स्टकली, विल्यम : (७ नोव्हेंबर १६८७ – ३ मार्च १७६५). स्टोनहेंज आणि ॲव्हबरी या इंग्लंडमधील जगप्रसिद्ध वारसास्थळाचे संशोधन करणारे व पुरातत्त्वात क्षेत्रीय अभ्यासाचे महत्त्व सर्वप्रथम विशद करणारे ब्रिटिश पुरावस्तू संग्राहक. त्यांचा जन्म लिंकनशायर परगण्यातील होलबीच येथे झाला. त्यांनी कॉर्पस क्रिस्टी कॉलेज, केंब्रिज येथे वैद्यकीय पदवी (एम. बी.) घेतली आणि मग ते पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये त्यांनी वैद्यकीचा पुढील अभ्यास सुरू केला आणि बोस्टन (लिंकनशायर) येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला (१७१०). ते लंडनला परतले (१७१७) आणि त्याच वर्षी ते रॉयल सोसायटीचे फेलो बनले. स्टकली यांनी एम. डी. पदवी घेतली (१७१९) आणि पुढे ते रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे फेलो बनले (१७२०).

स्टकली यांनी वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच पुरातत्त्वशास्त्रीय निरीक्षणास सुरुवात केली होती. पंधरा वर्षांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश ग्रामीण भागात घोड्यावर बसून उन्हाळ्यात भरपूर प्रवास केला. त्यांच्याकडे तपशीलवार निरीक्षण करण्याची खास क्षमता होती. त्यांनी पाहिलेल्या सर्व गोष्टींचे अचूक वर्णन आणि रेखाटन केले. त्यामुळे त्यांच्या या अनुभवांवर लिहिलेले आयटिनेरियम क्युरियोसम (१७२४) हे पुस्तक ब्रिटनमधील कृषी आणि औद्योगिक क्रांतीमुळे ऐतिहासिक वास्तू आणि पुरातत्त्वीय अवशेष नष्ट होण्यापूर्वीचा महत्त्वाचा ऐतिहासिक स्रोत आहे.

स्टकली सोसायटी ऑफ अँटिक्वेरीजच्या स्थापनेत सहभागी झाले (१७१८) आणि पहिले सचिव म्हणून नऊ वर्षे काम केले. जॉन ऑब्रे यांनी १६४९ मध्ये ॲव्हबरी येथील अवशेष शोधून काढले होते. स्टकली यांनी सचिव पदावर असताना स्टोनहेंज आणि ॲव्हबरी येथे उत्खनन केले. या उत्खननाचे अहवाल त्यांनी दोन पुस्तकांमध्ये प्रसिद्ध केले (१७४०; १७४३). पुढे बेकहँप्टन अव्हेन्यू येथील पुरातत्त्वीय शोध लागणे स्टकली यांच्या पूर्वीच्या निरीक्षणांमुळे शक्य झाले.

स्टोनहेंज आणि ॲव्हबरी येथील अवशेष रोमन कालखंडापूर्वीच्या ड्रुइड (Druids) या स्थानिक लोकांचे असल्याची जॉन ऑब्रे यांची कल्पना स्टकली यांनी उचलून धरली. त्यांचे लेखन इतके रोमहर्षक होते की, ही वारसास्थळे आणि ड्रुइड्स यांच्यातील संबंध लोकांच्या मनात पुढे दीर्घकाळ टिकून राहिला. त्यांनी इतर कथित ड्रुइड अवशेषांवर विपुल लेखन केले आणि ॲव्हबरी येथील शिळावर्तुळांना (Stone circles) जोडणाऱ्या वळसेदार मार्गांचा संबंध ब्रिटनमध्ये प्रचलित असलेल्या ड्रॅगनच्या दंतकथांसोबत जोडला. आधुनिक काळात छद्मपुरातत्त्व अथवा भ्रामक पुरातत्त्व (Pseudoarchaeology) या विचारसरणीचा प्रसार करणाऱ्यांनी, विशेषतः पुराखगोलशास्त्र (Archaeoastronomy) या नावाखाली केल्या जाणाऱ्या लेखनात, स्टकली यांच्या रोमहर्षक कल्पनाविलासाचा भरपूर उपयोग केलेला दिसतो.

स्टकलींचे असे लेखन हा काही प्रमाणात कल्पनाविलास असला, तरी त्यांचे निरीक्षण करण्याचे कौशल्य उत्तम होते. शिळावर्तुळांचा उद्देश खरोखरच प्रागैतिहासिक लोकांच्या विश्वासांशी जोडलेला असावा आणि त्यांच्यावरील निरीक्षणाचा उपयोग गणित, अभियांत्रिकी आणि खगोलशास्त्र, सामाजिक संस्था आणि धर्माविषयीच्या ज्ञानाबद्दल अनुमाने काढण्यासाठी केला जाऊ शकतो, हे त्यांनी ओळखले होते. त्यांनीच सर्वप्रथम स्टोनहेंजचा काळ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि तो इ. स. पू. ४६० असल्याचे (आता मान्य न झालेले) मत मांडले. स्टोनहेंजचे बांधकाम करणाऱ्यांना चुंबकत्वाबद्दल माहिती होती आणि त्यांनी रचना करताना चुंबकीय उत्तर ध्रुवाचा विचार केला होता, असे त्यांनी प्रतिपादन केले.

स्टकली यांची लिंकनशायरमधील स्टॅमफोर्डमधील ऑल सेंट्स चर्चचे व्हिकार म्हणून नियुक्ती झाली (१७२९). या पदावर असताना स्टकलींनी लिंकनशायरमधील ख्रिश्चन अवशेषांवर बरेच संशोधन केले. त्यानंतर त्यांची ब्लूम्सबरी, लंडन येथील पॅरिशचे रेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन ब्रिटनमध्ये नव्याने वाढत चाललेल्या फ्रीमॅसनरी (Freemasonry) या गूढवादी संघटनेकडे आकर्षित झालेल्या पहिल्या काही विद्वानांपैकी स्टकली हे एक होते. स्टकली व आयझॅक न्यूटन यांची मैत्री होती आणि त्यांनी न्यूटनबद्दलच्या आपल्या आठवणींचे पुस्तक एक लिहिले आहे (१७५२).

लंडन येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Burl, Aubrey, Rings of Stone: The Prehistoric Stone Circles of Britain and Ireland, The Harvill Press, London, 1999.
  • Hawkins, Gerald S. Stonehenge Decoded, Hippocrene Books, New York, 1988.
  • Piggot, Stuart, William Stukeley: An Eighteenth-Century Antiquary, Thames and Hudson, New York, 1985.

                                                                                                                                                                         समीक्षक : जयेंद्र जोगळेकर