नानाबुवा बडोदेकर (सुपेकर) : ( १८७९ – २७ मे १९६९ ). प्रसिद्ध नारदीय कीर्तनकार. त्यांचा जन्म बडोदे येथे रुक्मिणी पांडुरंग मंदिरात झाला. लहान वयापासूनच मंदिरात वास्तव्य असल्याने त्यांच्या कानी हरिनाम सातत्याने पडे. भजन – कीर्तने प्रवचन, अखंड नामसप्ताह याबरोबरच वडील कृष्णबुवा हेच कीर्तनकार असल्याने शालेय शिक्षण घेण्याबरोबरच कीर्तनाचा अभ्यास, गायनाची तालीम या सगळ्यांचीच सुरुवात त्यांना करता आली. आई – वडिलांच्या पश्चात सारी प्रापंचिक जबाबदारी स्वीकारून बुवांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि सासरे वेदांताचार्य पंडित प्रल्हाद महाराज कुलकर्णी (ज्ञानेश्वरी वाले) यांच्याकडेच बहुतांशी कीर्तन प्रशिक्षण पूर्ण केले.
कीर्तन कलेत सर्वार्थाने परिपूर्णता मिळवल्यानंतरच कीर्तनाकरिता बाहेरगावी जाण्यास सुरुवात केली. बुवांचे साथीदार दादाबुवा यांच्यासह अनेक ठिकाणी बुवांनी कीर्तने केली. अनेक श्रोत्यांचे आयुष्य बुवांच्या कीर्तन श्रवणानंतर सन्मार्गास लागले. कीर्तनातील श्रोत्यांमध्ये साहित्यिक, लेखक, वकील, पुराणिक, नामवंत हरिदास, मोठेमोठे प्रकांड पंडित – शास्त्री नित्याची हजेरी लावत असत. गुजरातमधील योगेश्वरानंद महाराज (गांडा महाराज) आणि रंगावधूत महाराज यांनी देखील बुवांच्या कीर्तन श्रवणास हजेरी लावली. प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांच्या समोरही कीर्तन करण्याचे भाग्य बुवांना लाभले. ‘आधी केले मग सांगितले ‘ या उक्तीप्रमाणे कीर्तनातील सांगितलेल्या भक्ती – उपासना या बाबतीत बुवा स्वतः क्रियाशील होते. सगुणोपासना, निर्गुणोपासना, गायत्री पुरश्चरण (मंत्रांचे जपानुष्ठान) या सगळ्या बाबतीमधील सातत्य पाहून प.पू. प्रल्हाद महाराजांकडून त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली.
बडोद्याच्या श्रीमंत सयाजीराव गायकवाडांच्या वाड्यात झालेल्या कीर्तनात ‘कीर्तनभूषण’ या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले. बुवांनी कीर्तनकरीता उपयुक्त अशी कीर्तन पूर्वरंग समुच्चय भाग १, कीर्तन उत्तरंग समुच्चय भाग २ आणि ३, कुरुक्षेत्राचे रणांगणावर (कर्णपर्व), गीतामृतलहरी (नारायणी टीका), सहस्रोपदिका, ध्रुवचरित्र, उपमन्य चरित्र तसेच प्रबोध चंद्रोदय  हे नाटक आणि अनेक गवळणी, विरहिणी, कीर्तनोपयोगी पदे, असे बरेच वाङ्ममय निर्माण केले आहे. मुरलीधरबुवा निजामपूरकर (हरिकीर्तन वाचस्पती), वासुदेव बुवा जोशी (कीर्तन कौस्तुभ – कीर्तनालंकार ) , रंगनाथबुवा सुपेकर (कीर्तनरत्न – संस्कृत विशारद), पुंडलिक महाराज सुपेकर (धर्मवीर कीर्तनकला – कोविद), गजाजनबुवा परांजपे (कीर्तनरंग), गोपाळबुवा नंदुरबारकर, नारायणबुवा फडके, सीतारामबुवा शिरगावकर, लक्ष्मणबुवा भावे, विश्वनाथबुवा शुक्ल हे सर्वजण बुवांचे कीर्तनातील शिष्य आहेत. कीर्तन क्षेत्रातील अनेक पदव्यांनी बुवांना सन्मानित करण्यात आले. ते आयुर्वेदाचार्य धन्वंतरी म्हणूनही सुपरिचित होते. वयाच्या नव्वदाव्या वर्षी जगद्गुरू शंकराचार्य जेरे स्वामी यांच्या आज्ञेनुसार वे.शा.संपन्न दिवाकर शास्त्री यांचे कडून संन्यासीश्रमाची दीक्षा घेतली. या वेळेस टेंबेस्वामींचा प्रसाद म्हणून मिळालेली छाटीच खांद्यावर घेतली. पाच वर्षे संन्यासाश्रमात राहून गंगादशाहरा दशमी २७ मे १९६७ रोजी प्रणवोच्चार करून त्यांनी देह ठेवला. त्यांच्या इच्छेमसूर नर्मदागंगानाथी येथे त्यांना जलसमाधी देण्यात आली.

संदर्भ :

  • Schultz, Anna,  Singing a Hindu Nation: Marathi Devotional Performance and Nationalism, New York, 2013.