शेवाळकर, राम बाळकृष्ण : (२ मार्च १९३१-३ मे २००९). सुप्रसिद्घ मराठी साहित्यिक, उत्तम कीर्तनकार आणि प्रभावी वक्ते. मूळ गाव परभणी जिल्ह्यातील शेवाळे. मूळ आडनाव धर्माधिकारी. जन्म विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचा. त्यांचे वडील विदर्भात ‘ कीर्तनकेसरी ’ म्हणून प्रसिद्घ होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेदशास्त्रसंपन्नतेची. पणजोबा रामशास्त्री शेवाळकर हे वेदव्यासंगी पंडित. संचित (१९७५) हा त्यांच्या मराठी व संस्कृत पदय रचनांचा संग्रह. शेवाळकरांचे वडील बाळकृष्ण हे कीर्तनकार आणि कीर्तनासाठी आख्याने लिहिणारे. राम शेवाळकर हे आपल्या वडिलांच्या अनुकरणातून, लहान वयातच कीर्तने पाठ करून ती सादर करीत. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आणि अमोघ वाणी आली.

विदर्भातील अनेक उत्तम वक्त्यांचा उदा., डॉ. मुंजे, वीर वामनराव जोशी, बाबासाहेब खापर्डे, वि. घ. देशपांडे, पु. भा. भावे, बाळशास्त्री हरदास इत्यादींचा प्रभाव त्यांच्यावर पडला त्यामुळे समाजप्रबोधनाचे एक अमोघ साधन म्हणून वक्तृत्वाचे सामर्थ्य त्यांना जाणवले आणि त्यांनी स्वतःच्या वक्तृत्वगुणांचा विकास केला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी कित्येक व्याख्याने दिली आणि ‘ वक्ता दशसहस्त्रेषु ’ अशी ख्याती त्यांना मिळाली. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, साने गुरूजी ह्यांचे विचार त्यांनी श्रोत्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविले. त्याचबरोबर आपल्या काव्य व निबंधलेखनाने साहित्यिक म्हणूनही लौकिक प्राप्त केला.

त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अचलपूर येथेच झाले. शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (१९४८), अमरावतीच्या विदर्भ महाविदयालयातून ते बी.ए. (१९५२) आणि नागपूर विदयापीठातून एम्.ए. (संस्कृत १९५४ मराठी १९५६) झाले. वाशीम येथील शासकीय प्रशालेत ते आरंभी शिक्षक होते (१९५४-५५) त्यानंतर निरनिराळ्या महाविदयालयांतून प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर वणी येथील लोकमान्य टिळक महाविदयालयात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले.

लहानपणापासूनच ते काव्यरचना करीत होते. असोशी (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर रेघा(१९६७) आणि अंगारा (१९८९) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. निसर्गातील चैतन्याचा आणि सृजनशक्तीचा आविष्कार त्याच्या निरनिराळ्या रूपांतून पाहणे, त्यांना शब्दरूप देणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. कवितेखेरीज त्यांनी अनेक निबंधही लिहिले. अग्निमित्र (१९७६), अमृतझरा (१९७६), देवाचे दिवे (१९८९), रूचिभेद (१९८९)आणि सारस्वताचे झाड (१९८९), तारकांचे गाणे (१९९४) हे त्यांचे काही ललित निबंधसंग्रह होत. लोकनायक बापूजी अणे ह्यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी त्यांनी लोकनायकांचे वाङ्‌मय स्वखर्चाने प्रकाशित केले, ही त्यांची एक विशेष उल्लेखनीय कामगिरी होय. त्यांनी संपादिलेल्या पुस्तकांत शिक्षणविचार (१९५५), यशोधन, त्रिविक्रम (३ खंड, १९९२) यांचा समावेश होतो. शिक्षणविचार मध्ये आचार्य विनोबाजी भावे ह्यांचे शिक्षणविषयक विचार आहेत. यशोधन मध्ये डॉ. य. खु. देशपांडे ह्यांचे संशोधनपर लेखन अंतर्भूत आहे. वा. ना. देशपांडे ह्यांचे स्फुटलेख त्रिविक्रम मध्ये आहेत.पाणियावरी मकरी (२००८) हे त्यांचे आत्मचरित्र.

शेवाळकरांनी अनेक वाङ्‌मयीन-सांस्कृतिक-शैक्षणिक संस्थांतून विविध पदांवर कार्य केले. विदर्भ साहित्य संघाचे ते सतत नऊ वर्षे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा (उपाध्यक्ष) महाराष्ट्र साहित्य परिषद (उपाध्यक्ष) ह्या संस्थांचे ते पदाधिकारी होते. साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अशा शासकीय मंडळांवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. १९९४ मध्ये पणजीत (गोवा) झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांत ‘ मॅन ऑफ द यिअर ’ पुरस्कार (१९९७), साहित्य धुरंधर पुरस्कार, बॉस्टन, अमेरिका (१९९७), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा कुसुमाग्रज पुरस्कार (१९९९), मानद वाङ्‌मयपंडित (डी.लिट्.), नागपूर विदयापीठ (२००१), नानासाहेब नारळकर, विद्वम् पुरस्कार (२००२), विदर्भ भूषण पुरस्कार, मुंबई (२००४), ज्ञानेश्वर पुरस्कार, पुणे (२००४),  नागभूषण  पुरस्कार (२००७) आदींचा समावेश होतो. यांखेरीज विविध संस्थांकडून त्यांना मानपत्रे मिळाली आहेत.

नागपूर येथे त्यांचे निधन झाले.