उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको या देशाच्या आग्नेय भागातून वाहणारी एक नदी. या नदीची लांबी सुमारे ६४० किमी. असून पाणलोट क्षेत्र सुमारे ५८,००० चौ. किमी. आहे. एकूण पाणलोट क्षेत्रापैकी उगमाकडील प्रदेशातील केवळ ९ टक्के क्षेत्र ग्वातेमाला देशातील असून उर्वरित ९१ टक्के क्षेत्र मेक्सिकोमधील आहे. या नदीच्या शीर्षप्रवाहांचे उगम ग्वातेमालाच्या नैर्ऋत्य भागात आणि मेक्सिकोच्या आग्नेय भागात पसरलेल्या सिएरा माद्रे पर्वतश्रेण्यांमध्ये आहेत. ग्वातेमालातील उगमानंतर प्रथम नैर्ऋत्येस वाहत जाऊन पुढे ही नदी मेक्सिकोमध्ये प्रवेश करते. त्यानंतर मेक्सिकोतील चीआपास राज्यातून वायव्येस वाहत जाते. तेथे तिला रिओ गांद्रे चीआपा किंवा रिओ चीआपा या स्थानिक नावांनी ओळखले जाते. चीआपास राज्यात तिच्या पात्रात १,००० मी. खोलीची घळई निर्माण झाली आहे. या घळईतील १३ किमी. लांबीच्या पात्रातील जो अरुंद भाग आहे, तेथे तर ही नदी ९०° च्या कोनातील पात्रातून वाहते. या नदीवर माल्पासो हे धरण बांधण्यात आले आहे. माल्पासो धरणाचा जलाशय पार करून गेल्यानंतर ती उत्तरेस आणि नंतर पूर्वेस वळते. ताबास्को राज्याची राजधानी बीयाएमोसा येथे ती पुन्हा उत्तरवाहिनी होते. खालच्या टप्प्यात तिला ऊसूमासींता नदीचा एक प्रमुख फाटा मिळतो. त्यांनतर फ्राँत्तिराच्या वायव्येस १० किमी. वर ती कँपीची उपसागरमार्गे मेक्सिकोच्या आखाताला मिळते. मुखाशी ग्रीहाल्वा व ऊसूमासींता या दोन नद्यांनी त्रिभूज प्रदेश तयार केला आहे. काही वेळा या दोन नद्यांचे एकच खोरे मानले जाते.

बीयाएमोसा शहरामधून ग्रीहाल्वा नदी वाहत असून तेथे तिच्यावर रज्जू–आधारित पूल बांधण्यात आला आहे. १९६० च्या दशकात ग्रीहाल्वा आणि ऊसूमासींता या नद्यांच्या खालच्या खोर्‍यात पूरनियंत्रण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रीहाल्वा प्रकल्प उभारण्यात आला आहे. नदीच्या मुखापासून आत सुमारे १०० किमी. पर्यंत उथळ (कमी) डूबीच्या बोटींद्वारे वाहतूक केली जाते.

स्पॅनिश समन्वेषक यॉन दे ग्रीहाल्वा यांनी इ. स. १५१८ मध्ये या नदीचा शोध लावला. त्यांच्या नावावरूनच या नदीला ग्रीहाल्वा हे नाव देण्यात आले आहे. पूर्वी या नदीला ताबास्को या नावाने ओळखले जाई.

समीक्षक : वसंत चौधरी