जगात सर्वत्र वापरण्यात येणारा मसाल्यातील एक पदार्थ. मिरी ही बहुवर्षायू वेल पायपरेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पायपर नायग्रम आहे. ही आरोही वनस्पती मूळची दक्षिण भारतातील असून ती भारतात नैर्ऋत्येकडील टेकड्यांमध्ये जास्त पावसाच्या प्रदेशात वन्य अवस्थेत आढळून येते. मसाल्यासाठी जेव्हा तिची लागवड केली जाते, तेव्हा तिच्या वेलींना आधार देऊन त्या वाढविल्या जातात.

मिरी (पायपर नायग्रम) : पाने आणि फळांच्या घोसासहित वेलीचा भाग

मिरी काष्ठीय वेल असून ती सु. ४ मी. उंच वाढते. तिच्या फांद्या मजबूत असतात. खोडाच्या पेरांपासून मुळ्या निघतात आणि जवळच्या जमिनीत घुसून वेलीला आधार देतात. पाने एकाआड एक, मोठी, साधी, ५–१० सेंमी. लांब व  ३–६ सेंमी. रुंद, नागवेलीसारखी व अंडाकृती असतात. त्यांच्यात ५–९ शिरांचे जाळे असून ती खालच्या बाजूला निळसर-हिरवी व वरच्या बाजूला गर्द हिरवी असतात. फुले लहान, कणिश पुष्पबंधावर, द्विलिंगी म्हणजे नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या वेलींवर आणि हिरवट पांढऱ्या रंगाची असतात. फळे गोल, काळी, आठळीयुक्त, लहान व एकबीजी असतात. त्यांचा रंग सुरुवातीला हिरवा असून कालांतराने तो लाल व नंतर गर्द तपकिरी किंवा काळा होतो. फुले आल्यापासून फळे पक्व होईपर्यंत सु. सहा महिन्यांचा कालावधी लागतो. फळे पूर्ण पिकण्याआधी काढून वाळविली, तर ती काळी मिरी म्हणून आणि पूर्ण पिकलेल्या फळांवरील साल काढून टाकली, तर ती पांढरी मिरी म्हणून ओळखली जातात.

इ.स. पाचव्या शतकापासून मिरीचा उपयोग लोकांना माहीत आहे. इंडोनेशिया, मलेशिया, भारत, ब्राझील, मादागास्कर आणि श्रीलंका या देशांत मिरीचे व्यापारी उत्पादन घेतले जाते. मिरी हा मसाल्यातील एक किमती जिन्नस असल्याने रोमन साम्राज्यात तिचा उपयोग व्यापारात तारण म्हणून केल्याचा उल्लेख आढळतो.

काळ्या मिरीला भारतीय औषधात महत्त्वाचे स्थान आहे. ती सुवासिक व उत्तेजक म्हणून तसेच तापानंतरचा थकवा, भोवळ येणे व बेशुद्धी येणे यांवर वापरतात. ती तिखट, उष्ण व कृमिनाशक असून कफ, वात, दमा, घशाचे विकार, रक्त पडणारी मूळव्याध, नाकातील दुर्गंधी व रातांधळेपणा यांवर उपयोगी  आहे.

मिरीच्या फळात पायपेरीन, पायपेरिडीन आणि बाष्पनशील तेले आहेत. संशोधनाने असे सिद्ध झाले आहे की, पायपेरीनमुळे शरीरात सेलेनियम, ब-समूह जीवनसत्त्वे, बीटा-कॅरोटीन (पूर्वगामी -जीवनसत्त्व) आणि करक्युमीन यांचे शोषण व्हायला मदत होते. मिरीत प्रतिऑक्सिडीकारक गुणधर्म असल्याचे तसेच ती कर्करोधी असल्याचे नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा