.
  •  Watson, Patty Jo; LaBlanc, S. A. and Redman, C. L. Explanation in Archaeology, New York, 1971.
  •  Watson, R. A. What the New Archaeology has Accomplished, Current Anthropology 1991.
  • जोगळेकर, प्रमोद  ‘पुरातत्त्वशास्त्रातील नवीन प्रवाहʼ, संशोधक, २००४.

समीक्षक : शरद राजगुरू