कवडे, आवजी : (मृत्यू १७४९). अठराव्या शतकातील एक शूर आणि पेशव्यांचे निष्ठावान मराठा सरदार. त्यांचा जन्म नेमका कुठे व केव्हा झाला याची माहिती उपलब्ध नाही. कवडे घराणे हे मुळचे पंढरपूर जवळील गुरसाळे गावचे. हे घराणे मराठी राज्याच्या सेवेत कधीपासून आले, याविषयीही नेमकी माहिती उपलब्ध नाही; परंतु थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे आणि थोरले माधवराव पेशवे या तीन पेशव्यांच्या कारकिर्दीत प्रामुख्याने आवजी कवडे, शिवाय त्या़ंचा पुत्र महिपतराव कवडे व पुतण्या तुळाजी कवडे अशा तीन व्यक्तींचे उल्लेख मराठी कागदपत्रांत सापडतात. ‘खंडोजी कवडे’ हे चौथे नावही सापडते, पण पुराव्यांशिवाय त्यांचे आवजी कवडेंशी काही नाते असल्याचे निश्चितपणे तसे सांगता येत नाही.
कवडे घराण्याकडे नांदेड, वाशीम, धारूर, माहूर, पाथरी, बेदर वगैरे महाल यांची दिलेली कमाविशी महिपतराव कवडेंकडे कायम केलेली दिसते. हेच आवजी कवडेंचे प्रमुख कार्यक्षेत्र होते. अजनुज (जि. अहमदनगर) येथे आवजी कवडेंचा वाडा आहे. याच गावात बाजीरावांनी इ. स. १७२१ साली मुक्काम केल्याचा उल्लेख आहे. त्यावरून आवजी कवडे व बाजीराव पेशवे यांची आधीपासूनच ओळख असावी, असे दिसते. आवजी कवडेंच्या पत्रावरील शिक्का हा वर्तुळाकार असून, त्यात ‘श्री मार्तंडचरणी तत्पर आवजी कवडे निरंतर’ अशी अक्षरे कोरलेली दिसतात. आवजी कवडेंच्या मृत्युनंतरही त्यांचे सुपुत्र महिपतराव कवडे यांनी हाच शिक्का चालू ठेवला असावा, असे भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांचेतर्फे प्रकाशित झालेल्या चंद्रचूड दप्तरातील पत्रांवरून (कला पहिली, लेखांक २९,३०) दिसते.
इ. स. १७२७ च्या सुमारास निजामाच्या फौजा पुण्यावर चालून येत असताना, आवजींनी औरंगाबादेत इतका धुमाकूळ घातला की, निजामाच्या काही सरदारांना जुन्नर सोडून पुन्हा औरंगाबादकडे वळावे लागले. १७३०-१७३१ हा काळ सेनापती आणि पेशव्यांच्या आपसांतील लढायांनी डागाळला आहे. या काळात आवजी कवडे पेशव्यांच्या बाजूने सेनापती दाभाडेंविरुद्ध लढले.
इ. स. १७३७ साली चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणात पोर्तुगीजांविरुद्ध दंड थोपटले होते. २ मे १७३७ रोजी मराठ्यांनी तांदुळवाडी किल्ला जिंकून घेतला. किल्ला घेतेवेळी विठ्ठल विश्वनाथ व सोबत आवजी कवडेही मराठी फौजेत होते. २० मे १७३७ रोजी मनोरच्या खाडीजवळ पोर्तुगीजांनी केलेला हल्ला आवजी कवडे व इतर सरदारांनी परतवून लावला.
आवजी कवडेंनी वऱ्हाड-खानदेशातील निजामाच्या प्रदेशात उच्छेद चालवला होता (१७३६-३९). पुढे भोपाळच्या स्वारीत आवजी कवडे फौजेनिशी बाजीरावांच्या सोबतीला आले. बाजीरावांनी निजामाला भोपाळच्या कोटातच कोंडला होता. २७ डिसेंबर १७३७ रोजी नबाब बाहेर तळावर आला खरा; पण अचानक दुसर्या दिवशी सकाळी पाठीमागे भोपाळात गेला. मात्र मराठ्यांच्या फौजेतील आवजी कवडे व यशवंतराव पवार या दोघांनी सरळ निजामाच्या फौजेवर हल्ला चढवला. जाटांच्या फौजेत सरळ आत घुसून आवजींनी कापाकापी सुरू केली. ते पाहताच निजाम जागच्या जागीच थिजला. अखेर ६ जानेवारी १७३८ रोजी निजाम शरण येऊन त्याने बाजीरावांशी तह केला. भोपाळच्या संग्रामानंतर शाहू छत्रपतींनी आवजी कवडेंना पंचवीस हजार रुपये बक्षिस व पालखीचा बहुमान दिला होता. भोपाळ स्वारीच्या वेळेस निजामाने कबूल केलेल्या माळव्याच्या सनदा पदरात पाडून घेण्यासाठी नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत १७४१ साली मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे, गोविंद हरी व आवजी कवडे या मातबर मंडळीनी उत्तरेत स्वारी केली होती.
आवजी कवडेंचा स्वभाव बराचसा उद्दाम असावा, असे दिसते. एकदा त्यांनी चक्क छ. शाहू महाराजांच्या नातेवाईकांचीच धुळधाण उडवली होती. हा प्रकार शाहूराजांना बिलकूल आवडला नाही आणि त्यांनी दरबारातच आपला राग व्यक्त केला. आवजी कवडेंनी धुमाकूळ घातला, आवजी ऐकत नाहीत, यासाठी आवजी कवडेंबद्दल बरेचदा तक्रारी झालेल्या दिसतात. परंतु बाजीराव वा चिमाजी कोणीही आवजींच्या कामास खोडा घातलेला दिसत नाही. नागपुरकर रघुजी भोसले यांनी मात्र आवजी कवडेंना चांगलाच हात दाखवल्याचे उदाहरण १७३९ मध्ये आहे. इतके असूनही, संकट आले म्हणजे सर्वांस आवजी कवडेंची आठवण आलेली दिसते. ‘आपली दृष्टी स्वामीच्या चरणाविरहित आणखी स्थळे नाही.’ असा भाव आवजी कवडेंतर्फे चिमाजी आप्पांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त झालेला दिसतो. यावरून आवजींची पेशव्यांवरील निष्ठा व्यक्त होते. रियासतकार गो. स. सरदेसाई म्हणतात, ‘जोराने मुसंडी मारून वाटेल तिकडे गहजब उडवीत जाणारा निर्धास्त बंडखोर असे वर्णन आवजी कवड्याचे केल्यास ते वावगे होणार नाही.ʼ बाजीराव पेशव्यांची घोडदळावर भिस्त असणारी वेगवान, बेधडक युद्धपद्धती पाहता, त्यांनी आवजी कवडेंसारखे सरदार आपल्याकडे का बाळगले, याचे निश्चितच उत्तर मिळते.
कुरकुंभची फिरंगाई देवी ही पेशवे घराण्याचे मोठे श्रद्धास्थान. आवजी कवडेंचे सुपुत्र महिपतराव कवडे यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. याच महिपतरावांनी पंढरपूर विठ्ठल मंदिरात देवाच्या दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर बांधले आहे. अजनुज येथील आवजी कवडेंचा वाडा आजही सुस्थितीत आहे. गुरसाळे येथील विस्तीर्ण वाडा मात्र ढासळलेल्या स्थितीत आहे.
संदर्भ :
- कस्तुरे, कौस्तुभ; महाजन, प्रणव; कार्लेकर, शिवराम; गायकर, योगेश व इतर इतिहासाच्या पाऊलखुणा भाग ३, मुंबई, २०१९.
- देशमुख, गोपाळ, सोलापूर जिल्ह्याचा इतिहास, पुणे, २०१२.
- सरदेसाई गो. स. पेशवे दप्तरातून निवडलेले कागद – खंड १०, १५, १६, ३०,मुंबई, १९३३.
- सरदेसाई, गो. स. मराठी रियासत खंड ३, मुंबई, २०१२.
समीक्षक : कौस्तुभ कस्तुरे