डवरी बाबुराव गुरुजी : (१८९९-१९९९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि मृदंगवादक. बाबुराव डवरी गुरुजी निनगुर (नेकनुर). बंकटस्वामी महाराज यांचा सांगीतिक वारसा घेऊन महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही त्यांनी कीर्तनाचा आणि मृदंगवादनाचा प्रसार व प्रचार केला. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नेकनुर येथे झाला. त्यांना संगीताची आवड लहानपणापासूनच होती. ते स्वतः नाथसंप्रदायाचे असल्यामुळे त्यांच्या घराण्यात डमरू हे वाद्य वाजवले जात असे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या अंगात ताल, लय भिनलेली होती. याच काळात त्यांना भजन, कीर्तनाची आवड निर्माण झाली. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी आपल्या गावात भजनास साथ केली. एकवेळी त्यांचे वादन बंकटस्वामी महाराजांच्या निदर्शनास आले आणि हा मुलगा नक्कीच पुढे एक दिग्गज नामवंत संगीत कलावंत होऊ शकतो, असे त्यांना वाटले. स्वतः बंकटस्वामी महाराज उत्तम पखवाज वादक असल्यामुळे त्यांनी गुरुजींना शिकविण्यास सुरुवात केली. पुढे गुरुजींनी मठांमध्ये दररोज सात आठ तास पखवाज वादनाचा रियाज केला. या दरम्यान पखवाज वादनाचे गुरू म्हणून गोविंदराव बऱ्हाणपूरकर हे पानसे घराण्याचे अति उच्च दर्जाचे पखवाज वादक त्यांना गुरू म्हणून मिळाले. त्यांच्याकडे बऱ्हाणपूर येथे सलग सात आठ वर्ष त्यांनी विधिवत गुरूंची सेवा करून अद्ययावत ज्ञान प्राप्त केले. पुढे मुंबई व कलकत्ता या ठिकाणीही सलग १४ वर्ष त्यांनी मृदंगवादनाचे परिपूर्ण शिक्षण घेतले.

संगीत क्षेत्रामध्ये नवनवीन ताल निर्मिती, ताल रचना, तसेच प्रचलित व अप्रचलित तालांचे वादन यामध्ये ध्रुपद, धमार, झपताल, एकताल, खेमटा, दीपचंदी, चौताल, आडाचौताल, पंचम सवारी, धुमाळी हे ताल, ताललेखन पद्धती, एका मात्रेचे चार भाग करून निर्माण केलेली गायनपद्धती अशा विविध वैशिष्ट्यांमुळे बाबुराव डवरी गुरुजी या काळात सर्वत्र प्रसिद्ध होते. याचबरोबर ‘तालाचे घड्याळ’ या नावानेही ते सर्वत्र ओळखले जात. त्यांची संगीत शिकविण्याची पद्धत स्वतंत्र व स्वयंनिर्मित होती. अनेक शिष्यांना पंडित भातखंडे व पंडित पलुस्कर पद्धती जड जाऊ लागली, म्हणून त्यांनी एक मात्रेचे चार भाग करून सुलभ पद्धतीने गायन – वादन शिकवले. वर्षभर त्यांची भ्रमंती संपूर्ण महाराष्ट्रभर असायची. दर दिवशी वेगवेगळ्या गावाला त्यांचा मुक्काम असायचा. त्या गावातील सर्व शिष्य मंडळींना एकत्र करून एक किंवा दोन दिवस त्यांना तबला, मृदंग, हार्मोनियम ते शिकवायचे. दोन दिवसात संबंधित विषयाविषयी पूर्ण बोध झाल्यानंतरच ते दुसऱ्या गावी जात असत आणि त्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनी पुन्हा त्या गावात त्यांचा संगीतवर्ग चालायचा. दोन महिन्याच्या कालावधीत अनेक प्रकारचे बोल ते शिष्यांकडून पाठ करून घेत. दोन महिने पुरेल इतके शिक्षण ते द्यायचे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना शिक्षण देता आले. यासोबतच त्यांनी प्रत्येक शिष्यांना वेगवेगळा बाज शिकविला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे शिष्य आज नावलौकिक मिळून समाजात आदरणीय आहेत. बाबूराव डवरी गुरुजींची शिष्यपरंपरा खूप मोठी आहे. बीड जिल्ह्यात अनेक दिग्गज पखवाज वादक शिष्य त्यांनी घडवले आहेत. याशिवाय अनेक गायक वादकांना त्यांनी तालशास्त्र बाबत मार्गदर्शन केले आहे. बाबुराव डवरी गुरुजी यांचे पखवाज व संगीताची परंपरा त्यांच्या घराण्यातील तिसरी पिढी चालवीत आहेत.

संगीतक्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात सांप्रदायिक कीर्तन, चक्रीभजन, तालशास्त्र, अशा विविध अंगानी गायन, तबला, पखवाज एकल वादन, साथ-संगत वादनातील कलावंत घडवण्याचे श्रेय हे गुरुवर्य बाबुराव डवरी गुरुजी यांना दिले जाते. मानसन्मान, पैसा, प्रसिद्धी याच्या पाठीमागे न लागता आयुष्यभर त्यांनी केवळ संगीतासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्राचे मृदंगमहर्षी म्हणून सन्मानित केले आहे.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन