पुरातन काळातील सजीवांचे आता मिळणारे अश्मीभूत अवशेष. उत्खननात मिळणारी हाडे, सांगाडे, प्राणी, वनस्पती वगैरेंच्या अश्मीभूत अवशेषांना जीवाश्म म्हटले जाते.

जीवाश्मांचे प्रकार : जीवाश्म बनण्याच्या नैसर्गिक पद्धतीवरून खालील प्रकार ठरविले जातात.

शरीरातील टणक भाग : मृत शरीर जेव्हा ओल्या मातीत गाडले जाते तेव्हा त्यातील मृदू भाग कालांतराने कुजून नष्ट होतात. दात, हाडे, नखे, शंख, शिंपले, शल्क, कायटीनाची कवचे तसेच वनस्पतींचे लाकूड, कठिण कवचांची फळे यांसारखे भाग न कुजता टिकून राहतात. त्यातील क्षार आणि इतर खनिज पदार्थाचे जड पदार्थात रूपांतर होते.

ॲमोनाइट जीवाश्म

अश्मीभवन : मृत शरीरे ओल्या मातीत गाडली गेली, तर ते संपूर्ण शरीर कुजून नष्ट होऊ शकते. यांच्या काही वेळा भोवतालच्या मातीतील क्षार आणि इतर खनिजे अंत:स्पंदन क्रियेमुळे (म्हणजे असे पदार्थ त्या मृत शरीरामध्ये पाझरून) ते त्यांच्या ऊतींमध्ये प्रस्थापित होतात व त्यामुळे त्या संपूर्ण शरीराचे दगडांसारख्या कठिण पदार्थात रूपांतर होते. प्राचीन काळातील अनेक मोठमोठ्या वृक्षांच्या खोडांचे अशा अंत:स्पंदन क्रियेतून अश्मीभवन झालेले आहे. अशा जीवाश्मांच्या मूळच्या काष्ठऊतींचे पेशी पातळीवरही परीक्षण झालेले आहे.

ठसे, साचे आणि प्रतिकृती : शरीराचा एखाद्या चपट्या आकाराचा भाग मातीत गाडला जातो. कालांतराने अशा मातीपासून गाळाचे खडक बनतात. मृदू शरीर कुजून जाण्यापूर्वीच त्याचा ठसा भोवतालच्या खडकावर राहून जातो. असा खडक फोडल्यावर कुजून नष्ट झालेल्या शरीराचा एक ठसा खडकाच्या फुटलेल्या पृष्ठभागावर स्पष्ट दिसतो. गाडले गेलेले शरीर जाडसर असेल तर ठशाच्या जागी रिकामी पोकळी राहते. तिला साचा म्हणतात. त्यावरून मूळ सजीवाच्या आकाराची आणि आकारमानाची कल्पना येऊ शकते. अशा साच्यांच्या पोकळ भागात अन्य प्रकारचे क्षार अथवा खनिजे जेव्हा प्रस्थापित होतात तेव्हा असे खडक फोेडल्यावर त्यातील पोकळ्यांच्या ठायी मूळ सजीवांची प्रतिकृती तयार झालेली दिसते.

पावलांचे ठसे : ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या चिखलातून चालत गेलेल्या प्राण्याच्या पावलांचे ठसे त्या चिखलावर उमटतात. पुढे विविध कारणांनी त्या चिखलांचे खडकात रूपांतर होते. अशा ठशांवरून प्राचीन काळी त्या ठिकाणी वावरत असलेल्या प्राण्यांच्या पावलांचा आकार, त्यांच्या बोटांची संख्या, नखांचे स्वरूप व सजीवांचे वजन यांची माहिती मिळू शकते.

नैसर्गिकपणे परीरक्षित शरीरे : पर्यावरणीय परिस्थितीमुळे प्राचीन काळातील काही सजीवांची शरीरे नैसर्गिकपणे कुजून न जाता जशीच्या तशी परीरक्षित राहिली. दीर्घ काळानंतरही त्यांच्यात कसलेच बदल झाले नाहीत. उदा., प्राचीन काळातील वने भूस्तरीय उलथापालथीमुळे जमिनीत गाडली गेली. त्यांच्यापासून दगडी कोळशाचे साठे बनले. त्यातील वृक्षांपासून पाझरलेल्या राळेत गुरफटले गेलेले कीटक, फुले आणि फुलांचे परागकण हे सगळे न कुजता, जसेच्या तसे राहिले. त्यांच्यापासून त्यावेळच्या सजीवांबद्दल काही माहिती मिळू शकते. परीरक्षित जीवाश्मांचे उदाहरण ध्रुवीय प्रदेशातील बर्फात गाडल्या गेलेल्या मॅमथचे आहे. हत्तींचे पूर्वज मानल्या गेलेल्या या प्राण्यांच्या त्वचेवर लोकरीसारखे आवरण होते. या लोकरयुक्त प्राण्यांची काही शरीरे बर्फात उत्खनन करताना मिळाली आहेत. त्यांपैकी काहींचे परीरक्षण इतके चांगले झाले आहे की, त्यातील पेशी, त्यांची रोमके वगैरे बारकावे कुजून नष्ट न होता, जशीच्या तशी टिकून राहिली आहेत. त्यांचे विच्छेदन करता प्रजनन संस्थेत सुरुवातीच्या अवस्थेतील काही गर्भ मिळाले आहेत. या गर्भाचे आधुनिक हत्तीणींच्या गर्भाशयात रोपण करण्यात आले होते.

शरीराचे परीरक्षण कमी तापमानामुळे आपोआपच होत असते. ध्रुवीय प्रदेशात बर्फाखाली झाकल्या गेलेल्या मातीत आढळणारे काही जीवाणू आज अस्तित्वात असणाऱ्या जीवाणूंपेक्षा वेगळे असून ते अतिप्राचीन काळातील जीवाणू आहेत. उत्खननातून बाहेर काढल्यानंतर त्यांचे तापमान जेव्हा आताच्या तापमानाएवढे वाढले तेव्हा त्यातील अनेक जीवाणूंमध्ये जीवनप्रक्रिया सुरू झाल्याचे आढळले आहे. डायनोसॉरांचे डीएनए जीवाश्मातून मिळविता येत नाहीत, हे प्रयोगाअन्ती सिद्ध झाले आहे.

वनस्पती जीवाश्म

प्राचीन काळात जमिनीखाली गाडले गेलेल्या वनांतील जैववस्तुमानापासून दगडी कोळसा बनला आहे. त्या वनांतील वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरांतील कार्बनी पदार्थांपासून उष्णतेमुळे निघालेले द्रव पदार्थ खडकांच्या थरांत भूपृष्ठाखाली साठत गेले. ते मानवाने कच्च्या खनिज तेलांच्या रूपाने उपसले. त्यावर प्रक्रिया करून मनुष्य पेट्रोल, डीझेल, रॉकेल, एलपीजी, सीएनजी आणि इतर प्रकारची खनिज इंधने तयार करून वापरतो. या इंधनांना जीवाश्म इंधन म्हणतात. कारण त्यांचा उगम हा प्राचीन काळच्या जीवसृष्टीतच आहे. त्यांचे साठे मर्यादित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा