महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे राज्य. या प्रदेशावर मौर्य, सातवाहन, कदंब, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, दिल्लीचे सुलतान, विजयनगर, बहमनी, आदिलशाही आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी राज्य केले. इ. स. १४७० मध्ये विजयनगर साम्राज्याचा भाग असलेले गोवा बेट आणि बंदरावर महमूद गावानने जमिनीवरून आणि समुद्रातून १२० गलबतानिशी चाल करून गोवा बेट आणि बंदर ताब्यात घेतले.

आदिलशाही राजवटीपूर्वी येथे किल्ले बांधल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत; परंतु आदिलशाही काळात येथील प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधल्याच्या नोंदी सापडतात. पुढे पोर्तुगीज व मराठा बांधणीचे किल्ले देखील गोव्यात पाहायला मिळतात. पंधराव्या शतकाच्या अखेरीस बहमनी राज्यातून फुटून विजापूर येथे स्वतंत्र राज्य स्थापणाऱ्या युसूफ आदिलशाहाने गोवा आपल्या राज्याला जोडला. युसूफ आदिलशाहाने जुन्या गोव्यात राजवाडे बांधले. याच काळात त्यांनी या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी काही मोजके किल्ले बांधले. १५१० मध्ये या प्रदेशावर पोर्तुगीजांची सत्ता स्थापन झाली व गोवा पोर्तुगीजांचे मुख्य ठाणे राहिले. आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी १५७० पर्यंत गोव्याखेरीज साष्टी, बारदेश आणि तिसवाडीचा प्रदेश बळकावला. जिंकलेल्या प्रदेशाचे आणि बंदरांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी अनेक किल्ले बांधले, तर काही जुने किल्ले पाडून त्या जागेवर नवीन किल्ले बांधले आणि किल्ल्यांवर संरक्षणासाठी सैन्य व तोफा ठेवल्याची नोंद सापडते. गोव्यात सु. ४० किल्ले अस्तित्वात आहेत. या किल्ल्यांमध्ये त्रिकोणी आकाराचे बुरूज, बुरुजाच्या टोकावर असणारी बीजकोषाच्या (कॅप्सूल) आकाराची छोटी खोली, तोफांच्या माऱ्याच्या विस्तृत जागा, अर्धवर्तुळाकर अथवा चौकोनी कमानयुक्त दरवाजे, तोफांखेरीज बंदुका मारण्यासाठी जागा (जंग्या), खाडीच्या कडेपर्यंत बांधलेली तटबंदी यांसारखी पोर्तुगीज बांधणीची वैशिष्ट्ये दिसतात.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात छ. शिवाजी महाराजांनी कोकणपट्टीत नवे किल्ले बांधून आरमार वाढवल्यावर पोर्तुगीजांना दहशत निर्माण झाली. याच काळात सावंतवाडीकर भोसल्यांनी गोव्याच्या उत्तरेस काही किल्ले बांधले. सांप्रत मांडवी खाडीच्या उत्तरेकडील प्रदेशात तेरेखोल, अलोर्णा, शापोरा, खोरजुवे, सांव इश्तेव्हाव, राईश मागोस, आग्वाद यांसारखे किल्ले, तर मांडवीच्या दक्षिण प्रदेशात काबो-द-राम, मार्मागोवा, फोंडा, राशोल, बेतूल आदी किल्ले मराठी सत्तेपासून तसेच परकीय आरामारापासून संरक्षण करण्यासाठी बांधले गेले. गोव्यातील बहुतांश किल्ले प्रत्येक खाडीच्या मुखावर आणि खाडीच्या आतील बाजूस बांधलेले आढळतात. उत्तरेकडील तेरेखोल खाडीच्या मुखावर तेरेखोल किल्ला, शापोरा नदीच्या मुखावर शापोरा किल्ला तर आतील बाजूस अलोर्णा किल्ला, मांडवी नदीच्या मुखावरील आग्वाद, राईश मागोस, गॅस्पर दियास, तर आतील बाजूस नारोआ आणि सेंट इश्तेव्हाव किल्ला, जुवारी नदीच्या मुखावर मार्मागोवा तर आतील बाजूस रिचोल फोर्ट, साळ नदीच्या मुखावर बेतुल हे किल्ले दिसून येतात. बेतूल किल्ल्याच्या दक्षिणेकडील खोलगड किल्ल्याची रचना छ. शिवाजी महाराजांनी केली होती. नंतरच्या काळात खोलगड, राईश, सांव इश्तेव्हाव यांसारखे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले, तर पोर्तुगीजांनी गोव्यात सु. ४० च्या आसपास किल्ले बांधल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. पुढे यांतील निम्मे किल्ले पोर्तुगीजांनी पाडून टाकले. सांप्रत या किल्ल्यांचे अवशेषच पाहायला मिळतात. शापोरा किल्ल्याचा वापर जकातगृह म्हणून केला जात असे, तर आग्वाद किल्ल्यावरून पोर्तुगीज गलबतांना पाणी पुरवले जात असे. राईश मागोस या किल्ल्याचा उत्तरार्धात तुरुंग केल्याचे दिसते, तर काबो किल्ल्याचा वापर राजनिवास म्हणून केला जात असे. यांपैकी तेरेखोल, आलोर्ना, आग्वाद, राईश मागोस, सेंट इश्तेव्हाव या काही किल्ल्यांचे राष्ट्रीय व राज्य पुरातत्त्व विभागातर्फे जतन व संवर्धन करण्यात आलेले आहे.

संदर्भ :

  • Shirodkar, P. P. Fortresses and Forts of Goa, Directorate of Art and Culture Govt. of Goa, 2015.
  • कुंटे, भ. ग. गुलशन ए इब्राहिमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९८२.

                                                                                                                                                                                            समीक्षक : सचिन जोशी