मृगशीर्ष नक्षत्र : मृगशीर्ष हे नक्षत्रचक्रातील पाचवे नक्षत्र आहे. भारतीय नक्षत्रचक्रात मृगशीर्ष हे नक्षत्र मानले जाते, पूर्ण मृग तारकासमूह काही चंद्र-नक्षत्र म्हणून धरला जात नाही, कारण आयनिक वृत्त मृग तारकासमूहापासून तसे लांब आहे. पण अनेकजण व्यवहारात बोलताना फक्त ‘मृग नक्षत्र’ असेच म्हणतात. उदा., मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात, ते त्याचमुळे. डिसेंबरच्या मध्यावर मृग नक्षत्र संध्याकाळी उगवून रात्रभर आकाशात पाहता येते. मृग तारकासमूहात एकूण १३ ठळक तारे असून त्यातील ४ तेजस्वी तारे (अल्फा: बेटलज्यूस किंवा काक्षी, बीटा: रायजेल म्हणजे राजन्य, गॅमा: बेलॅट्रिक्स आणि काप्पा: सैफ) हे कल्पनेने जोडले, तर एक चौकोन तयार होतो. त्या चौकोनाच्या मध्यभागी एका तिरप्या सरळ रेषेत ३ साधारण ठळक तारे आहेत (क्साय: अल्निटाक, इप्सिलॉन:अल्निलाम आणि डेल्टा: मिन्टाका) यांना आपल्याकडे त्रिकांड बाण म्हणतात. मृगाच्या (हरिणाच्या) पोटात शिरलेला बाण तो हाच. शिवाय त्या ३ ताऱ्यांच्या खाली आणखी ३ (थिटा, टाउ, म्यु) हे सामान्य प्रतीचे तारे आहेत, ती हरिणाची शेपूट. चौकोनाचे चार तारे म्हणजे या हरिणाचे चार पाय अशी एक कल्पना आहे. वरच्या दोन पायांच्या मध्ये उत्तरेस जो तीन अंधुक ताऱ्यांचा त्रिकोण आहे, ते या काल्पनिक हरिणाचे डोके, म्हणजे मृगशीर्ष. या मृगशीर्षाच्या ईशान्य दिशेला रोहिणीचा (Aldebaran) लालसर तारा दिसतो, तर वायव्येस पुनर्वसूचे तारे आहेत. मृग तारकासमूह आकाराने मोठा आणि ठळक ताऱ्यांनी बनलेला असल्याने ओळखण्यास सोपा आहे. पण त्याचे डोके असणारे, मृगशीर्षातले तारे मात्र अंधुक आहेत. हा ३ ताऱ्यांचा  छोटा त्रिकोण म्हणजे मृगशीर्ष. त्यातला मेईस्सा (Meissa) हा तारा मृगातला लॅमडा तारा असून तो मृगशीर्षाच्या ३ ताऱ्यातला सर्वांत उत्तरेचा तारा आहे. यालाच मृगशीर्षाचा योगतारा असे काही प्राचीन ग्रंथांमध्ये म्हटले आहे. हा द्वैती तारा असून त्यातला एक उष्ण निळा राक्षसी तारा असून वर्णपटीय वर्गीकरणाप्रमाणे ‘ओ’ प्रकारचा तारा आहे, तर यातला दुसरा B प्रकारचा पांढरा तारा आहे. मृगाच्या शीर्षातले हे तारे आपल्या पासून सुमारे १,०४२ ते १,१०० प्रकाश वर्षे एवढ्या अंतरावर आहेत. या लॅमडा द्वैती ताऱ्यांची एकत्रित दृश्यप्रत ३.५० ते ३.६३ अशी बदलती दिसून येते.

संदर्भ :

  • हा तारा कोणता ?, गो. रा. परांजपे, म.रा.सा.सं.मं. मुंबई.

 समीक्षक : आनंद घैसास