म्यानमारच्या पूर्व-मध्य भागातून वाहणारी एक प्रमुख नदी. म्यानमारमधील शान पठाराच्या पश्चिम कडेवर, यामेदिनच्या ईशान्येस सितांगचा उगम होतो. हे उगमस्थान मंडालेच्या आग्न्येयीस आहे. उगमापासून दक्षिणेस सुमारे ४२० किमी. वाहत जाऊन अंदमान समुद्रातील मार्ताबानच्या आखाताला ती मिळते. पश्चिमेकडील अरण्यमय पेगूयोमा पर्वत आणि पूर्वेकडील तीव्र उताराचे शानचे पठार यांदरम्यान सितांगचे रुंद खोरे आहे. पेगू, तौंग्गू, यामेदिन व प्यिन्‌मॅना ही सितांगच्या खोऱ्यातील प्रमुख नगरे आहेत. यांगोन (रंगून) ते मंडाले यांदरम्यानचा रस्ता आणि लोहमार्ग या नदीच्या खोऱ्यातून जातो. या नदीचा मुखापासून ४० किमी. लांबीचा प्रवाह वर्षभर, तर ९० किमी.चा प्रवाह तीन महिन्यांसाठी जलवाहतुकीस उपयुक्त ठरतो. प्रामुख्याने सागाच्या लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी (निर्यातीसाठी) या नदीचा विशेष उपयोग होतो. खालच्या टप्प्यात कालव्याद्वारे सितांग नदी पेगू नदीला जोडली आहे. नदीच्या मुखातून येणाऱ्या भरतीच्या प्रचंड लाटांचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिने हा कालवा काढण्यात आला आहे. पुरातन काळात इरावती नदीचे खालचे खोरे याच नदीच्या खोऱ्यातून वाहत असावे व प्लाइस्टोसीन कालखंडातील (२६,००,००० ते ११,७०० वर्षांपूर्वी) भूहालचालींमुळे इरावतीचे खोरे पश्चिमेकडे सरकले असावे, असे भूशास्त्रावरून अनुमान निघते. सितांगचे खोरे सुपीक असून तेथील तांदळाचे उत्पादन महत्त्वाचे आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४२ च्या सुरुवातीस आणि मे १९४५ मध्ये सितांगच्या खोऱ्यात घनघोर युद्ध झाले होते.

समीक्षक : सं. ग्या. गेडाम