केनेट, ब्रायन लेस्ली नॉर्मन : ( ७ मे १९४८ )
ब्रायन लेस्ली नॉर्मन केनेट यांचा जन्म ब्रिटनच्या सरे परगण्यात झाला. केनेट यांनी केंब्रिज विद्यापीठातून सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील पदवी मिळवून गणितातील ट्रायपॉस भाग-३ ही परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली. यानंतर मात्र गणित विषयाच्या उपयोजित शाखेकडे ते वळले. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील उपयोजित गणित आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र विभागातून सैद्धांतिक भूकंपशास्त्रात पीएच्. डी. पदवी प्राप्त केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘Scattering and diffraction of seismic waves in multi-layered media’ असा होता. पुढे केंब्रिज विद्यापीठाची D.Sc. पदवी त्यांना ‘Propagation of seismic waves’ यावरील शोधलेखांसाठी देण्यात आली.
सॅन डिॲगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संशोधन करून केनेट पुन्हा केंब्रिज विद्यापीठात व्याख्याते झाले. १९८४ पासून केनेट यांनी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक संशोधन संस्थेत विविध पदांवर सेवा केली व सध्याही तेथे सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जपानचे टोकियो विद्यापीठ, जर्मनीच्या म्यूनिक येथील लुडविग मॅक्सिमिलिअन विद्यापीठातही ते अभ्यागत प्राध्यापक होते. ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय विद्यापीठाच्या भूविज्ञान संशोधन संस्थेचे ते संचालक होते.
केनेट यांचे मुख्य संशोधन भूकंपशास्त्र आणि भूकंप अन्वेषण (Seismology and Seismic Exploration), भूभौतिकी (Geophysics), भूगतिकी (Geodynamics), ध्वनिकी व ध्वनिकी उपकरणे (Acoustics and Acoustical Devices) या विषयांसंबंधी आहे.
पृथ्वीच्या अंतर्गत रचनेच्या अभ्यासात केनेट यांचे योगदान आहे. पृथ्वीच्या खोलवरच्या भूरचनेसंबंधी त्यांचे संशोधन असून भूकंपांचे केंद्रबिंदू ठरवण्यासाठीची त्यांची गणिती प्रतिमाने स्वीकारार्ह ठरली आहेत. संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडाच्या भूरचनेचे गुणधर्म तपासण्यासाठी त्यांनी पद्धतशीर अभ्यास केला. केनेट यांनी तेथील भूभागाचे तयार केलेले त्रिमितीय प्रतिमान ऑस्ट्रेलियन भूशास्त्रीय संदर्भ प्रतिमान Australian Seismological Reference Model (AuSREM) नावाने प्रसिद्ध आहे. यामध्ये भूभागांतर्गत कंपने आणि भूपृष्ठीय कंपने यांच्या आधीच्या सर्व निष्कर्षांचाही समावेश केला आहे. या प्रारूपाचा वापर ऑस्ट्रेलिया खंडाच्या छोट्या छोट्या भागांची संरचना समजण्यासही यशस्वी ठरला आहे.
भूकंपालेखांचे स्वरूप आणि त्यांचे उपयोजन यांसंबंधीचे केनेट यांचे सैद्धांतिक संशोधन पृथ्वीच्या आवरणाच्या अभ्यासात खूप उपयोगी आहे. त्यात प्रसार वेगाची प्रतिरूपे (seismograms) तयार करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली आहे. त्यामध्ये भूभागांतर्गत निर्माण होणारी थेट आणि परावर्तित कंपने यांचा समावेश आहे. त्यामुळे भूकंपाचा केंद्रबिंदू निश्चित करण्यास मदत मिळते. त्यांचे बहुतांश काम पृथ्वीचे कठीण बाह्य आवरण (lithosphere) आणि निम्नस्खलन क्षेत्र (subduction zones) यांचे गुणधर्म अभ्यासण्याचे असून निम्नस्खलित भूपृष्ठाचे भविष्यकालीन रूप याबद्दल आहे.
भूकंपशास्त्रातील विविध विषयांवर केनेट यांचे सुमारे पाचशे शोधलेख प्रकाशित झाले आहेत. याशिवाय भूकंपशास्त्रावरील अनेक पुस्तकांचे ते लेखक वा सहलेखक आहेत. यातील उल्लेखनीय पुस्तके अशी : The Seismic Wavefield (2 Volumes), Seismic Wave Propagation in Stratified Media, आणि Geophysical Continua: Deformation in the Earth’s Interior.
केनेट यांना केंब्रिज विद्यापीठाचे स्मिथ पारितोषिक, ॲडम्स पारितोषिक, अमेरिकन जिओफिजिकल युनियनची फेलोशिप, सेन्टेनरी मेडल फॉर सर्व्हिस टू ऑस्ट्रेलियन सोसायटी अँड सायन्स इन जिओफिजिक्स, लंडनच्या रॉयल सोसायटीची फेलोशिप, आणि इंटरनॅशनल ॲसोसिएशन ऑफ सेस्मिऑलॉजी अँड फिजिक्स ऑफ द अर्थ’स मॅन्टलचे पदक असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.
संदर्भ :
- https://researchers.anu.edu.au/researchers/kennett-bln
- http://rses.anu.edu.au/~brian/
- https://royalsociety.org/people/brian-kennett-11736/
समीक्षक : विवेक पाटकर