मानसिक आजार म्हणजे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील बिघाड. मानसिक आजार हे व्यक्तीमधील दैनंदिन मानवी गरजा परिपूर्ण करण्याच्या प्रभावी आणि पारंपरिक क्षमतेमध्ये कमतरता निर्माण करतात. मानसिक आजारी व्यक्ती स्वत:साठी आणि समाजात स्वाभाविक वर्तणूकीसंदर्भात प्रतिसाद देण्याची क्षमता गमावते.

मानसोपचारज्ञांच्या निर्देशानुसार परिचारिका एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक आजार होण्याविषयी संभावना लक्षात घेते. उदा., १) जेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्याने समाजात स्वत:ला किंवा इतरांना त्रास होतो. २) जेव्हा त्या व्यक्तीच्या वागण्याने त्याच्या दैनंदिन नोकरीच्या ठिकाणी आणि कौटुंबिक संबंधात अडचण येते.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेली व्याख्या : व्यक्तीची स्वत:ची भावना किंवा विचार यांमध्ये बदल होतो किंवा त्याचा त्या व्यक्तीच्या स्वाभाविक वर्तणुकीवर परिणाम होतो आणि ज्यामुळे दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो अशा व्यक्तींच्या वर्तणूक व वर्तणुकीसंबंधित आजारास मानसिक आजार असे म्हणतात. (२॰॰१)

मानसोपचारज्ञांच्यापरिचारिकेच्या सल्ल्यानुसार मानसिक आजारांचे गुणधर्म :

  • व्यक्तीच्या भावना, विचार, समज, स्मरणशक्ती आणि वर्तणूक यामध्ये झालेला बदल हा समाजातील अपेक्षित निकष व वर्तवणूकीपेक्षा विचलित असल्याचे दिसते.
  • व्यक्तींमध्ये झालेले हे बदल त्या व्यक्तीस स्वतःसाठी किंवा समाजात इतरांना त्रास दायक ठरतात.
  • व्यक्तीच्या वर्तणुकीत झालेल्या या बदलामुळे व्यक्तीची दैनंदिन कामे व त्या संबंधित महत्त्वाचे आणि व्यावसायिक संबंध यामध्ये अडथळा निर्माण होतो.

मानसिक आजार प्रतिबंधासाठी परिचारिकेची भूमिका : १९६॰ च्या दशकात मानसोपचारज्ञ जेरार्ड केप्लान यांनी मानसिक आजार प्रतिबंधासाठी तीन स्तर दर्शविले आहेत ज्याअंतर्गत परिचारिका मानसिक आजार रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका राबवते. ही संकल्पना पुढील आकृतीद्वारे अधिक स्पष्ट होते.

मानसिक आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना

प्राथमिक प्रतिबंध ( Primary Prevention) : व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात एकजुटीने आयुष्याकडे  सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगण्याचा प्रयत्न करून मानसिक आजार रोखण्याच्या प्रक्रियेस प्राथमिक प्रतिबंध (primary prevention) म्हणतात.

परिचारिकेची भूमिका माता, मुले व इतर व्यक्ती यांच्यासाठी :

  • गर्भधारणेदरम्यान गरोदर मातेला विशिष्ट औषधांपासून आणि क्ष-किरणांपासून नवजात शिशु वर होणाऱ्या दुष्परिणामांचे परिचारिका शिक्षण देते.
  • नवजात बालकांच्या आईला पूर्वपरिपक्वता (prematurity) याबद्दल पूर्वकल्पना देऊन परिचारिका प्रसूतीदरम्यान नवजात बालकांची व आईची काळजी घेते.
  • नवजात बालकास प्रसूती दरम्यान होणाऱ्या जंतू संसर्ग व श्वासोच्छ्वासाच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी परिचारिका प्रसूती दरम्यान योग्य ती मदत करते.
  • नवजात बालकास अंतस्थ ग्रंथींचे आजार असल्यास त्वरित त्या बालकास उच्च उपचार पद्धती मिळण्यासाठी परिचारिका संदर्भ सेवा देण्याचा प्रयत्न करते.
  • आशा कर्मचारी व दायी यांच्या मदतीने बाल मार्गदर्शन क्लिनिक मध्ये परिचारिका ग्रामीण विभागातून मानसिक आरोग्य वर्धनाचे शिक्षण देऊन मुलांच्या संगोपनाविषयी माहिती पुरवितात .
  • मानसिक व शारीरिक अपंगत्व (जसे अंध, बहिरा, निशब्द इत्यादी) असणाऱ्या रुग्णांकरिता परिचारिका विविध उपक्रम राबवून त्या उपक्रमांची अंमलबजावणी करते.
  • शारीरिक व मानसिक अपंगत्व असलेल्या बालकांच्या पालकांना समुपदेशक म्हणून परिचारिका योग्य तो सल्ला पुरविते.
  • विद्यार्थ्यांना शाळेमधील भावनात्मक असंतुलन व शैक्षणिक प्रगतीत येणाऱ्या समस्या आणि अडथळे ओळखून परिचारिका त्यावर शाळेतील शिक्षक आणि पालकांच्या  सहयोगाने योग्य ती उपाययोजना करते. उदा., मानसोपचारज्ञांचा सल्ला घेते व समस्यांचे समुपदेशकच्या मदतीने  निराकरण करते.
  • कुटुंबातील सदस्यांना प्रतिकूल परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी आणि सकारात्मक जीवन शैली स्वीकारण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम परिचारिका करते.
  • परिचारिका ही मानसोपचारज्ञांच्या मदतीने पौगांडवस्थेतील किशोरवयीन मुले आणि सेवानिवृत्त व्यक्तींचे संक्रमण कालीन संकटातून मुक्त होण्यासाठी समुपदेशन करते.
  • परिचारिका अतिथी व्याख्यानाद्वारे पालकांना व शालेय शिक्षकांना मुलांची शारीरिक व मानसिक वाढ आणि विकास याबद्दल शिक्षण देते.
  • शाळेतील शिक्षकांना मुलांची वर्तणुकीतील समस्येबद्दल सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी योग्य ते शिक्षण परिचारिका प्रदान करते.
  • परिचारिका ही इतर आरोग्य कर्मचारी व संस्थांबरोबर काम करून मानसिक आरोग्य आणि मानसिक सबलता याबद्दल समाजातील लोकांना आरोग्य शिक्षण देते.
  • परिचारिका समुपदेशनाद्वारे वैवाहिक दांपत्यास त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांबद्दल योग्य तो सल्ला आणि संदर्भ सेवा देते.
  • परिचारिका लघूचित्रपट शो, फ्लॅशकार्ड व इतर दृक श्राव्य माध्यमांद्वारे समाजात मानसिक आरोग्य जपण्यास प्रोत्साहन देते व सामूहिक आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करते.

द्वितीय प्रतिबंध (Secondary Prevention) : मानसिक आरोग्यामध्ये व्यत्यय येणारी लक्षणं, चिन्हे शीघ्रतेणे शोधून त्यावर त्वरित अचूक मानसोपचार करून त्या रुग्णांची कार्यक्षमतेची स्वाभाविक पातळी परत मिळवणे या प्रक्रियेला द्वितीय प्रतिबंध असे म्हणतात.

परिचारिकेची भूमिका :

  • मानसिक आजाराचे त्वरित निरीक्षण करून त्या आजाराचा प्रकार शोधण्याचे कार्य परिचारिका करते.
  • परिचारिका मानसोपचारज्ञांच्या सल्ल्यानुसार मानसिक रुग्णावर त्वरित व प्रभावी उपचार पद्धती सुरू करते.
  • मनोरुग्ण व कुटुंबातील सदस्यांना मानसिक आरोग्य शिक्षण देते.
  • परिचारिका समुपदेशक म्हणून रुग्णास योग्य सल्ला पुरवते व संपूर्ण कुटुंबाला संकटातून मुक्त करण्याचा प्रयत्न करते.
  • मानसोपचारज्ञांशी संवाद साधून मानसिक- आजार पडताळणी शिबिर राबविण्याचे महत्त्वाचे कार्य गाव, जिल्हा व इतर संस्था याठिकाणी परिचारिका पूर्ण करते.

तृतीय प्रतिबंध पुनर्वसन (Tertiary Prevention Rehabilitation) : ‍मानसिक आजारी असलेल्या रुग्णांना आजाराशी संबंधित अस्वस्थता, मानसिक अपंगत्व व त्याची तीव्रता कमी करण्याच्या प्रक्रियेस व स्वाभाविक मानसिक आरोग्य मिळविण्यास तृतीय प्रतिबंध असे म्हणतात.

परिचारिकेची भूमिका :

  • मानसोपचारज्ञांच्या सल्ल्यानुसार व न्यायालयीन नियमांच्या अधीन राहून समाजात वावरत असलेल्या बेवारस मनोरुग्णांचे सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी परिचारिका मदत करते.
  • मनोरुग्णाची मानसिकता प्रबळ करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची मदत घेऊन परिचारिका मनोरुग्णाला व्यावसायिक पुनर्वसन व नोकरी शोधून देण्यात मदत करते.
  • मानसिक आजारी व्यक्ती रुग्णालयातून रवाना होताना परिचारिका कुटुंबातील सदस्यांचा सहभाग घेऊन समुह उपचार पद्धती राबवण्याचे कार्य करते.
  • रुग्णाला समाजाच्या कार्यशील भूमिकेत प्रोत्साहित करण्यासाठी परिचारिका मानसिक आरोग्य संस्था व कुटुंब यांच्याशी संवाद साधून मनोरुग्णाचा पाठपुरावा करते.
  • गृहभेट उपक्रमांद्वारे परिचारिका मनोरुग्णाला आवश्यकतेनुसार रुग्णाच्या घरी औषधोपचार नियोजनात मदत करते
  • मनोरुग्णाचे पुनर्वसन यशस्वी करण्यासाठी मानसिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी परिचारिका सहयोगात्मक संबंध निर्माण करून एकत्र काम करते.
  • रुग्णाची प्रबळ मानसिकता व दीर्घकालीन पुनर्वसनासाठी परिचारिका कुटुंब आणि समाजासोबत काम करते.

पहा : मनोरुग्णाचे पुनर्वसन आणि मनोरुग्ण परिचारिकेची भूमिका.

संदर्भ :

  • K Lalitha,  Mental Health and Psychiatric Nursing, An Indian Perspectives, 3rd Edition 2010.
  • Sreevani,  A Guide to Mental Health and Psychiatric Nursing; 4th Edition 2016.

                                                                                                                                                                                            समीक्षक : रोहिदास बिरे