खानोलकर, वसंत रामजी :    ( १३ एप्रिल, १८९५ ते २९ ऑक्टोबर, १९७८) वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म कोकणातील एका छोट्या खेडेगावात एका  गोमंतक मराठा समाजातील सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील रामजी धोंडो खानोलकर एक प्रतिष्ठित शल्यचिकित्सक होते. कंदाहारला गेलेल्या लॉर्ड रॉबर्टच्या विजयी सैन्यासोबत परतताना क्वेट्टा येथे ते विश्रांतीसाठी थांबले. तेव्हा क्वेट्टाचे वातावरण आणि परिसर रामजींना एवढे आवडले की त्यांनी तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने १९३५च्या भयानक भूकंपात रामजी आणि त्यांच्या परिवारातील १४ जण मृत्युमुखी पडले. रामजींचा वैद्यकीय वृत्तीसोबतच संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास होता. त्यांच्याकडे अनेक मूल्यवान आणि दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह होता. बहुधा वसंत खानोलकरांना वैद्यक आणि भाषा या विषयांची आवड वडिलांकडूनच मिळाली असावी.

वसंत खानोलकरांनी लहानपणीच डॉक्टर व्हायचे ठरवले होते. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी मुंबईच्या ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. येथेच ते सी. जी. पंडित यांना पहिल्यांदा भेटले. त्याच वर्षी ते इंग्लंडला रवाना झाले. लंडन विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली आणि १९१८मध्ये वैद्यकीय पदवी मिळवली. १९२३ मध्ये ते रोगनिदानशास्त्रात (पॅथॉलॉजी) एम.डी. झाले. या काळात त्यांनी मूलभूत विज्ञान आणि वैद्यकीय संशोधनात अमूल्य अनुभव मिळवला. ते सर्वात कमी वयाचे ग्रॅहम रिसर्च स्कॉलर होते. भारतात परत येऊन ते ग्रान्ट मेडिकल कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना रोगनिदानशास्त्र शिकवू लागले. शिक्षणासाठी उपयुक्त विविध नमुन्यांचे संग्रहालय त्यांनी सुरू केले. रोगनिदानशास्त्राच्या पद्धतशीर शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. रोगनिदानशास्त्रातील संशोधनावरही त्यांनी विशेष भर दिला. पाश्चात्य देशातील वैद्यकीय शिक्षणाच्या तुलनेत भारतीय शिक्षण कमी पडू नये म्हणून त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमात अनेक बदल सुचवले. वैद्यकीय शिक्षणामध्ये मूलभूत विज्ञान, प्रायोगिक जीवशास्त्र (एक्सपेरिमेंटल बायोलॉजी), जीवरसायनशास्त्र, जीवभौतिकशास्त्र तसेच संख्याशास्त्र यांचे महत्त्वाचे स्थान त्यांनी ओळखले होते. हे तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पसरविण्याचा प्रयत्न केला. खानोलकरांनी रोगनिदानशास्त्राचे शिक्षक या नात्याने या विषयाच्या अभ्यासाला त्यांनी नवीन दिशा दिली. खानोलकरांनी सेठ जी. एस. मेडिकल महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयात कामाच्या एका वेगळ्या परंपरेची सुरुवात केली. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर एक अत्युत्तम वैद्यकीय संस्था असण्याचा मान मिळाला. जैवभौतिकी, उपयोजित जीवशास्त्र इत्यादी विषयांची सुरुवात त्यांनी मुंबई विद्यपीठात केली. या कालावधीत खानोलकरांना कर्करोग आणि कुष्ठरोग यांच्या अभ्यासामध्ये विशेष कुतूहल व आवड निर्माण झाली. तेव्हा त्यांनी शिक्षकी पेशातून अंग काढून घेतले आणि टाटा मेमोरियल रुग्णालयात प्रमुख रोगनिदानतज्ञ म्हणून १९४१ मध्ये ते रुजू झाले. त्यांनी कर्करोग, कुष्ठरोग, पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र, मानवी अनुवंशशास्त्र या विषयात संशोधन केले.

खानोलकर १९४१-१९५१ या काळात टाटा मेमोरियल रुग्णालयात अर्बुदाच्या (ट्युमर)  तपासणीच्या कामात व्यस्त राहिले. त्यांच्या संशोधनाचा विषय भारतातील कर्करोग हा होता. भारतात कर्करोग आहे का, त्याचे कोणते प्रमुख प्रकार आहेत, हे शोधण्यासाठी त्यांनी रुग्णालयातील आकडेवारीचा अभ्यास केला. कर्करोगासाठी कारणीभूत काही घटक/सवयी, रोगपरिस्थितीविज्ञान (एपिडेमियॉलॉजी) यांचा त्यांनी अभ्यास केला. या संदर्भातील त्यांचे शोधनिबंध अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले. भारतातील कर्करोगासंदर्भातील त्यांच्या अग्रगण्य कामाबद्दल त्यांना १९४७मध्ये आंतरराष्ट्रीय कर्करोग युनियनचे (इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट  कॅन्सर) सदस्यत्व बहाल करण्यात आले.

कर्करोगावर संशोधन करण्यासाठी भारतामध्ये तंत्रज्ञान आणि साधनसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या मागणीचे मूल्यमापन एका खास सरकारी समितीने केले. या कामासाठी अमेरिकेहून इ. व्ही. कॉद्रे यांनाही बोलावण्यात आले होते. सर्वानुमते खानोलकरांना संशोधनासाठी एक राष्ट्रीय प्रयोगशाळा देण्यात यावी असे ठरले. अखेर, १९५२ मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (आय. सी.आर.सी.) सुरू करण्यात आले. यासाठी अनेक जागतिक संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळाले, त्यात रॉकफेलर फाउंडेशन, जागतिक आरोग्य संघटना होत्या.

कर्करोगाव्यतिरिक्त खानोलकरांनी कुष्ठरोगावरही संशोधन केले. पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र यावर कार्य करण्यामध्ये खानोलकरांचा भर होता. या त्यांच्या उपक्रमातूनच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कुटुंबनियोजनाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. खानोलकर ७ वर्षे या समितीचे अध्यक्ष होते. इंडियन ॲसोशिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संघटनेची स्थापना त्यांनी केली. भारतात वैद्यकीय संशोधन सुरू करण्याचे श्रेय खानोलकर व त्यांचे जवळचे मित्र सी. जी. पंडित आणि बी. बी. दीक्षित यांना जाते. खानोलकर अनेक भाषा पारंगत होते. ६ भारतीय आणि ४ यूरोपियन भाषा ते बोलू आणि वाचू शकत होते.

भारत सरकारने खानोलकरांना पद्मभूषण देऊन गौरविले. ते इंडियन ॲसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, इंटरनॅशनल कॅन्सर रिसर्च कमिशनचे अध्यक्ष, इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटरचे निदेशक, कर्करोग आणि कुष्ठरोगावरील जागतिक आरोग्य संघटनेच्या समितीचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसने खानोलकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वक्तृत्व स्पर्धा सुरू केली.

कर्करोग आणि कुष्ठरोग यावर त्यांनी तीन पुस्तके  आणि  शंभरहून जास्त शोधनिबंध  प्रकाशित केले आहेत.

खानोलाकारांचा मृत्यू मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात झाला.

संदर्भ :  

समीक्षक : रजनी भिसे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.