एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते.

मटकी (विग्ना ॲकॉनिटिफोलिया) : पाने व शेंगांसहित वनस्पती (वरील बाजूस बिया)

मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून आणि तिला आच्छादन करून वाढते. ते सु. ४० सेंमी. उंच वाढते. तिच्या जवळजवळ वाढणाऱ्या फांद्यांवर भरपूर लव असते. पाने संयुक्त व त्रिदली असतात; प्रत्येक पिच्छिकेचे ३–५ भाग असतात. अनुपर्णे अरुंद व टोकदार असतात. खोडावर लहान पिवळ्या फुलांच्या मंजिऱ्या लांबट दांड्यावर येतात. शेंगा लहान, गोलसर, २–६ सेंमी. लांब आणि तपकिरी असून त्यात ४–९ बिया असतात. बिया वेगवेगळ्या रंगांच्या असून बहुधा पिवळट तपकिरी, पांढरट हिरव्या किंवा ठिपकेदार काळ्या असतात. परागण कीटकांमार्फत होते.

मटकीच्या पानांचा व फांद्यांचा उपयोग जनावरांना चारा म्हणून होतो. १०० ग्रॅ. मटकी बियांच्या सेवनातून २३ ग्रॅ. प्रथिने, ६२ ग्रॅ. कर्बोदके आणि १·६ ग्रॅ. मेद मिळते. तिच्यात आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. मोड आणलेल्या बियांमध्ये क-जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते. मोड आलेली मटकी न्याहारीत उसळ, तसेच जेवणात भाजी म्हणून खातात. भरडलेली मटकी डाळ म्हणून वापरतात. मटकीची वेल जमिनीलगत दाट वाढून जमीन झाकून टाकत असल्यामुळे ती जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपयोगी ठरते.

प्रतिक्रिया व्यक्त करा