डोंगरी मैना (ग्रॅक्युला रिलिजिओसा)

पक्षिवर्गातील पॅसेरिफॉर्मिस (Passeriformes) गणामधील स्टर्निडी (Sturnidae) कुलातील ग्रॅकुला  प्रजातीमध्ये या पक्ष्याचा समावेश होतो. या पक्ष्याला पहाडी मैना तसेच बोलकी मैना असेही म्हणतात. याचा आढळ जगभरात सर्वत्र असून विशेषेकरून भारत, श्रीलंका, दक्षिण चीन, इंडोचायना, थायलंड, मलेशिया, म्यानमार, सुमात्रा, जावा आणि फिलिपीन्स येथे तो आढळतो.

डोंगरी मैना (ग्रॅक्युला रिलिजिओसा)

डोंगरी मैनाच्या पुढील पाच जाती आस्तित्वात  आहेत—ग्रॅक्युला रिलिजिओसा (Gracula religiosa; Common hill maynah), ग्रॅक्युला इंडिका (Gracula Indica; Southern hill maynah), ग्रॅक्युला टिलोजेनिस (Gracula ptilogenys; Sri Lanka hill maynah), ग्रॅक्युला रोबुस्टा (Gracula robusta; Nias hill maynah) आणि ग्रॅक्युला एंगॅनेन्सीस (Gracula enganensis; Enganno hill maynah). यातील ग्रॅक्युला इंडिका  ही ग्रॅक्युला रिलिजिओसा  या जातीची उपजाती असून तिला आता स्वतंत्र जातीचे स्थान मिळाले आहे.

भारतामध्ये डोंगरी मैना (ग्रॅक्युला इंडिका) हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडील भाग, पूर्व आणि पश्चिम घाट प्रदेश, छोटा नागपूर, ओडिशा, छत्तीसगढ, अंदमान व निकोबार, श्रीलंका, बांगला देश या भागांतील सदाहरित आणि निमहरित वनांत, डोंगरी भागांत आढळते. रंगांत थोडा फरक असलेल्या तिच्या काही उपजाती फिलिपीन्स, दक्षिण-पूर्व आशिया व म्यानमार येथेही आहेत.

डोंगरी मैना समुद्रसपाटीपासून ३००—२,००० मी. उंचीवरील डोंगरावर जेथे पर्जन्य आणि आर्द्रता उच्च असते त्या ठिकाणी आढळते. नर व मादी दिसायला सारखेच असतात. शरीराची लांबी २७—३० सेंमी. असून वजन २००—२५० ग्रॅ. असते. शरीराचा रंग चमकदार काळा असून माथा, मान व छातीस जांभळ्या रंगाची, तर उर्वरित शरीरावर हिरवट रंगाची छटा असते. पंख काळे असून त्यावर पांढरे पट्टे असतात. चोच नारिंगी व टोकास पिवळसर असते. डोळ्यांखाली तसेच डोक्याच्या दोन्ही बाजूकडून मानेपर्यंत नारिंगी पिवळ्या रंगाचा मांसल कातडीचा लोंबणारा भाग (गलुली ; Wattle) असतो. पाय पिवळसर व शेपूट शरीराहून फिकट रंगाचे असते.

डोंगरी मैना : उडताना.
डोंगरी मैना : घरटे व अंडी

डोंगरी मैना वृक्षवासी असून ती सर्व प्रकारच्या अरण्यांत, जंगलांत आणि शेताभोवताली असलेलया  झाडांवर राहते. त्यांच्या जोड्या किंवा थवे आढळतात. ती निरनिराळ्या प्रकारचे (मंजूळ, कर्कश, किंचाळणे इत्यादी) आवाज काढते. हा एक उत्तम अनुकरण करणारा पक्षी आहे. त्याला शिकविले तर तो बोलू शकतो, उच्चार फार स्पष्ट करतो, अनेक वाक्ये लागोपाठ सफाईने म्हणतो. तो विविध पक्ष्यांच्या सुरांची नक्कल करण्यामुळे प्रसिद्ध आहे. तो मानवी आवाजही काढतो. त्यामुळे तो पोपटापेक्षाही जास्त लोकप्रिय आहे. पिंजऱ्यात पाळले जात असल्यामुळे तो दुर्मीळ होत आहे. डोंगरी मैना सर्वाहारी पक्षी आहे. फळे विशेषत: अंजीर, फुलांमधील मध, कीटक, वाळवी, सरडा इत्यादी त्याचे खाद्य आहे. डोंगरी मैनेमुळे वनांमधील वृक्षांचे परागण होण्यास मदत होते.

डोंगरी मैनेच्या प्रजोत्पादनाचा काळ साधारणत: मार्च—ऑक्टोबर असतो. प्रदेशानुसार तो बदलतो. तिची वीण वर्षातून २-३ वेळा होते. उंच झाडांवरील नैसर्गिक खोल ढोलीत जमिनीपासून १०—३० मी. उंचीवर गवत, पाने व पिसे इत्यादींचा वापर करून नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. घरट्यामध्ये मादी २-३ अंडी घालते. अंडी निळसर असून त्यावर थोडे तांबूस-तपकिरी रंगाचे ठिपके असतात. अंडी उबविण्याचे काम नर व मादी दोघेही करतात. १४—१८ दिवसांनी अंड्यातून पिले बाहेर येतात. पिलांचे पालनपोषण दोघेही करतात. नर-मादी जोडी आयुष्यभर टिकते. डोंगरी मैनेचे आयुर्मान ८—१५ वर्षांचे असते. हा पक्षी छत्तीसगढ राज्याचा राज्यपक्षी आहे.

पहा : साळुंकी.

संदर्भ :

समीक्षक – कांचन एरंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा