आफळे, गोविंदस्वामी  : ( ११ फेब्रुवारी १९१७ – १ नोव्हेंबर १९८८ ). समर्थ संप्रदायी राष्ट्रीय कीर्तनकार. पिढीजात कीर्तनपरंपरा असणाऱ्या आफळे घराण्यात वडील रामचंद्रबुवा आणि आई चिमुताई यांच्या पोटी सात मुलींनंतर जन्माला आलेला मुलगा म्हणजे कीर्तन क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशी ख्याती मिळवणारे कीर्तनकेसरी गोविंदस्वामी आफळे बुवा होत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींचे समाधी मंदीर बांधले, त्यात कीर्तनसेवा करण्याचा मान आफळे घराण्याकडे चालून आला. अंगापूर, जैतापूर, भोस, सांगवी, वडगाव, महागाव, माहुली, सोनगाव या ८ गावांची जहागीर आफळे घराण्याला प्राप्त झाली. या पिढीजात कीर्तनसेवेकरिता पदरी मुलगा हवाच तो न झाल्यास जहागीरी परत करीन. जावई कीर्तनासाठी पाठवणार नाही हा दृढनिश्चय सांगून गोविंदस्वामींच्या आईने समर्थासमोर नवस केला होता.
रामदास स्वामींचे स्मरण रहावे या करिता ‘स्वामी ‘ हे नाव आफळे घराण्याने जोडले. नवसाने झालेला मुलगा ही त्या घराण्याची श्रद्धा होती. बालवयात तल्लख बुद्धीचे वरदान त्यांना लाभले होते. नकला करणे, पोवाडे गाणी करणे, पोहणे यात ते निपुण होते. बुवा पाहिल्यापासूनच दणकट शरीरयष्टींचे आणि अफाट ताकद घेऊनच जन्माला आले होते. शिक्षणाकरिता माहुली सोडून प्रथम हायस्कुल साठी सातारा आणि मॅट्रिक परीक्षेसाठी पुण्यात आलेल्या गोविंदस्वामींनी घरातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुण्यात राहून पडतील ती कामे करीत, माधुकरी मागत एम.ए. एल. एल. बी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माधुकरी मागून वार लावून शिक्षण पूर्ण करीत असतानाच ते कुस्ती देखील शिकले.
 
पुण्यात हिंदू महासभेने केसरी मधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर पोवाडे स्पर्धा घेतल्या. त्यामध्ये बुवांनी गायलेल्या पोवाड्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. विजयादशमीच्या दिवशी सावरकरांच्या घरासमोर दादरला पोवाडा सादर करण्याची संधी बुवांना लाभली. याचबरोबर सुभाषबाबूंसमोर सुभाषबाबूंच्या वर्णनाचा पोवाडा केसरीच्या कचेरीत सेनापती बापट यांच्या उपस्थितीत बुवांनी सादर केला. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी तो प्रस्तावनेसह प्रसिद्ध केला आहे. बुवांचे पोवाड्यांचे कार्यक्रम गावोगाव गाजले आणि ‘ शाहीर आफळे ‘ या नावाने बुवा प्रसिद्ध झाले.
तब्ब्ल ११ चित्रपटातून बुवांनी भूमिका केल्या. नाटकातही काम केले. प्रभात चित्रपट कंपनीच्या शेजारी या चित्रपटात ‘ नईम ‘ ची भूमिका त्यांना मिळाली होती ; मात्र आई चिमुताईनी त्यांना या क्षेत्रातून बाहेर पडायला सांगितले. घराण्याच्या परंपरेला जपण्यासाठी कीर्तनच करायला हवे, ”नभी जैसी तारांगणे तैसे लोक तुझ्या कीर्तनाला येतील ” हा आशीर्वाद आईंनी त्यांना दिला आणि कीर्तन करण्याची आज्ञाच केली.
पहिले राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धन हे बुवांचे गुरु. पुण्यातील गोविंदबुवा देव यांच्याकडे कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण झाले. हरीकीर्तनोत्तेजक सभा, पुणे येथील कीर्तन स्पर्धेत हिंसा – अहिंसा -विवेक या विषयावरील कीर्तन करून बुवांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आणि बुवांच्या कीर्तनप्रवासाला सुरुवात झाली. आईने दिलेला आशीर्वाद खरा ठरला आणि बुवांच्या कीर्तनाला प्रचंड श्रोते जमू लागले. वेळप्रसंगी रस्ते बंद करू कीर्तने होत असत. पुण्यातील शनिवार पेठेत वीर मारुती आणि दक्षिणमुखी मारुतीच्या चौकातील कीर्तने रात्रीची शेवटची बस गेली की रस्ते बंद करून बुवा कीर्तनाला उभे रहात असत.
धोतर – सदरा – डोक्याला भगवा फेटा आणि अंगावर एका खांद्यावरून मागे टाकलेली लांबलचक शाल अशा पेहरावात बुवा कीर्तनाला उभे राहात. कीर्तनकार अंगापिंडाने मजबूत आणि ताकद कमावलेललाच हवा म्हणजे त्याच्या शब्दसारखेच त्याचेही वजन श्रोत्यांवर पडते आणि श्रोते कीर्तनातल्या गोष्टी आचरणात आणतात ही परंपरा बुवांपासूनच सुरु झाली असे म्हटले जाते. बुवांचे कीर्तन थोडेसे मिश्किल आणि त्याचबरोबर ज्वलंत राष्ट्रभक्ती शिकवणारे होते. तत्कालीन चालू असणाऱ्या सामाजिक – राजकीय परिस्थितीवर बुवांनी कीर्तनातून निर्भीडपणे भाष्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुवांचे दैवतच होते. सावरकरांनी लिहिलॆल्या ‘ने मजसी ने ‘ या गीताची पहिली रेकॉर्ड एच. एम.व्ही कंपनीने बुवांच्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेली आहे. सर्वच वीर हुतात्म्यांची, ऐतिहासिक विरांगनांची कीर्तने चरित्रे कीर्तनातून अतिशय तडफेने मांडण्याची बुवांची हातोटी होती. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री गहिवर दाटेल असा करुणरस तर मिश्किल परंतु मार्मिक कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार बुवांच्या कीर्तनातून होत असे. पारंपरिक पठडीतून बाहेर पडून पुराणकथा असतील, राष्ट्रीय चरित्र असतील क्रांतिकारक, वीरश्री जागवणारी चरित्रे या सगळ्यांचे कथन करताना शुद्ध हिंदुत्ववादी, विज्ञानवादी दृष्टी ठेवून, समकालीन राजकारणाशी त्याचा धागा जोडून, अंधश्रद्धेवर कडक टीका करणारे बुवांचे कीर्तन आबालवृद्धांची, तरुणांची प्रचंड गर्दीचा उच्चांक मोडणारे ठरले. टीव्ही, सिनेमा, रेडिओ मुळे मागे पडत चाललेली कीर्तनकला बुवांमुळे पुन्हा एकदा जनमानसात लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली .
 
गोविंदस्वामींनी स्वतःच्या काव्यप्रतिभेने सावरकरगाथा  हे सावरकर चरित्रावरील महाकाव्य रचले. त्यांनी  १५ नाटके लिहिली आहेत. माहुलीची माणसं, महाकवी कालिदास, टाकीचे घाव, बैल गेला नि झोपा केला, शिरपाची शिरमंती , आम्ही आहो बायका, तू बायकोना त्याची ? प्रतापगडचा रणसंग्राम  ही त्यांची काही गाजलेली नाटके होते. या बरोबरीनेच कीर्तनासाठी उपयुक्त अशी अनेक ऐतिहासिक चरित्रांची आख्याने पद्य बुवांनी स्वतः रचली. ज्यांची संख्या तब्ब्ल १४०० इतकी आहे. बुवांचे ओवाळणी आणि संसार तरंग हे दोन कवितासंग्रह देखील प्रसिद्ध आहेत.  पुण्यातील हरिकिर्तनोत्तेजक सभा या संस्थेत बुवांनी खूप काम केले. पुण्यातील एकमेव असणारे नारद आणि व्यासांचे मंदिर बुवांनी स्वतः बांधले. गरीब विद्यार्थ्यांसाठी व्यास गुरुकुल, समर्थ गुरुकुल चालविले. जवळजवळ १०० विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांच्या पायावर बुवांनी उभे केले.
बुवांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि धाडसीपणामुळे कीर्तनातील अनेक विधानांमुळे त्यांना कारावास, जिल्हाबंदी, कीर्तनावर बंदी या आणि अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. १९५१ मध्ये दासनवमीला सकाळी ९ ते पहाटे ३ पर्यंत एका दिवसात वरळी, माटुंगा, चेंबूर, दादर, गिरगाव आणि लोखंडी जथा अशा ६ कीर्तनांचे बुवांनी रेकॉर्ड केले. कीर्तनात आपली पत्नी सुधाताई आफळे यांच्या सहकार्याने नारदीय कीर्तनात जुगलबंदी, सवाल जबाब हा प्रकार आफळे बुवांनी आणला. प्रत्येकाने सामर्थ्याची उपासना करायलाच हवी, विशेषतः स्त्रियांनी, मुलींनी स्वसंरक्षणक्षम असायलाच हवे हा बुवांचा आग्रह होता. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांचे आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणाऱ्या बुवांनी भारतभर कीर्तने केली. अमेरिकेत तीन महिने राहूनही बुवांनी कीर्तनपरंपरेची पताका फडकवली. बुवांनी स्वतःची अशी एक वेगळी पठडी निर्माण करून उभी केलेही ही कीर्तनपरंपरा त्यांचे चिरंजीव चारुदत्तबुवा आणि ज्येष्ठ कन्या क्रांतिगीता ताई महाबळ अतिशय समर्थपणे चालवीत आहेत.

 

संदर्भ :