माकडशिंग ही वनस्पती ॲस्क्लेपीएडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव कॅरॅलुमा फिंब्रिॲटा आहे. कॅरॅलुमा एसेडन्स असेही तिचे शास्त्रीय नाव आहे. ती आशियातील उष्ण प्रदेश, अफगाणिस्तान, इझ्राएल, दक्षिण यूरोप व आफ्रिका खंड येथे तसेच भारतातही आढळते. कॅरॅलुमा प्रजातीत जगभर सु. ५० जाती आढळून येतात. भारताच्या पश्‍चिम भागात बहुधा रुक्ष जागी माकडशिंग वनस्पती वाढलेली दिसून येते.

माकडशिंग (कॅरॅलुमा फिंब्रिॲटा)

माकडशिंग हे झुडूप आकाराने लहान असून ते ३०–६० सेंमी. उंच वाढते. खोड मांसल असून त्याचा व्यास २-३ सेंमी. असतो. त्याला खोडाच्या तळापासून अनेक चौकोनी फांद्या येतात. या फांद्यांवर पाने येतात. ती साधी व लहान असून लवकर गळून पडतात. ती गळून पडल्यानंतर तेथे टोकदार उंचवटे दिसतात. फुले एकेकटी किंवा दोन-तीनच्या समूहात फांद्यांच्या शेंड्यांना किंवा पेरांवर येतात. दलपुंज चक्राकार असून त्यात पाच संयुक्त पाकळ्या असतात. पाकळ्यांचा रंग जांभळा असून त्यांवर पिवळे किरीट (पाकळ्यांवर वाढलेली वर्तुळाकार उपांगे) असते. पाकळ्यांचा आकार तलवारीसारखा असतो आणि त्यांच्या टोकाला लांब रोमाचे तोरण असते. परागण कीटकांद्वारे होते. फळ पेटिका प्रकारचे असून १०–१५ सेंमी. लांब असते. बिया लांब गोलाकार आणि गुळगुळीत असतात.

माकडशिंग या वनस्पतीच्या खोडाची भाजी करतात. ती शोभेसाठी बागेत किंवा खडकाळ जागी लावतात. आफ्रिकेत तिचा औषधी वापर करतात. काही ठिकाणी तिचा चीक जखमा व फोड बरे करण्यासाठी तसेच सर्पदंशावर व विंचूदंशावर लावतात. ही वनस्पती विषारी आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे जनावरे खात नाहीत. भारतात काही राज्यांत आदिवासी लोक शिकारीला जाताना तहानभूक शमविण्यासाठी तिच्या खोडाचे तुकडे चघळतात. आंध्र प्रदेशात तिचे लोणचे व चटणी करतात. काही भागांत दुष्काळी अन्न म्हणून तिच्या खोडांचा वापर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा