आधुनिक पुरातत्त्वाची तुलनेने अलीकडच्या काळात विकसित झालेली एक उपशाखा. जे. आर. हंटर यांनी या विषयाचा घेतलेला पहिला आढावा १९९४ मध्ये प्रकाशित झाला. इंग्रजी शब्द फॉरेन्सिक याचा अर्थ न्यायालयात उपयोगी ठरणारी माहिती असा आहे. कोणत्याही कायदेविषयक प्रश्नाच्या संदर्भात पुरातत्त्वीय पुरावा सादर करणे हे न्यायसाहाय्यक पुरातत्त्वविज्ञानाचे मुख्य काम आहे. म्हणजेच ही उपशाखा न्यायदानाच्या कामात उपयोगी पडते. त्यामुळे तिचे स्वरूप एक उपयोजित शाखा या प्रकारचे आहे. यामध्ये वापरलेल्या पद्धती सर्वसामान्य पुरातत्त्वीयच असतात; फक्त अशा अभ्यासातून मिळालेले निष्कर्ष न्यायालयांच्या कार्यपद्धतीला अनुसरून सादर केले जातात. अशाच प्रकारचे काम न्यायसाहाय्यक मानवशास्त्रातही केले जाते. फरक इतकाच आहे, की यामध्ये फक्त मानवासंबंधी गुन्ह्यांची उकल करण्याच्या कामी मानवशास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो.
मुळात पुरातत्त्वविज्ञान आणि विधिशाखा यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत. दोन्हींत भूतकाळामध्ये काय घडले याचा मागोवा घेणे आणि घडलेल्या घटनांचा व वर्तनाचा अर्थ लावणे, हे मुख्य उद्दिष्ट असते. तसेच दोन्हींत पुराव्यांचा वापर करताना वस्तुनिष्ठपणे तार्किक आधारावर निष्कर्ष काढण्याच्या पद्धती ठरलेल्या असतात. न्यायदानाच्या कामात पुराव्याचा कायदा वापरला जातो; कारण न्यायालयात एखादी गोष्ट सिद्ध करताना पुरावा कशाला म्हणायचे, याची पक्की चैाकट आरोप करणाऱ्याला आणि बचावपक्षालाही उपलब्ध असणे गरजेचे असते. भारतात भारतीय पुरावा कायदा (१९७२) आणि फौजदारी प्रक्रियासंहिता (१९७३) हे दोन कायदे त्यांच्या दुरुस्त्यांसहित वापरले जातात.
फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये जेथे विशिष्ट पुरावा पुरातत्त्वीय पद्धतीने आवश्यक असेल, तेथे न्यायदानाच्या कामात न्यायसाहाय्यक पुरातत्त्वविज्ञानाचा वापर केला जातो. प्रामुख्याने हत्या, सार्वत्रिक हत्या, नाझी राजवटीत अथवा कंबोडियातील घटनांप्रमाणे वंश-उच्छेदाचे मानवतेविरोधी गुन्हे अशा प्रसंगी न्यायसाहाय्यक पुरातत्त्वविज्ञानाची मदत घेतली जाते. त्याचबरोबर शिकार, वन्य प्राणी आणि त्यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंची तस्करी या बाबतींतही न्यायसाहाय्यक पुरातत्त्वविज्ञानातील पद्धती वापरल्या जातात. इंग्लंडमध्ये १९६३-६५ दरम्यान झालेल्या कुप्रसिद्ध मूर्स हत्याप्रकरणात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध, युक्रेनमध्ये १९४२ मध्ये नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार आणि १९९५ मधील वांशिक संघर्षात बोस्नियात झालेल्या ८,००० लोकांच्या हत्येच्या संदर्भात न्यायसाहाय्यक पुरातत्त्वविज्ञानाच्या योगदानाची उदाहरणे आहेत. मानवतेविरोधी गुन्हेगारी उघडकीस आणण्यासाठी अथवा कोणत्याही प्रकारे प्राण्यांचे व मानवी अवशेष खोदून त्यांचा न्यायप्रक्रियेत वापर करण्याच्या बाबतीत न्यायसाहाय्यक पुरातत्त्वीय संशोधनासाठी न्यूरेंबर्ग संहिता (१९४७) ही नैतिक चौकट वापरली जाते. तसेच या कामात १९६४ मधील हेलसिंकी मसुद्याचा आधार घेतला जातो.
संदर्भ :
- Hunter, J. R. ‘Forensic Archaeology in Britainʼ, Antiquity, 1994.
- Hunter, J. R.; Roberts, C. A. & Martin, A. Studies in Crime: An Introduction to Forensic Archaeology, London, 1996.
- Hunter, J. R.; Cox, Margaret Forensic Archaeology, London, 2005.
- Morse, D.; Duncan J. & Stoutamire, J. Handbook of Forensic Archaeology and Anthropology, Tallahassee, Florida, 1983.
समीक्षक : सुषमा देव