जमिनीवर आढळणारा एक विषारी साप. मण्याराचा समावेश सरीसृप वर्गाच्या इलॅपिडी कुलातील बंगारस प्रजातीत करतात. भारतीय उपखंडात साधा मण्यार (बंगारस सीरुलियस), पट्टेरी मण्यार (बंगारस फॅसिएटस) आणि काळा मण्यार (बंगारस नायगर) अशा मण्यारांच्या तीन जाती आढळतात. त्यांचे विष अत्यंत जहाल असते.

साधा मण्यार (बंगारस सीरूलियस)

भारतात पश्‍चिम बंगाल, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत साधा मण्यार (बंगारस सीरुलियस) आढळतो. तो वनांत राहणे पसंत करतो. पूर्ण वाढ झालेल्या मण्याराची लांबी ९०–१२० सेंमी. किंवा अधिक असते. शरीर पोलादी निळ्या रंगाचे असून त्यावर सु. ४० पांढरे पट्टे असतात. हे पट्टे एकेकटे किंवा जोडीने असतात आणि ते डोक्यामागे बऱ्याच अंतरापासून शेपटीपर्यंत असतात. पोटाकडची बाजू पांढरी असते. पाठीवर मध्यभागी मोठ्या आणि षट्‍कोनी खवल्यांची एक लांब ओळ असते. हे खवले शेपटीकडे अधिक, तर डोक्याकडे कमीकमी होत जातात. वरच्या ओठावरील ३ आणि ४ हे दोन्ही खवले डोळ्यांना लागून असतात. डोळे मध्यम किंवा लहान असून बाहुली वाटोळी असते. शेपटी निमुळती व गोलाकार असते.

पट्टेरी मण्यार (बंगारस फॅसिएटस)

तेलंगणा, आसाम, मिझोराम, नागालँड व मणिपूर या राज्यांत पट्टेरी मण्यार (बंगारस फॅसिएटस) आढळतो. त्याची लांबी सु. २ मी.पर्यंत असते. पूर्ण वाढ न झालेल्या पट्टेरी मण्याराच्या शरीरावर काळे व पांढरे पट्टे एकाआड एक असतात, तर पूर्ण वाढलेल्या मण्याराच्या शरीरावर काळे व पिवळे पट्टे एकाआड एक असतात.

 

काळा मण्यार (बंगारस नायगर)

 

आसाम, सिक्कीम व पश्‍चिम बंगाल या राज्यांत काळा मण्यार (बंगारस नायगर) आढळतो. त्याचा रंग काळा किंवा पोलादी निळा असतो. मात्र त्याच्या अंगावर पट्टे नसतात. खालची बाजू पांढरी असून त्यावर काळे ठिपके असतात.

घराच्या जवळपास, बागेत, गवतात, झुडपात, पडक्या इमारतीत इ. ठिकाणी मण्यार आढळतो. तो मुख्यत: निशाचर आहे. अन्न शोधण्यासाठी तो रात्री हिंडतो. तो दिवसा सहजासहजी बाहेर पडत नाही. लहान साप हे त्याचे मुख्य भक्ष्य असून उंदीर, पाली, सरडे व बेडूक यांसारखे लहान प्राणी तो खातो. मण्यार स्वजातिभक्षकदेखील आहे. त्याची मादी एप्रिल-मे महिन्यात १२–१४ पांढरी अंडी पाचोळ्याच्या ढिगात घालते आणि पिले बाहेर पडेपर्यंत अंड्यांजवळ राहते. पिले साधारणपणे ४५–६० दिवसांनी अंड्यांबाहेर पडतात. नवजात पिले १५–२० सेंमी. लांब असतात.

अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधात निघाल्यामुळे मण्यार अनेकदा मनुष्यवस्तीत, घरांत सापडण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात त्याच्या दंशाच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. त्याच्यावर नकळत पाय पडल्याने त्याने दंश केल्याच्या घटना घडतात. त्याला दुखावले तरच तो अंगावर येतो व दंश करतो. मण्याराचे विष नागाच्या विषाच्या १५ पट जहाल असते. त्याच्या विषग्रंथीमधून एका वेळी २०–१०० मिग्रॅ. विष अंत:क्षेपित केले जाते. या विषामध्ये बंगारोटॉक्सीन-१ व २ हे घटक असतात. या विषामुळे चेतापेशींमधील संवेदवहन थांबते. तसेच दंशबाधित व्यक्तीचे मध्यपटल आणि बरगड्या यांच्या आंतरपर्शुकीय स्नायूंवर परिणाम होऊन फुप्फुसाचा पक्षाघात होतो व मृत्यू येतो.

मण्याराने दंश केल्यास पटकन लक्षात येत नाही, कारण दंश केल्याच्या जागी वेदना होत नाहीत. त्याचे विषदंत लहान असल्याने विष शरीरात पसरायला वेळ लागतो. दंशानंतर प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते, स्नायूंचा पक्षाघात जाणवू लागतो आणि काही वेळात श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अखेरीस श्‍वसन संस्था बंद पडून ६–२४ तासांत मृत्यू ओढवतो. त्वरित वैद्यकीय मदत मिळाल्यास आणि मण्याराच्या जातीनुसार योग्य प्रतिविष दिल्यास दंशबाधित व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. सुरेंद्र

    माहितीपूर्ण लेख होता. आवडला.

  2. दीपक वाणी

    उत्तम माहिती दिलीत. धन्यवाद!

दीपक वाणी साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.