​महाराष्ट्रातील सातवाहनकालीन नाण्यांचा एक प्रसिद्ध संचय. ब्रिटिशकालीन चांदा (सध्याचा चंद्रपूर जिल्हा) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका गावातील शेतामध्ये हा नाणेसंचय सापडला (ऑक्टोबर १८८८). ब्रिटिश पोलीस उपअधीक्षक जे. हिगीन्स यांनी सापडलेला हा संचय एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेकडे सुपुर्द केला. या नाणेसंचयाचा अहवाल प्रथम डॉ. हॉर्नले यांनी प्रोसिडिंग्ज ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमध्ये प्रसिद्ध केला (१८९३). या नाणेसंचामध्ये एकूण १८३ नाण्यांचा समावेश होता. संचयातील सर्व नाणी सातवाहन नृपतींची होती.  या संचयाचे वैशिष्ट्य म्हणजे विदर्भात सापडलेला सातवाहन नाण्यांचा हा प्रथम संचय होय.

नाण्यांचे वर्णन : या निधीतील सर्व नाणी पोटीनची (तांबे व शिसे यांचा मिश्र धातू) आहेत. दर्शनी भागावर उजवीकडे तोंड करून उभा असलेला हत्ती, तर मागील बाजूवर उज्जैन चिन्ह या प्रकारची ही नाणी आहेत. यांच्या  दर्शनी भागावर गोलाकार कडेवर राजाचे नाव असणारा प्राकृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील लेख आहे. ही नाणी साधारणपणे ३०-५० ग्रेन्स वजनाची आहेत.

एकूण १८३ नाण्यांपैकी हॉर्नले यांनी ५१ नाणी गौतमीपुत्र सातकर्णी, २४ नाणी वासिष्ठीपुत्र पुळुमावी, तर ४२ नाणी यज्ञ सातकर्णी यांची असल्याचे दर्शविले आहे. हॉर्नले यांच्या नोंदींप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या नाण्यांवर सिरि सातकरणि  (सदर वाचन प्राकृत भाषेच्या नियमाना धरून नाही, हे आधुनिक काळातील सातवाहन नाण्यांच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.) अथवा सिरि सातकणिस हे लेख आढळले. वासिष्ठिपुत्र पुळुमावीच्या नाण्यांवर (सि) अथवा सिरि पुळुमाविस अशा प्रकारचे लेख आढळले. पुळुमावीच्या काही नाण्यांवर सिरि (श्री) हा बहुमानदर्शक शब्द न आढळता केवळ पुळुमाविस असाही लेख आढळला आहे (ही नाणी त्रुटित लेखांची असल्याने त्यावर फक्त पुळूमावीस एवढाच लेख दिसतो). यज्ञ सातकर्णीच्या नाण्यांवर *ञ सीरि यञ सातकणि  (* = पहिले अक्षर वाचता येत नाही) असा लेख दिसून येतो. याशिवाय काही नाण्यांवर अनिश्चित स्वरूपाचे लेख आढळले. यांपैकी एका नाण्यावर (गद?) सात, दोन नाण्यांवर सिरि (किंवा रि )कणु सात (ही नाणी बहुदा कर्ण सातकर्णीची असावीत, असे नंतर सापडलेल्या  पुराव्यांवरून विशेषतः तऱ्हाळे नाणे संचयात प्राप्त झालेल्या नाण्यांवरून  वाटते.) आणि उर्वरित दोन नाण्यांवर फक्तरञो  (किंवा ञ्ओ) अशा प्रकारचे लेख आहेत. हॉर्नले यांना या नाण्यांची ओळख पटवता आलेली नाही.​ मुळात चांदा नाणेसंचय हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात सापडला असून त्या काळी सातवाहन नाण्यांची मोठ्या प्रमाणावर उपलब्धी झाली नव्हती, तसेच सातवाहन नाण्यांबद्दलची माहिती अपूर्ण होती. या मर्यादा लक्षात घेऊन चांदा नाणेसंचयाचा अभ्यास करावा लागेल. वरील नाणेनिधीतील काही नाणी ब्रिटिश म्युझिअम, लं​​डन, काही नाणी इंडियन म्युझिअम, कोलकाता येथे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय ६० नाणी किंवा नाण्यांचे तुकडे सापडले आहेत. त्यांच्या दर्शनी भागावरील हत्तीचे चिन्ह व मागील बाजूवरील उज्जैन चिन्ह स्पष्ट दिसत असले, तरी लेख संपूर्णपणे नष्ट झाले आहेत.

नाणेसंचयाचे महत्त्व : चांदा नाणेनिधी हा वर सांगितल्याप्रमाणे विदर्भात सापडलेला पहिला नाणेसंचय आहे. यानंतर इतर नाणेसंचय सापडले असले, तरी सातवाहनकालीन नाण्यांचा तपशीलवार अभ्यास करणे या नाणेनिधीमुळे शक्य झाले. सातवाहनकालीन विशेषतः उत्तर सातवाहकालीन नाण्यांचा संचय यादृष्टीने याचे महत्त्व असाधारण आहे. सातवाहनांच्या नाण्यांची व्याप्ती व प्रसार खूप विस्तृत आहे. सातवाहन नृपतींनी   त्यांच्या आधिपत्याखालील विविध प्रदेशांमध्ये  वेगवेगळ्या प्रकारची नाणी काढली. त्यामुळे सातवाहनकालीन नाण्यांचा अभ्यास करताना तो कालक्रमानुसार तसेच प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार करणे सयुक्तिक ठरते. त्यांपैकी विदर्भात उत्तर सातवाहन काळात हत्ती व उज्जैन चिन्ह असलेली नाणी दीर्घकाळ प्रचलित असल्याचे कळते. सातवाहन साम्राज्याच्या अस्तानंतर त्यांचे राज्य फक्त महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा भागापुरते मर्यादित असल्याचे चांदा व तऱ्हाळे नाणेसंचयावरून दिसून येते. सातवाहनांच्या हत्ती व उज्जैन छापाची नाणी तांबे, शिसे व पोटीन या धातूंमध्ये आढळतात. त्यांपैकी चांदा येथे केवळ पोटीनची नाणी आढळली आहेत. मूलतः या नाण्यांची व्याप्ती मोठी असली, तरी सातवाहनांच्या शेवटच्या काळात ती केवळ विदर्भात आढळतात. त्यामुळे उत्तर सातवाहनकालीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने चांदा नाणेसंचय महत्त्वाचा ठरतो.

संदर्भ :

  • Sarma, I. K. Coinage of the Satavahana Empire, Delhi, 1980
  • Shastri, A. M. Ed., Historical Analysis of the Satavahanas and Coins from Excavations, Nagpur, 1972.
  • Gokhale, Shobhana, Lord of Dakshinapatha Coins, Trade and Trade- Centres Under the Satavahanas, Mumbai, 2008.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक : पद्माकर प्रभुणे