पाण्यात बुडलेले एक गुलामवाहक जहाज. नाविक (नॉटिकल) पुरातत्त्वाच्या इतिहासात फ्रेडेन्सबोर्ग या गुलामांची वाहतूक करणाऱ्या जहाजाच्या संशोधनाला महत्त्वाचे स्थान आहे. याचे पहिले कारण म्हणजे जहाजबुडीच्या पुरातत्त्वातील सर्वांत चांगले उत्खनन झालेल्या दोन जहाजांपैंकी ते एक आहे (दुसरे सन १७०० मध्ये बुडलेले हेनरिटा मारी). दुसरे कारण म्हणजे फ्रेडेन्सबोर्गच्या पुरातत्त्वीय अभ्यासामुळे जगाच्या इतिहासातील वसाहतवादाच्या कालखंडातील ‘त्रिकोणी व्यापारʼ (Triangular Trade) याबद्दल माहिती मिळाली.

फ्रेडेन्सबोर्गचे अज्ञात चित्रकाराने काढलेले एक चित्र.

सोळावे शतक ते एकोणिसावे शतक या काळात यूरोपातल्या जवळजवळ सर्वच देशांनी जगभर एका विशिष्ट प्रकारे व्यापार करून अमाप संपत्ती गोळा केली. त्याचा त्रिकोणी व्यापार हा एक भाग होता. वसाहतवादी देश यूरोपातून कापड, शस्त्रे आणि दारू आफ्रिकेला पाठवत. आफ्रिकेतील गरीब व दुबळ्या आदिवासींना पकडून त्यांना अमेरिकेत नेत आणि तेथे गुलाम म्हणून त्यांची विक्री करून झाल्यावर तेथून साखर, कॉफी आणि तंबाखू घेऊन जहाजे यूरोपला परतत. या व्यापारासंबधी जरी काही प्रमाणात लिखित नोंदी असल्या, तरी मानवतेला कलंक असणाऱ्या या इतिहासाला फ्रेडेन्सबोर्ग आणि हेनरिटा मारी या बुडलेल्या जहाजांच्या संशोधनाने भक्कम पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध झाले.

फ्रेडेन्सबोर्ग हे जहाज डॅनिश वेस्ट इंडिया गिनी कंपनीच्या मालकीचे होते. त्याची बांधणी कोपनहेगन येथे १७५२ मध्ये झाली. या जहाजाने ‘क्रॉन प्रिन्स ख्रिश्चनʼ (Cron Prins Christian) या नावाने त्रिकोणी व्यापाराच्या पाच मोहिमा पूर्ण केल्या. त्यानंतर या कंपनीची जागा गिनी कंपनीने घेतल्यावर जहाजाचे नामकरण १७६५ मध्ये फ्रेडेन्सबोर्ग असे झाले. या जहाजाने आफ्रिकेतील गोल्ड कोस्ट येथून पकडलेले २६५ गुलाम डॅनिश वेस्ट इंडिजमध्ये विकले आणि ते परतीच्या प्रवासात असताना १ डिसेंबर १७६८ रोजी उथळ पाण्यात शिरल्याने नॉर्वेच्या दक्षिण भागातील ट्रोमोय येथे अपघातग्रस्त होऊन बुडले. जहाज बुडलेला भाग उथळ असल्याने जहाजावरचे जवळजवळ सर्वजण वाचले. इतकेच नाही तर जहाजावरची सर्व दैनंदिन नोंदणीपुस्तके (Logbooks) वाचवता आली. गुलामवाहक जहाजांच्या प्रवासावर आणि गुलामविक्रेत्या कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारा हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज ठरला. फ्रेडेन्सबोर्गचे कोणा अज्ञात चित्रकाराने काढलेले एक चित्र उपलब्ध आहे.

फ्रेडेन्सबोर्ग अपघातग्रस्त झालेली जागा १९७४ मध्ये सापडली. ओस्लोच्या नॉर्वेजियन मेरिटाइम म्युझियमने १९७५ ते १९७७ या काळात पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले. यानंतर आरेंडल येथील आउस-ॲडगर म्युझियमने १९९५ ते १९९७ या काळात सर्वेक्षण व उत्खनन केले. जहाजाची भरपूर प्रमाणात मोडतोड झाली असली, तरी शिडाचे काही भाग, डेक आणि इतर लाकडी भाग टिकून राहिले होते. फ्रेडेन्सबोर्ग आफ्रिकेतून विविध प्रकारचा माल घेऊन येत होते. त्यामधील हिप्पोपोटॅमसचे दात व हस्तीदंताचा मोठा साठा आणि जहाजावरच्या तोफा व इतर शस्त्रे पाण्याखालील उत्खननात सापडली. तसेच आफ्रिकन लोकांच्या चिलमी आणि गुलामांना बांधण्याच्या लोखंडी साखळ्या व आकडे सापडले.

संदर्भ :

  • Black, Jeremy, The Atlantic Slave Trade in World History, Routledge, New York, 2015.
  • Svalesen, Leif, The Slave Ship Fredensborg, Indiana University Press, Indianapolis, 2000.
  • Webster, Jane,  ‘Slave Ships and Maritime Archaeology: An Overviewʼ, International Journal of Historical Archaeology, 12: 6-19, 2008.

                                                                                                                                                                                           समीक्षक : शंतनू वैद्य