मेहंदळे, अनंत महादेव : ( ७ फेब्रुवारी १९२८ – २४ एप्रिल १९९२ ). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार.  पुणे जिल्ह्यातील मळवली जवळ भाजे गावी  महादेव आणि पार्वतीबाई यांच्या पोटी अनंतबुवांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण सुरू असतानाच वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी पहिले कीर्तन करायचे भाग्य त्यांना लाभले आणि लहान वयातच त्यांना कीर्तनाची आवड निर्माण झाली. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील रोहा गावी संस्कृत पाठशाळेत त्यांचा  वेदाध्ययन आणि संस्कृत भाषेचा अभ्यास सुरु होता. पुढे पुण्यातील साखरे महाराज मठात राहून माधुकरी मागून त्यांनी धार्मिक अभ्यासात शिक्षण सुरू केले. त्यांनी कोलकाता येथील संस्कृत भाषेसंबंधीच्या एका संस्थेची ‘ काव्यतीर्थ ‘ ही पदवी मिळवली. ही पदवी प्राप्त केल्यामुळे त्यांना अष्टांग आयुर्वेद कॉलेजतर्फे त्यांना शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ती नोकरी स्वीकारण्यापूर्वी बुवांनी आधी आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण करून वैद्यकाची  पदवी मिळवली आणि त्यानंतरच ही नोकरी स्वीकारली. ‘ आयुर्वेद प्रवीण ‘ परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिक्षकी पेशा स्वीकारण्याऱ्या अनंतबुवांनी नारदीय कीर्तनाचा अभ्यासही सुरू केला होता. वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मणशास्त्री गुर्जर यांचेकडे नारदीय कीर्तनाचा अभ्यास त्याचबरोबर गायनाचे शिक्षण, यशवंतबुवा मराठे गुरुजी यांच्याकडे त्यांनी सुरु ठेवले. पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अनंतबुवा हे सहाध्यायी होते. याच दरम्यान ” साहित्यरत्न ” ही पदवी देखील बुवांनी प्राप्त केली.

काही दिवस त्यांनी आयुर्वेद वैद्यकी केली आणि नंतर फक्त कीर्तन हेच आयुष्याचे साधन आणि साध्य म्हणून स्वीकारले. अतिशय शुद्ध आणि रसाळवाणी विद्ववतप्रचुर भाषा, मराठी, संस्कृत, इंग्रजी या तिन्ही भाषांसह न्याय , व्याकरणमीमांसा, उपनिषद, वेद, अनेक संस्कृत ग्रंथ अशा अनेक विषयांवर लीलया केलेले भाष्य हे बुवांचे कीर्तन विशेष होत . सहज बोलता बोलता शाब्दिक कोट्या करीत कीर्तनातील जागतेपण शिल्लक ठेवणे ही त्यांची खासियत  होती. याचमुळे कीर्तन क्षेत्रात अनंतबुवा ‘ कोट्याधीश बुवा ‘ म्हणून ओळखले जात असत. बुवांच्या कीर्तनात , बोलण्यात सहजता होती. म्हणूच विद्वानांपासून सामान्य श्रोत्यांपर्यंत प्रत्येकालाच कीर्तनातील अवघडातील अवघड विषय सहज समजत असे.

पुण्यातील ” श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा ” येथे आणि गोव्यात  १९८५ ते १९९१ या काळात समर्थ रामदास प्रतिष्ठान आयोजित कीर्तन वर्गात बुवांनी कीर्तनाचे अध्यापन देखील केले.  बुवांचा शिष्यवर्ग खूप मोठा आहे.  कीर्तनकार म्हणून श्रेष्ठ असणारे बुवा उत्तम रंगकर्मी देखील होते. संस्कृत शाकुंतल,संगीत सौभद्र , संशयकल्लोळ, देवमाणूस, शिलेदार कंपनीच्या आस जिजाऊची आणि अस्तंगत भानू अशा अनेक नाटकातील भूमिका बुवा उत्तमप्रकारे वठवत असत. योगाभ्यासतही बुवा पारंगत होते.  कीर्तन शिकणाऱ्या नवख्या होतकरू विद्यार्थ्यांकरीता अनंतबुवांनी दोन  पुस्तके लिहिली . त्यातील पहिले पुस्तक कीर्तन कुसुम . या पुस्तकात पूर्वरंग आणि चरित्र आहेत . तसेच दुसरे पुस्तक स्वामी विवेकानंद यांचे संपूर्ण चरित्र कीर्तनातील वृत्त रचनांसह लिहिले आहे . वैद्यकी सोडून चरितार्थाकरिता संपूर्णतः हरिकीर्तनाचा मार्ग स्वीकारून बुवांनी पंचावन्न वर्षे अखंड कीर्तन सेवा केली. आयुष्यभर कीर्तन हाच ध्यास घेवून भारतभर कीर्तने केली. त्यांनी  अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवले. ‘ कीर्तनकला निधी ‘ , ‘ काव्यतीर्थ ‘, ‘तत्वचिंतन रवी ‘ , ‘ कोटीभास्कर ‘ आणि आयुर्वेद विषयातील वैद्यक पदवी प्राप्त केलेल्या बुवांनी ‘ श्री हरिकीर्तनोत्तजेक सभा ‘ या संस्थेत अनेक वर्षे कार्यवाह, कुलपती, कार्योपाध्यक्ष इ . पदे देखील भूषवली आहेत.

बुवांनी अनेक विद्यार्थी घडविले. त्यामध्ये पुण्यातील कीर्तनकलानिधी रामचंद्रबुवा भिडे, गोव्यातील मनोहरबुवा जोग, दामोदरबुवा च्यारी, केशवबुवा शिवडेकर, सामंतबुवा, सुहासबुवा वझे या  नावांचा नावे विशेषत्वाने उल्लेख करावा लागतो. पुण्यात श्रीनारद मंदिर, कसबा गणपती, खुन्या मुरलीधर मंदिर, अरण्येश्वर मंदिर तसेच मुंबई , कोल्हापूर, सातारा, रायगड जिल्हा, खान्देश, कोकण, गोवा, इंदोर, दिल्ली, उज्जैन याचबरोबर श्रीलंका इ . ठिकाणी बुवांनी अगणित कीर्तनसेवा केली आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे रोहा, धुळे जिल्ह्यातील शहादा – दापोली जवळ ‘ गव्हे ‘ या गावी सलग ३५ वर्षे त्यांनी कीर्तन सेवा सादर केली. मुंबईतील काळाराम मंदीर येथे एकाही विषयाची पुनरावृत्ती न करता सलग पाच वर्षे चातुर्मास कीर्तन त्यांनी केले. आजमितीला बुवांनंतर त्यांचे चिरंजीव नंदकुमार मेहेंदळे त्यांच्या दोन्ही स्नुषा तसेच त्यांच्या नातवंडांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी आणि बुवांचे इतरही सर्व विद्यार्थी बुवांची कीर्तन परंपरा पुढे चालवीत आहेत. वयाच्या  ६४ व्या वर्षी बुवांनी देह ठेवला.
संदर्भ : क्षेत्र संशोधन