मानवी उत्क्रांती हा केवळ जीववैज्ञानिक अथवा तत्त्वज्ञ यांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनादेखील कुतूहल वाटणारा विषय आहे. मानवजातीचा उगम कसा आणि कुठून झाला, तसेच मानव इतर प्राण्यांप्रमाणेच आहे, की त्याच्या अस्तित्वाला काही निराळे महत्त्व आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न जीवविज्ञान व तत्त्वज्ञानात किमान तीन हजार वर्षे केले जात आहेत. अनेक धर्मवेत्ते आणि तत्त्वज्ञांनी मानवाचा उगम व त्याच्या अस्तित्वाचा अर्थ याबद्दल विचार मांडले आहेत. यांशिवाय जगभरातल्या जवळजवळ सर्व जमातींच्या मौखिक परंपरा व मिथ्यकथांमध्ये विश्वाच्या व पर्यायाने मानवाच्या उत्पत्तीसंबंधी स्पष्टीकरण देण्याचे प्रयत्न झालेले आढळतात.
ग्रीक गणितज्ञ पायथॅगोरसचा शिष्य झेनोफानेस (इ.स.पू. पाचवे शतक) याने सिसिलीमधील सिराक्यूस आणि माल्टा येथील खाणींमध्ये माशांचे जीवाश्म पाहिले. हे जीवाश्म पूर्वी कधीतरी अस्तित्वात असणाऱ्या प्राण्यांचे पुरावे असतात आणि त्यांच्यामध्ये हळूहळू बदल घडत गेले, असे अनुमान झेनोफानेस याने काढले होते; तथापि प्लेटो, ॲरिस्टॉटल आणि त्यांच्या पठडीतील ग्रीक तत्त्वज्ञांना सजीवांचे जीवाश्म होतात, ही संकल्पनाच मान्य नव्हती. कारण ग्रीक विचारवंतांपासून ते आधुनिक काळापर्यंत प्रामुख्याने सर्व विश्व स्थिरावस्थेत असते, अशा स्वरूपाच्या प्लेटोप्रणीत सत्त्ववादी (Essentialism) तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली व विश्वाच्या उत्पत्तीला कोणी निर्माता कारणीभूत असल्याच्या कल्पनेला चिकटून असल्याने उत्क्रांतीच्या संकल्पनेचा विकास खुंटला होता. तथापि एकोणिसाव्या शतकात कार्ल लिनियस व कॉम्त दी बूफॉन यांचे काम आणि चार्ल्स डार्विन व आल्फ्रेड वॉलेस यांच्या सिद्धांतांमुळे उत्क्रांतिसंकल्पनेला मोठी चालना मिळाली. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा सर्वस्वी वेगळा असून तो विश्वनिर्मात्याने खास निवडलेला आहे; म्हणूनच त्याचे निश्चित असे काहीतरी जीवनकार्य आहे, त्यामुळे मानवी उत्क्रांतीचा विषय विज्ञानाचा नसून धर्मज्ञानाचा व अध्यात्माचा आहे, या जुन्या मतप्रणालीला डार्विन-वॉलेस सिद्धांताने जबरदस्त आव्हान दिले. उत्क्रांतीचा सिद्धांत एवढा क्रांतिकारक होता की, विश्वनिर्माता कल्पनेच्या पुरस्कर्त्यांनी आणि धर्मवेत्त्यांनी त्याची टर उडवली. जीवविज्ञानात हा सिद्धांत सर्वमान्य झाला असला, तरी उत्क्रांतीच्या सिद्धांताला अमान्य करणाऱ्या अनेक विरोधी विचारधारा आहेत.
मानवी उत्क्रांतीच्या क्षेत्रात पुराजीवविज्ञान, पुरामानवशास्त्र, जीवविज्ञान आणि विशेषतः प्रायमेट गणातील प्राण्यांचा अभ्यास करणारे प्रायमेटविज्ञान या ज्ञानशाखांच्या परस्परसहकार्याने प्राचीन मानवांची जैविक रचना, शारीरिक उत्क्रांती, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती यांबद्दल संशोधन केले जाते. प्राचीन मानवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचा आणि त्यांनी रंगवलेल्या चित्रांचा अभ्यास पुरातत्त्वविद्येमधील प्रागितिहासात केला जातो. रेणवीय जीवशास्त्रामधील नवीन तंत्रज्ञानाने मानवी उत्क्रांतीच्या विषयात क्रांतिकारक बदल घडविले आहेत. सजीवांच्या जीवनचक्राची सगळी माहिती डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक) रेणूंमधे साठविलेली असते. त्याचे काही अंश पुरातत्त्वीय अवशेषांमधे टिकून राहू शकतात. त्यामुळे प्राचीन मानवी डीएनए रेणूंच्या अभ्यासाला गती मिळाली आहे.
मानवाचा समावेश प्रायमेट या गणात होतो. याच गणात माकडे व मानवेतर कपी आहेत. मानवाची उत्क्रांती माकडांपासून अथवा चिंपँझी व गोरिलांसारख्या कपींपासून झाली अशी (गैर) समजूत आहे. तथापि मानवाची उत्क्रांती मर्कट, कपी व मानवसदृश प्राण्यांच्या सामायिक पूर्वजांपासून (Common ancestor) सावकाश झाली असल्याचे जीवाश्मांच्या पुराव्यांवरून दिसते. मानवी उत्क्रांतीच्या दिशेने बदल घडण्याचा प्रवास गेल्या तीन कोटी वर्षांचा आहे. सुमारे अडीच ते तीन कोटी वर्षांपूर्वी माकडे व कपी (सध्या अस्तित्वात असलेले गोरिला, ओरँगउटान, चिंपँझी, मानव आणि बोनोबो) यांचे पूर्वज वेगळे झाले. तर सध्या अस्तित्वात असलेल्या मानवेतर कपिंपासून (गोरिला, ओरँगउटान, चिंपँझी आणि बोनोबो) मानव परजातीच्या पूर्वजांच्या उत्क्रांतीची शाखा वेगळी होण्याचा कालखंड सुमारे ६० ते ८० लक्ष वर्षपूर्व असा आहे.
मानव, चिंपँझी, बोनोबो, गोरिला आणि ओरँगउटान यांचे पूर्वज यांना मिळून होमिनिड असे म्हणतात; तर आधुनिक मानव, नष्ट झालेले होमोप्रजातीचे सर्व मानव, आर्डीपिथेकस, ऑस्ट्रॅलोपिथेकस आणि पॅरान्थ्रोपस यांना मिळून होमिनिन अशी संज्ञा वापरली जाते. होमिनिन जीवाश्मांचे चार गटांत वर्गीकरण केले जाते. हे चार गट म्हणजे मानवी उत्क्रांतिवृक्षावरील चार स्वतंत्र शाखा आहेत. सर्वांत अगोदर उत्क्रांत झालेल्या व आता फक्त जीवाश्मस्वरूपात आढळत असलेल्या पहिल्या गटात आर्डीपिथेकसच्या दोन प्रजाती आहेत. दुसऱ्या गटाला ऑस्ट्रॅलोपिथेकस गट असे म्हणतात. यात ऑस्ट्रॅलोपिथेकस प्रजातीच्या पाच जाती आहेत. तिसरा गट हा पॅरान्थ्रोपसच्या दोन प्रजातींचा आहे. चौथ्या गटात आपल्या होमो सेपियन्स प्रजातीसह होमोप्रजातीच्या सर्व मानव प्रजातींचा समावेश होतो. यांखेरीज ओरोरिन टुजेनेन्सिस (५८ ते ६२ लक्षवर्षपूर्व) आणि साहेलान्थ्रोपस टाकाडेन्सिस (६० ते ७० लक्षवर्षपूर्व) या दोन प्रजातींचे जीवाश्म आफ्रिकेत मिळाले आहेत; तथापि यांचा समावेश होमिनिन गटात करण्याजोगे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.
आधुनिक मानव व उत्क्रांतींच्या विविध टप्प्यांवर असलेले जीवाश्म मानव आणि यांखेरीज असणारे इतर प्रायमेट प्राणी यांच्यात अनेक बाबतींत फरक आहेत. मानवी उत्क्रांतीच्या संदर्भात मानव कोणाला म्हणायचे, यासाठी पुढील काही वैशिष्ट्यांचा विचार केला जातो : (१) दोन पायांवर चालणे, (२) अवजारांचा व हत्यारांचा वापर, (३) अग्नीचा वापर आणि प्रक्रिया करून अन्न खाणे, (४) शरीररचनेतील बदल, (५) मोठा आणि अधिक गुंतागुंतीची रचना असलेला मेंदू, (६) अन्न मिळून खाणे, बालकांची निगा व सामाजिक अनुबंधांची निर्मिती, (७) परस्परसंवादासाठी रंग, शब्द, प्रतीके व भाषेचा वापर आणि (८) आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याखेरीज (अनुकूलन) ती परिस्थिती बदलण्याची मानसिक क्षमता. यांशिवाय विचार करणारे व सर्जनशील मन, काल व अवकाश या संकल्पनांचे आकलन असलेली बुद्धी, स्वभान आणि आपण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळे असल्याची जाणीव ही इतर काही मानवी वैशिष्ट्ये आहेत. जरी इतर कपींप्रमाणेच शरीररचना असलेल्या प्राण्यांप्रमाणेच मानवाचे पूर्वज असले, तरी उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर वरीलप्रमाणे हळूहळू बदल घडून आजच्या मानवजातीचा उदय झाला. मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस जाती उत्पन्न झाल्या; परंतु आज फक्त होमो सेपियन्स टिकून आहेत.
मानवी उत्क्रांतीच्या क्षेत्रात सातत्याने नवनवीन जीवाश्मांचा शोध लागतो. अगोदरच्या काळात मिळालेल्या जीवाश्मांचा नव्याने अभ्यास होतो. कालमापनातील प्रगतीमुळे मानवी उत्क्रांतीच्या कालक्रमात बदल घडून येतात. तसेच प्राचीन डीएनए रेणूंवरील संशोधनामुळे नवीन माहितीवर आधारित नवे सिद्धांत मांडले जातात. म्हणूनच या क्षेत्रात अनुमानांमध्ये सतत बदल होताना दिसतात.
संदर्भ :
- Cloud, David W. The Ape Men, Port Huron, 2015.
- Hösle, V. & Illies, C. Eds. Darwinism and Philosophy, Notre Dame, 2005.
- Kennedy, K. A. R. God-Apes and Fossil Men : Paleonanthropology of South Asia, Ann Arbor, 2000.
- Mayr, E. The Growth of Biological Thought, Massachusetts, 1982.
- Ruse, M. The Evolution-Creation Struggle, Cambridge, 2005.
- Sarkar, S. & Plutynski, A. Eds. Companion to the Philosophy of Biology, Oxford, 2008.
- Sober, E. Philosophy of Biology, Boulder (Colorado), 2000.
- Tuttle R. H. Apes and Human Evolution, Cambridge, 2014.
- Wilson, E. O. Sociobiology, Cambridge, 1975.
समीक्षक : सुषमा देव
Hyperlink with other articles from Marathi Vishwakosh or Kumar Vishwakosh
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर. डॉ. प्रमोद जोगळेकर यांचा ई मेल पुढीलप्रमाणे pramod.joglekar@dcpune.ac.in
डॉ प्रमोद जोगळेकर तुम्ही लिहिलेले सर्व मानवी जीवाश्मावरील लेख वाचले. मी जीवविज्ञान ज्ञानमंडळाचा समन्वयक आहे. आपण उत्क्रांती विज्ञानात मोलाची भर घालू शकाल असे मला वाटते. कृपया आपली मेल आय डी खालील मेल वर पाठवल्यास आपल्याशी संपर्क साधता येईल . ध्यन्यावाद 9370425899