पिंगळा पक्ष्याचे विविध प्रकार

भारतीय घुबड जातीतील पक्ष्यांपैकी आकाराने सर्वांत लहान घुबड. आकाराने लहान असल्याने याला पिंगळा असे नाव पडले आहे. या पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या स्ट्रायजिफॉर्मिस (Strigiformes) गणाच्या स्ट्रायजिडी (Strigidae) कुलामध्ये होतो. त्याचा आढळ भारतभर सर्वत्र असून दक्षिण आशिया, इराण, व्हिएतनाम, बांगलादेश, भूतान, नेपाळ व पाकिस्तान येथे आहे. घनदाट अरण्य सोडून इतर सर्व प्रदेशांत तो आढळतो. विशेषेकरून मानवी वस्तीच्या जवळपास तो नेहमी आढळतो. आमराईमध्ये झाडांच्या ढोलींत तसेच जुन्या मोठ्या घरातील छताच्या आश्रयाने तो राहतो.

रंग व आकारावरून त्याचे पट्टेरी पिंगळा (Asian barred owlet), वनपिंगळा (Jungle owlet), ठिपकेदार पिंगळा (Spotted owlet) व रानपिंगळा (Forest owlet) असे प्रकार पडतात. पट्टेरी पिंगळ्याचे शास्त्रीय नाव ग्लॉसिडिअम क्युक्यूलॉईड्स (Glaucidium cuculoides), वनपिंगळ्याचे शास्त्रीय नाव ग्लॉसिडिअम रॅडिॲटम (Glaucidium radiatum), ठिपकेदार पिंगळ्याचे शास्त्रीय नाव अथिनी ब्रामा (Athene brama) आणि रानपिंगळ्याचे शास्त्रीय नाव हेटेरोग्लॉक्स ब्लेविट्टी (Heteroglaux blewitti) असे आहे.

ठिपकेदार पिंगळा (अथिनी ब्रामा)
ठिपकेदार पिंगळा (अथिनी ब्रामा)

हेटेरोग्लॉक्स ब्लेविट्टी रानपिंगळा १८७३ साली सर्वप्रथम वर्णन केलेला होता. त्यानंतर जवळजवळ ७० ते ८० वर्षे त्याचे दर्शन झालेले नव्हते. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमा वनक्षेत्रात तसेच मेळघाट अभयारण्यात त्याच्या सात जोड्या आढळून आल्या आहेत (२००४). पूर्ण भारतात याच्या अवघ्या २५० जोड्या असाव्यात असे पक्षीतज्ञांचे मत आहे. २०१८ सालापासून इंटरनॅशनल यूनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर (IUCN) या संस्थेने या प्रजातीची गणना धोक्यातील प्रजाती म्हणून केली आहे.

ठिपकेदार पिंगळा (अथिनी ब्रामा) : नर-मादी दिसायला सारखेच असतात. याची लांबी १९-२१ सेंमी., शेपटी ६५-९३ मिमी. असून पंखांची लांबी (विस्तार) १४३-१७१ मिमी. असते. याचे वजन ११०-११४ ग्रॅम असून मादी नरापेक्षा मोठी असते.याचा मुख्य रंग करडा-तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असातात. त्यावरूनच त्याला ठिपकेवाला घुबड असेही म्हणतात. याचे डोके गोल वाटोळे असून मानेवर तुटक पांढऱ्या रेषा असतात. शरीराची खालची बाजू पांढरी व तिच्यावर आडवे तपकिरी पट्टे असतात. डोळे मोठे व पिवळसर रंगाचे; चोच हिरवट, बाकदार असून शिकार पकडण्यासाठी व मांस फाडण्यासाठी उपयुक्त असते. पाय हिरवट पिवळ्या रंगाचे व पिसांनी झाकलेले असतात.

पिंगळा निशाचर पक्षी असून तो रात्रीच्या वेळी लहान-मोठे किटक, बेडूक, लहान पक्षी, उंदीर, सरडे यांची शिकार करतो. तो नेहमी जोडीने किंवा टोळीमध्ये राहतो. दिवसा ते एखाद्या झाडाच्या ढोलीत किंवा फांदीवर बसलेले दिसून येतात. अंधारात राहण्यासाठी कान अनुकूल झाले असल्याने लहानात लहान आवाजही त्याला ऐकू येतात. अंधुक प्रकाशात त्यांना उत्तम दिसते.  घुबडांच्या इतर जातींप्रमाणे पिंगळा आपली मान एका दिशेने २७० पर्यंत फिरवू शकतो. त्यामुळे एकाच जागी बसला असतानाही तो मान वळवून मागील बाजूचे पाहू शकतो.

पिंगळा पक्ष्याचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या छिद्रांत, कडेकपारींत, घराच्या छताजवळ मिळेल त्या साधनांनी (गवत, चिंध्या इत्यादींपासून) बनविलेले असते. दुसऱ्या पक्ष्यांनी सोडून दिलेले तयार घरटेही ते वापरतात.याचा विणीचा हंगाम साधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल असा असतो.  मादी घरट्यात ३-४ पांढऱ्या रंगाची अंडी घालते. नर व मादी दोघे मिळून २८-३२ दिवस अंडीउबवितात. त्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. पिलांची काळजी देखील नर-मादी दोघे मिळून घेतात.

पिंगळा पक्ष्याचा आयु:काल १६-१७ वर्षांचा असतो.

पहा : घुबड, शृंगी घुबड.

संदर्भ :

  • https://indiabiodiversity.org
  • https//en.wikipedia.org/wiki/spotted owlet
  • https://en.wikipedia.org/wiki/Forest_owlet