अलेक्सिव्हिच, स्वेतलाना : (३१ मे १९४८). प्रसिद्ध बेलारशियन शोध पत्रकार, निबंधकार, मौखिक इतिहासलेखक. दुसरे महायुद्ध, सोव्हिएत रशियाचे विघटन, चर्नोबिल दुर्घटना आणि अफगाण युद्ध यातून निर्माण झालेल्या ताणतणावाच्या स्थितीची सत्यान्वेषी मांडणी स्वेतलानाने तिच्या साहित्यातून केली आहे. अशा विपरीत परिस्थितही स्त्रिया, मुले आणि सामान्यजन यांच्यातील आणि स्वतःतील धोरोदात्तपणा टिकवून आणि टिपून आभासापेक्षा वास्तव असे बहुआयामी लेखन तिने केले आहे. याच पार्श्वभूमीवर तिला २०१५ सालच्या साहित्यातील सर्वोच्च नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारी बेलारूसमधील ती पहिली लेखिका आहे. तिचा जन्म तत्कालीन रशियातील स्टान्लीस्लाव तेथे झाला. विघटनानंतर हे शहर आता युक्रेनमधील इवानो फ्रन्कीवच म्हणून ओळखले जाते. वडील बेलारशियन तर आई युक्रेनियन होती. वडील सैनिकी पेशात तर आई शिक्षिका होती.
तिचे बालपण बेलारूसमध्ये व्यतित झाले. शालेय शिक्षणही तेथेच पूर्ण झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने मिन्स्क येथील बेलारशियन स्टेट युनिव्हर्सिटीतून पत्रकारितेची पदवी प्राप्त केली (१९७२). महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच बॉरोझा आणि मिन्स्क येथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये पत्रकार म्हणून तिने कार्य केले. मिन्स्क येथील न्योमन या साहित्य नियतकालिकाचे बातमीदार म्हणूनही तिने काही काळ काम केले (१९७६). उमेदीच्या काळात तिच्यावर वास्तव आणि सत्य घटनांवर लेखन करण्यात निपुण असणाऱ्या ॲलिस ॲडॉमविच आणि आर्टथोम बोरोविक यांच्या लेखनाचा प्रभाव होता. पत्रकारितेच्या कारकिर्दित स्वेतलानाने साक्षीदारांच्या साक्षीवर आधारित लेखन करण्यात प्राविण्य मिळविले, यात तिने सोव्हिएत इतिहासातील अनेक नाट्यमय घटनांचे मौखिक इतिहास लिहिले. पत्रकारिता आणि साहित्य यांचा संकर घडवून तिने मानवी भावभावना इतिहासबद्ध केल्या. बेलारूस मधील लुकाशेन्को प्रशासनाने तिचा राजकीय छळ केल्यामुळे तिने २००० मध्ये बेलारूस सोडले. दरम्यान निर्वासितांच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने तिला अभय दिले. त्यानंतरच्या दशकात ती पॅरिस, गोथेनबर्ग आणि बर्लिनमध्ये राहिली. २०११ मध्ये ती पुन्हा मिन्स्कला गेली.
स्वेतलानाचे साहित्य सोव्हिएत विघटनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीतील व्यक्तिंच्या भावनिक इतिहासाच्या मुलाखतींचे सत्यान्वेषी चित्र आहे. रशियन लेखक आणि समीक्षक दिमित्री बायकोव्ह यांच्या म्हणण्यानुसार भयपटांचे वर्णन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कल्पनारम्यता नाही तर साक्षाधारित वास्तव आणि वस्तुसापेक्ष लेखन करणे होय. ही वास्तव आणि वस्तुसापेक्ष शैली स्वेतलानाच्या साहित्यात आहे. बेलारूसच्या ताब्यात असताना जर्मन सैन्याने जाळलेल्या खेड्यांविषयी तिने लिहिलेल्या माहितीपर कादंबरीला ॲलिस ॲडॉमविच यांनी आय ॲम फ्रॉम फायर व्हिलेज असे नाव दिले. मूळ रशियन भाषेत केलेले तिचे लेखन इंग्रजीत भाषांतरित केले आहे. War’s Unwomanly face ( इं.शी.,१९८५), last witneses (इं.शी.), Zinky Boys (इं.शी.१९९०), Voies from Chernobyl (इं.शी.१९९७), Secondhand Time : the last of the Soviets (इं.शी.२०१३) इत्यादी ग्रंथांचा तिच्या लेखन साहित्यात समावेश आहे.
War’s Unwomanly face हे तिची पहिली कादंबरी सोव्हिएत रशियातील मधील एका मासिकातून १९८४ मध्ये प्रसिध्द झाले. १९८५ मध्ये अनेक प्रकाशकांनी त्याच्या प्रती छापल्या. ही कादंबरी महिलांच्या एकपात्री स्वगतांनी भरलेली होती. यात दुसऱ्या जागतिक महायुध्दाबद्दल यापूर्वी कधी न अनुभवलेल्या अनुभवांचे चित्रण होते. The Last Witnesses: the Book of Unchildlike Stories यातून युद्धकाळातील लहान मुलांचे अनुभवांचे चित्रण आहे. लहान मुलं आणि महिलांच्या नजरेतून युध्दस्थितीचे वर्णन भावनांचे नवीन भावविश्व उभे करते. Enchanted with Death (1993) या पुस्तकातून सोव्हिएत युनियनच्या पडझडीमुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेले आणि आत्महत्या केलेल्यांबद्दल कथन आहे. अनेक लोकांना कम्युनिस्ट विचारधारेपासून वेगळे होणे अशक्य वाटले. इतिहासाचा नव्याने अर्थ लावून दिलेले आदेश पाळणे अनेकांना अशक्य झाले. तिची पुस्तके बेलारशियन राज्याच्या मालकीच्या प्रकाशन गृहांनी प्रकाशित केली नाहीत. १९९३ नंतर बेलारूस मधील काही खाजगी प्रकाशकांनी तिची दोन पुस्तके प्रकाशित केली. Chernobyl Prayer (1999), secondhand Time (2013) ही दोन्ही पुस्तके बेलारशिन भाषेत भाषांतरीत झाली.
स्वेतलाना स्वतःच्या या लेखन शैलीला शोधगम्य साहित्य (Documentary literature) म्हणून संबोधते. वास्तव आयुष्याच्या जवळ असेल अशी साहित्याची एक पद्धत ती शोधत आहे अशी तिची भूमिका आहे. वास्तविक अनुभवाचे कथन आणि कबुलीजबाब, साक्षी पुरावे आणि कागदपत्रे यांचा आधार लेखनासाठी तिने घेतला घेतला आहे. मानसिक आणि भावनिक क्षमतांचा आधार घेवून तिने लेखक, पत्रकार, समाजशास्त्र, मानसशास्त्रज्ञ आणि उपदेशक अशा भूमिका साहित्यातून पार पाडल्या आहेत. साहित्यातील नोबेल पुरस्कार (२०१५), ऑर्डर ऑफ द बॅज ऑफ ऑनर (१९८४), युनियन ऑफ सोव्हिएट रायटर्स (१९८५), नॅशनल बुक सिरिज सर्कल ॲवार्ड (२००५), ॲवार्ड फॉर लिटररी रिपोटेज (पोलंड,२०११), प्रिक्स मेडिसिस (२०१३), पीस प्राईज ऑफ द जर्मन बुक हेड (२०१३), ऑर्डर ऑफ द आर्टस् ॲण्ड लेटर्स (२०१४), बेलारशियन डेमोक्रॅटिक रिपब्लिक पुरस्कार (२०१८) इत्यादी पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/literature/2015/alexievich/facts/
- https://www.britannica.com/biography/Svetlana-Alexievich