सत्यपाल महाराज : (१६ मे १९५६). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार. पूर्ण नाव सत्यपाल विश्वनाथ चिंचोलीकर. संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या प्रभृतिंनी गाव खेड्यातील मानवी समूहाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी दिलेला मूलमंत्र सत्यपाल महाराज हे आपल्या कीर्तनातून देत आहेत. खंजेरी हे छोटे चर्मवाद्य ते त्यांच्या सादरीकरणावेळी वापरतात. एकावेळी सात खंजेऱ्या वाजविणे हे त्यांचे विशेष आहे. चिंचोली (ता.अकोट, जिल्हा अकोला) या गावी एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीतून घेतले. विदर्भातील जनमानसावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या कीर्तन जागराचा खूप मोठा प्रभाव आहे. गावागावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गुरुदेव सेवा मंडळ या भजनातून प्रबोधन करणाऱ्या मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे. गावातील गुरुदेव सेवा मंडळात गेल्यापासून सत्यपाल महाराज यांना कीर्तन आणि खंजेरीची ओळख झाली. सत्यपाल महाराज बालवयातच कीर्तनाच्या कार्यक्रमात भाग घेत असत; परंतु त्यांना त्यांच्या कलागुणासाठी हवे तसे प्रोत्साहन मिळत नसे. दहावीत नापास झाल्यानंतर ते आईला घरकामात मदत करत असत. नळकांडे नावाच्या गुहस्थामुळे ते भजन करायला जायला लागले. यावेळी भजनात ते खंजेरी वाजवीत असत. कालांतराने शाळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा व्यासपीठावरून ते कीर्तन सादर करू लागले. येथूनच कुटुंबातील प्रेरणेने त्यांचा कीर्तनाचा प्रवास सुरु झाला.

१९७०-८० या दशकात समाज प्रबोधन आणि मनोरंजन साधनांची उपलब्धता नव्हती. संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गाव हेच तीर्थ असून आपण आपल्या गावाचा विकास साधला पाहिजे हा विचार आपल्या कीर्तनातून मांडून बराच काळ व्यतीत झाला होता. याच काळात अठराविश्व दारिद्र्य अनुभवून आणि गावातील अठरापगड जातीजमाती आणि त्यांची वंचना बघून सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनपर्वाची सुरुवात केली. ग्रामप्रबोधनाचा एक विचार घेवून सत्यपाल महाराज आपले कीर्तन सादर करतात. अगदी खेडवळ परंतु थेट प्रभावी वऱ्हाडी बोलीभाषेत ते कीर्तन सादर करतात. जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, निर्मल ग्राम, शिक्षण या अशा अनेक ग्रामीण माणसाला भिडणाऱ्या समस्यावर ते भाष्य करतात. त्यांची शैली ही लोकशैली असून त्याला नर्मविनोदाची,उपरोध उपहासाची जोड असते.

संत गाडगे बाबा यांची कीर्तनशैली ही श्रोतुसंवादाची शैली होती. कीर्तन ऐकायला आलेल्या श्रोत्याला थेट प्रश्न विचारणे, उत्तराबद्दल त्याला शाबासकी देणे किंवा प्रसंगी त्याला अंतर्मुख करणे अशाच श्रोतुसंवादी शैलीतून सत्यपाल महाराज कीर्तन सादर करतात. शेतमजूर, शेतकरी, गावातील अठरापगड जातीजमातीतील लोक, अल्पशिक्षित लोक, ग्रामीण स्त्रिया या सर्व घटकांचे अनुभवविश्व फार त्रोटक असण्याची शक्यता असते. प्रबोधनाची तत्त्वजड भाषा त्यांना कळेलच असे होत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेवून सत्यपाल महाराज अगदी ग्रामीण अनुभवविश्वाला भिडेल अशी भाषा आणि निवेदन शैली त्यांच्या कीर्तनात वापरतात. घराघरात स्वच्छतागृहे असली पाहिजे म्हणजे निर्मल ग्राम निर्माण करता येईल या अशा साध्या पण तरीही तेवढ्याच अनेक महत्वाच्या विषयाची मांडणी ते त्यांच्या कीर्तनातून करतात. गावात अनेक जातीजमाती राहत असतात. अल्पशिक्षितता, जातीपातीतील शोषण, वंचनेमुळे या सर्व घटकांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. अशा घटकांचे प्रबोधन करून, त्यांना त्यांच्या अस्मितेची जाणीव करून देण्याचे महत्कार्य सत्यपाल महाराज त्यांच्या कीर्तनातून करत आहेत. संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथातील तत्त्वज्ञान ते कीर्तनातून मांडतात, प्रसंगी ग्रामगीता या ग्रंथाचे वाटपही करतात. तीन ते चार कलाकारांचा संच त्यांच्या सादरीकरणात सहभागी असतो. त्यांचे बंधू गजानन चिंचोलीकर हार्मोनियम वाजवतात. १४,००० पेक्षा जास्त गावात जाऊन सत्यपाल महाराजांनी प्रबोधन केले असून त्यासाठी त्यांनी सुमारे ३० लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.

कीर्तन कार्याबरोबरच समाजकार्यातही सत्यपाल महाराजांचे योगदान आहे. त्यासाठी त्यांनी गुरुवंदन सत्यशोधक बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे (२००५). या संस्थेद्वारा त्यांनी सामुदायिक विवाह, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, सुसंस्कार शिबिरे, रुग्णसेवा, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव या क्षेत्रात कार्य केले आहे. देहदान, अवयवदान आणि रक्तदान या अभियानातही त्यांनी कार्य केले असून, त्यांनी त्यांची पत्नी, वडिल आणि आई यांचे निधन झाल्यावर त्यांच्या देहाचे देहदान आणि नेत्रदान केले आहे.

ग्रामप्रबोधनात लक्षणीय योगदान दिल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून त्यांना अनेकदा विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, समाज प्रबोधनकार पुरस्कार, मराठा विश्वभूषण पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पुणे येथे आयोजित अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे (२०११) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन