विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटलने तर्कशास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथांचा संग्रह. ॲरिस्टॉटलने अनुभववादाचा (Empiricism) पाया घातला. तत्त्वज्ञानाची शास्त्रशुद्ध मांडणी करताना त्याने तर्कशास्त्राचा पाया घातला. तो स्वतः त्यास ‘ॲनालिटिक्स’ म्हणजे ‘चिकित्साशास्त्र किंवा विश्लेषणशास्त्र’ म्हणत असे. याबाबतचे आपले विचार त्याने ऑर्गनन या ग्रंथात मांडले आहेत. सध्या उपलब्ध असलेले ऑर्गनन हे त्याच्या मूळ स्वरूपात नसावे; कारण ॲरिस्टॉटलच्या ग्रंथांमध्ये त्याच्या शिष्यांनी दुरुस्त्या आणि सुधारणा केल्या आहेत. शिवाय ऑर्गनन हे नावही पुढे निर्माण झालेल्या पेरिपेटॅटिक्स या तत्त्वज्ञान विचारधारेच्या ॲरिस्टॉटलच्या अनुयायांनी दिलेले आहे.

अनुवाद : साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण झालेले ॲरिस्टॉटलचे साहित्य पाचव्या शतकात पश्चिम रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर बहुधा नष्ट झाले. तरी पूर्वेकडल्या बायझंटिन रोमन साम्राज्यातील ग्रीक भाषिक प्रांतांमध्ये हे साहित्य जतन केले गेले.

रचना : ऑर्गननचे या ग्रंथाचे खालील सहा भाग आहेत :

१. कॅटेगरीज् : या कृतीचे एकूण पंधरा पाठ आहेत. त्यांमध्ये जगातील यच्चयावत गोष्टींची विषय आणि वैधानिक शक्यता यांमध्ये विभागणी केली आहे. या भागात ॲरिस्टॉटलच्या वर्गीकरणाचे द्रव्य, संख्या, गुण, संबंध, स्थान, काळ, स्थिती, अवस्था, कृती आणि भावना हे दहा प्रकार आहेत. ॲरिस्टॉटलची कोणत्याही वाक्यरचनेशिवाय दर्शवता येणाऱ्या वस्तूंची (नाम) गणना करण्याची इच्छा होती. प्रत्येक वस्तूस मानवी समजुतीनुसार उपरोल्लिखित दहांपैकी एका विभागामध्ये ठेवता यावे, या विचाराने ॲरिस्टॉटलने हे वर्गीकरण केले असावे.

२. डी इंटरप्रिटेशओने : या भागांत भाषा आणि तर्कशास्त्र यांच्यात असलेला संबंध व्यापक, स्पष्ट आणि औपचारिक रीत्या कसा अभ्यासला जाऊ शकतो, यावर ॲरिस्टॉटलने मत मांडले आहे. यामध्ये त्यांच्या  विधान आणि निष्कर्षाच्या संकल्पनेची माहिती मिळते. त्याबरोबरच होकार, नकार, सार्वत्रिक आणि विशिष्ट विधान त्याचप्रमाणे  नकाराची चौकट, शक्यतांचे गणित यांचाही अंतर्भाव आढळतो.

३. प्रायर ॲनॅलिटिक्स : यामध्ये निष्कर्षाच्या तर्कशास्त्रीय पद्धतीची माहिती मिळते. निगमन कारण किंवा एकेका कारणांच्या वजावटीतून उरणाऱ्या सर्वाधिक शक्य कारण अशा निष्कर्षाच्या उद्भवाच्या प्रणालीविषयी यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. यालाच ॲरिस्टॉटलचे संवाक्य (Syllogistic) असे म्हणतात. निष्कर्षाची सत्यता आणि अनुमानित निष्कर्ष यांवरही येथे चर्चा करण्यात आलेली आहे.

४. पोस्टीरियर ॲनॅलिटिक्स : हा भाग प्रयोग, व्याख्या आणि शास्त्रीय ज्ञान यांच्याशी संबंधित आहे; कारण निगमनाच्या तर्कशास्त्राचा औपचारिक विचार या भागात केलेला आहे.

५. टॉपिक्स : या भागात योग्य मुद्द्यांची घडण, निश्चित नसणारा पण शक्य असलेला निष्कर्ष यांच्याविषयी विवेचन आहे. पुढे पॉर्फिरीसारख्या तर्कशास्त्रज्ञाने चर्चिलेल्या अंदाजी निष्कर्षाचा मुद्दा मांडलेला दिसतो.

६. सॉफिस्टिकल रेफ्युटेशन : या भागात तर्काच्या चुकीच्या कल्पनांवरील उपाय सांगितले आहेत. तसेच ॲरिस्टॉटलची कलेविषयक मतेही आढळतात.

१२ व्या शतकातील जेम्स ऑफ व्हेनिस याने ऑर्गननच्या कॉन्स्टँटिनोपलमधील हस्तलिखिताचे लॅटिनमध्ये भाषांतर केले. ऑर्गननचा अरेबिक अनुवाद आठव्या शतकात करण्यात आला. पुढील हिब्रू आणि इस्लामी अभ्यासकांनी या ग्रंथाचा अभ्यास केल्याचे दिसून येते.

टीका आणि टीकाकार : विद्वान तत्त्वज्ञांनी ऑर्गननवर टीका लिहिल्या आहेत. यांमध्ये पुढील टीकाकारांचा अंतर्भाव होतो :

  • कॅटेगरीज् : ओक्कम आणि स्कॉटस यांनी.
  • डी इंटरप्रिटेशओने : थॉमस ॲक्विनस, विल्यम ऑफ ओक्कम आणि जॉन स्कॉटस यांनी.
  • पोस्टीरियर ॲनॅलिटिक्स  : रॉबर्ट ग्रॉझटेस्ट यांनी.
  • ऑर्गनन या ग्रंथावरही अनेक टीकाग्रंथ लिहिले गेले.

प्रभाव : १७-१८ व्या शतकातील यूरोपमध्ये वैज्ञानिक प्रगतीवर आधारित विचारधारेला बळकटी मिळेपर्यंतच्या काळात ऑर्गननमध्ये ॲरिस्टॉटलने मांडलेल्या विचारांनाच संपूर्ण सत्याचा दर्जा देण्यात येत होता. परंतु ॲरिस्टॉटलच्या मूळ ग्रंथांचा तितकासा अभ्यास होत नव्हता. इंग्रज तत्त्ववेत्ते फ्रान्सिस बेकन यांनी या काळात टीकात्मक नोव्हम ऑरगॅनम (१६२०) हा ग्रंथ लिहून हा प्रश्न ऐरणीवर आणला. तर्कशास्त्राच्या अभ्यासासाठी ॲरिस्टॉटलचा ऑर्गनन हा ग्रंथ पुढे कित्येक निरनिराळ्या विषयांतील तार्किक संकल्पना आणि विचारधारा यांचा नि:संशय आधारभूत बनला.

१९ व्या शतकात गणितीय तर्कशास्त्राच्या निर्मितीनंतर आणि त्यातही विशेषतः चिकित्साधारित तर्कशास्त्राच्या उदयानंतर ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राला व सोबतच ऑर्गनन या ग्रंथाच्या उपयोगालाही उतरती कळा लागली.

संदर्भ :

  • Owen, Octavius, Trans. Organon or Logical Treatises, London, 1889.
  • Parry, William; Hacker, Edward, Aristotle Logic, New York, 1991.

समीक्षक – मनीषा पोळ

प्रतिक्रिया व्यक्त करा