अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या दक्षिण-मध्य भागातून वाहणारी आणि मिसिसिपी नदी (Mississippi River)ची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. २,३५० किमी. तिच्या प्रत्येक वळणासह लांबी मोजल्यास ती सु. ३,१०० किमी. भरते. मिसिसिपी-मिसूरी नदीप्रणालीतील ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी उपनदी असून लांबीच्या बाबतीत देशात ती सहाव्या क्रमांकावर आहे. जलवाहनक्षेत्र ४,१७,००० चौ. किमी. आर्कॅन्सॉ इंडियनांवरून नदीला हे नाव पडले आहे. कोलोरॅडो राज्याच्या मध्य भागात, रॉकी पर्वताच्या सवाच पर्वतश्रेणीतील लेडव्हिल नगराजवळ, स. स.पासून सु. ३,००० मी. उंचीवर टेनेसी खिंडीजवळ ही नदी उगम पावते. कोलोरॅडो व कॅनझस राज्यांतून विचिटॉ शहरापर्यंत पूर्वेस, तर ईशान्य ओक्लाहोमा आणि मध्य आर्कॅन्सॉ राज्यांतून ती आग्नेयीस वाहत जाते. आर्कॅन्सॉ राज्यात आर्कॅन्सॉ सिटीपासून ईशान्येस ६४ किमी. अंतरावर नेपोलियन शहराजवळ ही नदी मिसिसिपी नदीला उजवीकडून मिळते. उगमापासून ते मुखापर्यंतच्या प्रवासात ती सु. ३,४७५ मी.ने खाली उतरते. रॉकी पर्वतातील पर्जन्यवृष्टी तसेच मॉस्क्विटो या हिमाच्छादित पर्वतश्रेण्यातील बर्फ वितळून व हिमानी सरोवरापासून या नदीच्या शीर्षप्रवाहांना पाणीपुरवठा होतो. एकेकाळी या नदीला येणाऱ्या पुरामुळे संपूर्ण खोरे पूरग्रस्त होई; परंतु तिच्यावर तसेच तिच्या उपनद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे काहीप्रमाणात पूरनियंत्रण झाले आहे. पाण्याच्या दृष्टीने मिसूरी आणि ओहायओ या मिसिसिपीच्या उपनद्यांपेक्षा आर्कॅन्सॉ ही उपनदी लहान आहे.

आर्कॅन्सा नदी, ओक्लाहोमा

आर्कॅन्सॉ नदीचा वरचा टप्पा ओबडधोबड रॉकी पर्वतातील असल्यामुळे तेथे नदी खोल व अरुंद दऱ्या आणि घळयांमधून वाहते. नदीपात्रात ठिकठिकाणी द्रुतवाह आणि जलप्रपात आहेत. त्यामुळे या प्रदेशात पाणी खळाळत वेगाने वाहत असल्याने पांढरे शुभ्र दिसते. लेडव्हिल या उगमस्थानापासून कॅन्यन सिटी (कोलोरॅडो राज्य) शहरापर्यंतच्या सु. १६० किमी.च्या पहिल्या टप्प्यात ही नदी प्रथम दक्षिणेस व त्यानंतर पूर्वेस वाहत जाऊन सु. २,०६० मीटरने ती खाली उतरते. कॅन्यन सिटीजवळ तिने सु. ३०० मी.पेक्षा अधिक खोलीची ‘रॉयल गॉर्ज‘ घळई तयार केली आहे. संयुक्त संस्थानांतील सर्वांत खोल घळयांपैकी ही एक आहे. या घळईच्या पूर्व टोकाशी कॅन्यन सिटी असून तेथूनच ही नदी पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडते. येथून दुसरा टप्पा मानला जातो. कॅन्यन सिटीच्या पूर्वेस असलेल्या प्वेब्लो शहरापासून ही नदी ग्रेट प्लेन्स या मैदानी प्रदेशातून वाहू लागते. कॅन्यन सिटी ते ग्रेट बेंड शहर (कॅनझस राज्य) यांदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात नदीचे पात्र रुंद, उथळ आणि नागमोडी वळणांचे व कमी उताराचे आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन केले जाते. ग्रेट बेंडपासून पुढे नदी आर्द्र प्रदेशातून आग्नेयीस वाहते. नदीचा तिसरा टप्पा अगदी सपाट व सखल असून नदीमार्गात अनेक नागमोडी वळणे आढळतात. येथे नदीपात्राची रुंदी अनेकदा ०.८ किमी.पर्यंत आढळते. संचयन कार्यामुळे नदीच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मैदाने निर्माण झाली असून ती शेती, शहरांची स्थापना आणि विकास या दृष्टीने अनुकूल ठरली आहेत. ऑर्कॅन्सॉ नदीला मिळणाऱ्या उपनद्यांपैकी उजवीकडून मिळणाऱ्या पर्गट्वार (कोलोरॅडो राज्य), सॉल्ट फोर्क, सिमरोन, ग्रँड, कॅनेडियन, नॉर्थ कॅनेडियन (ओक्लाहोमा राज्य), तर डावीकडून मिळणाऱ्या पव्नी, वॉलनट (कॅनझस राज्य), व्हर्दग्रस, नीओशो (ओक्लाहोमा राज्य), व्हाइट (आर्कॅन्सॉ राज्य) या प्रमुख उपनद्या आहेत. कॅन्यन सिटी, प्वेब्लो (कोलोरॅडो राज्य), गार्डन सिटी, डॉज सिटी, ग्रेट बेंड, विचिटॉ (कॅनझस राज्य), टलसा, मस्कोगी (ओक्लाहोमा राज्य), फोर्ट स्मिथ, लिटल रॉक, पाइन ब्लफ (आर्कॅन्सॉ राज्य) ही आर्कॅन्सॉ नदीकाठावरील प्रमुख शहरे आहेत.

आर्कॅन्सा नदीतील जलवाहतूक

आर्कॅन्सॉ नदीच्या पूरामुळे नदी खोऱ्यातील वसत्यांना या नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागतो. आर्कॅन्सॉ आणि ओक्लाहोमा या राज्यांतून आर्कॅन्सॉ नदीचे वाहणारे पात्र बरेच उथळ असल्यामुळे त्या प्रदेशात मोठ्या जहाजांतून नैसर्गिक रीत्या जलवाहतूक होत नाही; मात्र बारमाही मोठ्या जहाजांची वाहतूक सुकर व्हावी या दृष्टीने आर्कॅन्सॉ नदीतून मक्लेलन-केर आर्कॅन्सॉ रिव्हर नेव्हिगेशन सिस्टिम (M.K.A.R.N.S.) ही अंतर्गत जलवाहतूक प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. या एकूण ७१६ किमी. लांबीच्या वाहतूक मार्गाचे बांधकाम १९६३ मध्ये सुरू होऊन १९७१ मध्ये पूर्ण झाले. आर्कॅन्सॉबरोबरच व्हर्दग्रस आणि व्हाइट नद्यांच्या काही भागाचाही त्यासाठी उपयोग करून घेतला आहे. ओक्लाहोमातील टलसा या आधुनिक सुसज्ज बंदरापासून मिसिसिपी नदीपर्यंत हा मार्ग गेलेला आहे. ही प्रणाली पूर्ण झाल्यापासून आर्कॅन्सॉ नदीच्या मिसिसिपीतील मुखापासून टलसा बंदरापर्यंत जहाजे जाऊ शकतात. आर्कॅन्सॉ आणि व्हाइट या नद्यांना जोडणाऱ्या ‘आर्कॅन्सॉ पोस्ट कॅनॉल’ या छोट्या कालव्याचाही या प्रणालीत समावेश होतो. रॉबर्ट एस. केर आणि जॉन एल. मॅक्लेलन या दोन सिनेटरांचे नाव या प्रणालीला देण्यात आले असून अ. सं. सं.चे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड एम. निक्सन यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.

टलसा बंदर आणि आर्कॅन्सॉचे मिसिसिपीतील मुख यांच्या उंचीत १३० मी. चा फरक आहे. त्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने पाण्याच्या पातळीचे नियंत्रण करण्यासाठी आर्कॅन्सॉ नदीतील या जलमार्गात १८ जलपाश आणि धरणे बांधण्यात आली आहे. प्रत्येक जलपाश ३५ मी. रुंदीचा आणि १८० मी. लांबीचा आहे. त्यामुळे मोठी जहाजे त्यातून सहज ये-जा करू शकतात. एम.के.ए.आर.एन.एस. हा देशातील एक प्रमुख अंतर्गत जलमार्ग आहे. त्याच्या पूर्णत्वामुळे आर्कॅन्सॉ नदीच्या खालच्या टप्प्यांतील भौगोलिक वैशिष्ट्यांत बराच बदल झाला आहे. जलवाहतूक, पाणीपुरवठा, मासे व वन्य जीवांचे रक्षण, औद्योगिक विकास, जलविद्युत निर्मिती, पूरनियंत्रण, मनोरंजन आणि एकूणच प्रदेशातील अर्थकारणाच्या दृष्टीने हा जलमार्ग आणि नदीचे खालचे खोरे महत्त्वपूर्ण बनले आहे. कोलोरॅडो प्रदेशातून वाहणाऱ्या या नदीच्या खळखळत्या प्रवाहातून नौकाक्रिडा हा साहसी खेळ खेळला जातो. त्याचप्रमाणे त्यातून व्यापारी तसेच मनोरंजनासाठीची जहाजेही जातात. या जलमार्गातून प्रामुख्याने रासायनिक खते, कृषी उत्पादने (गहू, सोयाबीन इत्यादी), वाळू, रेती, दगड, लोखंड, पोलाद, खनिज तेल उत्पादने इत्यादींची वाहतूक केली जाते. नदीकाठावरील बंदरांच्या विकासामुळे नदीखोऱ्यात विविध उद्योगधंदे स्थापन झाले आहेत. नदीखोऱ्यातील राज्ये आणि विशेषत: आर्कॅन्सॉ राज्याचे नैसर्गिक पर्यावरण (भूवैशिष्ट्ये), वस्तीची प्रारूपे आणि अर्थव्यवस्था यांवर या नदीखोऱ्याचा प्रभाव पडलेला दिसतो. जॉन मार्टिन (कोलोरॅडो राज्य), कीस्टोन (ओक्लाहोमा राज्य) आणि दार्दानेल (आर्कॅन्सॉ राज्य) हे या नदीतील प्रमुख जलाशय आहेत.

आर्कॅन्सा नदी, नौका क्रिडा

स्पॅनिश समन्वेषक फ्रान्सिस्को व्हॅजक्वेझ दे कोरोनादो यांनी १५४१ मध्ये कॅनझस राज्यातील डॉन शहराजवळ ही नदी पार केली असावी, असे मानले जाते. त्याच वर्षी एर्नांदो दे सोतो (Hernando de Soto) या स्पॅनिश समन्वेषकांनी या नदीचे समन्वेषण करून आर्कॅन्सॉ – मिसिसिपी नद्यांचा संगम शोधून काढल्याचे मानले जाते. हे समन्वेषण करणारे ते पहिले यूरोपियन मानले जाते. पुढे सुमारे शंभर वर्षांनंतर फ्रेंच समन्वेषक लूइ जोलिएत आणि जॅक्वेस मार्क्वेटे हे आर्कॅन्सॉ नदीच्या मुखापर्यंत पोहोचले होते. अमेरिकन समन्वेषक झेब्युलन पाइक यांनी १८०६ मध्ये या नदीच्या वरच्या खोऱ्याचा प्रवास केला. यूरोपियनांना आपल्या वसाहतींच्या पश्चिमेकडील विस्ताराच्या दृष्टीने ही नदी महत्त्वाची ठरली होती. त्या वेळी स्थानिक अमेरिकन या नदीखोऱ्यात शिकारीचा व्यवसाय करीत असत. १८२० ते १८४६ यांदरम्यान संयुक्त संस्थाने आणि स्पॅनिश मेक्सिको यांमधील सरहद्द या नदीमार्गावरून मानली जाई.

समीक्षक – माधव चौंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा