ज्या प्राण्यांच्या आहारात मुख्यत: मुंग्यांचा किंवा वाळवीचा समावेश होतो, अशा प्राण्यांना मुंगीखाऊ म्हणतात. हे सर्व सस्तन प्राणी आहेत. या प्राण्यांमध्ये दातांची कमी संख्या, शरीरावर दाट केस, खवले, लांब व चिकट जीभ आणि वारूळ उकरण्यासाठी बळकट नख्या असलेले पंजे अशी समान लक्षणे दिसून येतात. भारतातील मुंगीखाऊंप्रमाणे (खवल्या मांजराप्रमाणे) जगाच्या इतर भागातील जायंट अँटइटर (मोठा मुंगीखाऊ), आर्डव्हॉर्क, नुंबॅट, एकिड्ना हे सस्तन प्राणीही मुंग्या खात असल्यामुळे त्यांनाही मुंगीखाऊ म्हणतात. मात्र ते एकमेकांहून भिन्न असून त्यांचा समावेश वेगवेगळ्या गणांत होतो.

भारतात मुंगीखाऊच्या मॅनिस क्रॅसिकॉडेटा (भारतीय मुंगीखाऊ किंवा खवल्या मांजर) आणि मॅनिस पेंटाडॅक्टिला (चिनी मुंगीखाऊ) अशी शास्त्रीय नावे असलेल्या दोन जाती आढळतात. त्यांचा समावेश स्तनी वर्गाच्या फोलिडोटा गणात केला जातो. भारत, पाकिस्तान, चीन, भूतान, बांगला देश, श्रीलंका व नेपाळ या भागातील डोंगराळ आणि मैदानी प्रदेशांत हे मुंगीखाऊ प्राणी दिसून येतात.

भारतीय मुंगीखाऊ (मॅनिस क्रॅसिकॉडेटा)

भारतीय मुंगीखाऊ : (इंडियन पॅंगोलिन). शरीरावर खवले असल्यामुळे याला खवल्या मांजर असेही म्हणतात. हा निशाचर व एकटा राहणारा लाजाळू प्राणी आहे. नाकापासून शेपटीच्या टोकापर्यंत त्याच्या शरीराची लांबी ५१–७५ सेंमी. असून त्यापैकी शेपटी ३३–४७ सेंमी. लांब असते. त्याचे वजन १०–१६ किग्रॅ. असते. डोके लांबट असून मुस्कट पुढच्या बाजूला निमुळते असते. मान आखूड असते. शेपूट चांगलेच जाड असून मागील बाजूला निमुळते होत गेलेले असते. पाय आखूड असून त्यांवरील नख्या लांबट व मजबूत असतात. मादी ही नरापेक्षा लहान असून तिच्या श्रोणिभागात स्तनांची एक जोडी असते. पोटाकडील भाग आणि पायांचे तळवे वगळता डोक्यासह सर्व शरीरावर मातकट तपकिरी रंगाचे खवले असतात. हे खवले केरॅटिनाने बनलेले असतात. सर्व खवल्यांची संख्या १६०–२०० एवढी असून त्यांपैकी ४०–५०% खवले शेपटीवर असतात. खवल्यांचे एकत्रित वजन शरीराच्या वजनाच्या २५–३०% एवढे भरते. शत्रूची चाहूल लागताच भारतीय मुंगीखाऊ स्वत:चे शरीर असे गुंडाळून घेतो की तो चेंडूसारखा वाटतो. खवल्यांच्या संरक्षक कवचापुढे वाघाचेही काही चालत नाही.

भारतीय मुंगीखाऊ दिवसा बिळामध्ये विश्रांती घेतो आणि रात्री अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतो. त्याची दृष्टी अधू असते. त्यामुळे तो वासाने मुंग्यांची व वाळवीची वारुळे शोधून काढतो. वारूळ सापडले की तीक्ष्ण नख्यांच्या साहाय्याने ते फोडून तो त्याच्या मुख्य भागापर्यंत पोहोचतो. तेथेच मोठ्या संख्येने मुंग्या व वाळवी असतात. लांब व चिकट जिभेने मुंग्या आणि वाळवी खाणे मुंगीखाऊला शक्य होते. तो मुंग्यांची अंडी, झुरळे व भुंगेरे असे कीटक तसेच कृमी, त्यांची अंडी व अळ्या इत्यादीही खातो. एरव्ही एकेकटे वावरणारे नर आणि मादी प्रजननकाळात एखाद्या बिळात एकत्र येतात. गर्भावधी ६५–७० दिवसांचा असतो. मादी एका खेपेला एकाच पिलाला जन्म देते. नवजात पिलाच्या शरीराची लांबी सु. ३० सेंमी. असून त्यांचे डोळे उघडलेले असतात. पिलांच्या शरीरावरचे खवले मृदू असून अधूनमधून केस असतात. मादी पिलाला शेपटीवर घेऊन वावरते. संकटसमयी ती पिलाला पोटाशी घेऊन शेपटीने त्याचे संरक्षण करते. खाण्यासाठी भारतीय मुंगीखाऊची शिकार केली जाते. चिनी औषधांमध्ये आणि जादुटोण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्यामुळे त्यांची संख्या कमी होत चालली आहे. भारताबाहेरील मुंगीखाऊ खालीलप्रमाणे आहेत.

मोठा मुंगीखाऊ (मर्मिकोफॅगा ट्रायडॅक्टिला)

मोठा मुंगीखाऊ : (जायंट अँटइटर). हा प्राणी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो. याचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या पायलोसा गणात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव मर्मिकोफॅगा ट्रायडॅक्टिला आहे. त्याच्या शरीराची लांबी १८२–२१७ सेंमी. व वजन ३३–४१ किग्रॅ. असते. मुस्कट लांबट असून त्याच्या टोकाला तोंड व नाक असते. डोळे काहीसे मागे असतात. कान लहान असतात. पुढील पायाची नखे लांब आणि मजबूत असतात. पाठीवर राठ केस असतात. शरीरावरचे केस भुऱ्या रंगाचे असतात. मानेच्या खालच्या बाजूने मागे कमरेपर्यंत जाणारा केसांचा त्रिकोणी काळा पट्टा असून त्याला पांढरी किनार असते. शेपटी लांब व झुपकेदार असते. शेपटीचे केसही लांब व जमिनीवर रुळणारे असतात. चालताना तो पुढील पायाच्या मुठी बंद करून गोरिला व चिंपँझी यांच्याप्रमाणे चालतो. मादी नरापेक्षा लहान असते.

मोठा मुंगीखाऊ याचे प्रजनन वर्षभर होऊ शकते. प्रजननकाळात नर व मादी एकत्र येतात. गर्भावधी सु. १९० दिवसांचा असतो. मादी दर खेपेला एका पिलाला जन्म देते. पिलांचे संगोपन मादी करते. दहा महिन्यांनी पिलू स्वतंत्र राहू लागते.

डुकऱ्या मुंगीखाऊ (ओरिक्टेरोपस ॲफर)

डुकऱ्या मुंगीखाऊ : (आर्डव्हॉर्क). हा प्राणी आफ्रिका खंडात आढळतो. याचा समावेश अपरास्तनी उपवर्गाच्या ट्युब्युलिडेंटॅटा गणात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव ओरिक्टेरोपस ॲफर आहे. तो बिळात राहतो आणि डुकरासारखा दिसतो, म्हणून त्याला बिळातला डुक्कर असेही म्हणतात. त्याच्या पाठीला बाक असून अंगावरचे केस विरळ आणि राठ असतात. शरीरावर ३-४ केसांचे पुंजके विखुरलेले दिसतात. पायांवरचे केस इतर केसांपेक्षा लांब असतात. शरीराचा रंग मातकट-राखाडी असतो. शरीराची लांबी १०५–१३० सेंमी. असून वजन ६०–८० किग्रॅ. असते. मुस्कट लांबट असून त्याच्या टोकाला नाक आणि तोंड असते. डोके मोठे व लांबट असून डोळे डोक्यावर काहीसे मागे असतात. घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. कान डोळ्यांच्या मागे असतात. जीभ सु. ३० सेंमी. लांब आणि चिकट असून ती सापाप्रमाणे अधूनमधून बाहेर काढली जाते. लाळ स्रवणाऱ्या ग्रंथीमुळे त्याची जीभ चिकट राहते. तिच्या मदतीने तो मुंग्या गोळा करतो. त्याला दात असतात. मागचे पाय पुढच्या पायांपेक्षा अधिक लांब असतात. पुढच्या पायांना चार बोटे असून मागच्या पायांना पाच बोटे असतात. बोटांची नखे मजबूत असतात. शेपूट टोकाला निमुळते होत गेलेले असते. सिंह, बिबटे, तरस, अजगर व रानकुत्रे हे मुंगीखाऊ प्राण्याचे शत्रू आहेत. त्यांना हुलकावण्या देत तो वेगाने पळतो आणि भरभर बीळ उकरून त्यात लपतो.

फक्त प्रजननकाळात डुकऱ्या मुंगीखाऊचे नर आणि मादी एकत्र येतात. गर्भावधी सु. ७ महिन्यांचा असतो. जन्मत: पिलू १·७–१·९ किग्रॅ. वजनाचे असते. पिलू ७–८ आठवड्यांनंतर मादीबरोबर बिळाबाहेर येऊ लागते. सहा महिन्यांत पिलू स्वत: बीळ तयार करू लागते.

पट्टेरी मुंगीखाऊ (मर्मिकोबियस फॅसिएटस)

पट्टेरी मुंगीखाऊ : (नुंबॅट). हा सस्तन प्राणी फक्त ऑस्ट्रेलियाच्या वायव्य भागात आढळतो. कांगारूप्रमाणे हा शिशुधानी आहे. त्याचा समावेश शिशुधानी उपवर्गाच्या डॅसिरोमॉर्फिया गणात होत असून त्याचे शास्त्रीय नाव मर्मिकोबियस फॅसिएटस आहे. त्याच्या शरीराची लांबी ३५–४५ सेंमी. असून वजन २८०–७०० ग्रॅ. असते. शेपटी शरीराएवढी लांब असते. शरीराचा रंग फिकट तपकिरी असतो. पाठीवर मानेच्या मागे विटकरी लाल रंगाची झाक असते. शेपटीलगतचा पाठीचा भाग काळसर असतो. पाठीवर विटकरी रंगाचे पट्टे असतात. पट्टे ४–११ यांच्या दरम्यान असू शकतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंना डोळ्यांतून कानांच्या मागे काळ्या रंगाचा पट्टा गेलेला दिसतो. पोटाकडचा भाग फिकट असतो. शेपटीच्या करड्या केसांवर पांढरट छटा असते. जबड्यात ५० लहान दात असतात; परंतु ते अकार्यक्षम असतात. जीभ लांब आणि चिकट असते. पट्टेरी मुंग्याखाऊ दिवसाला सु. २०,००० वाळवी खातो.

पट्टेरी मुंगीखाऊचा प्रजननकाळ फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. गर्भावधी १५ दिवसांचा असतो. मादी चार पिलांना जन्म देते. पिलांचे संगोपन मादीच करते. आठ महिन्यांनी पिले स्वतंत्रपणे हिंडू लागतात.

काटेरी मुंगीखाऊ (टॅकिग्लॉसस ॲक्युलिॲटस)

काटेरी मुंगीखाऊ : (एकिड्ना). हा प्राणी ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी, टास्मानिया आणि त्यालगतच्या बेटांवर आढळतो. त्यांच्या प्रजननाचे वैशिष्ट्य म्हणजे मादी पिलाला जन्म देण्याऐवजी अंडे घालते. म्हणून त्यांचा समावेश सस्तन प्राण्यांच्या मॉनोट्रेमाटा (अंडजस्तनी) गणात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव टॅकिग्लॉसस ॲक्युलिॲटस आहे. त्याच्या शरीराची लांबी ३५–५२ सेंमी. असते. त्याच्या अंगावर केस असतात आणि राठ व तीक्ष्ण काटे असतात. हे काटे पोकळ असतात. मुस्कट लांबट असून त्याच्या टोकाला लहानसे तोंड आणि नाक असते. पाय आखूड व मजबूत असून बोटांवर लांबट व टोकदार नखे असतात. त्यांचा उपयोग ते जमीन उकरण्यासाठी करतात. मुंग्यांची वारुळे, सडके लाकूड वगैरे आपल्या नखांनी आणि मुस्कटाने फोडून हे प्राणी आपल्या चिकट जिभेने मुंग्या खातात. त्यांच्या काही जाती गांडुळे, कृमी आणि कीटकांच्या अळ्यादेखील खातात.

काटेरी मुंगीखाऊची मादी पिलाला जन्म देण्याऐवजी मृदुकवचाचे एक अंडे घालते व ते अंडे आपल्या पोटाशी तात्पुरत्या बनणाऱ्या पिशवीमध्ये उबविण्यासाठी ठेवते. मादीला स्तनाग्रे नसतात. १० दिवसांनी अंड्यातून पिलू बाहेर येते. ते मादीच्या श्रोणिभागात असलेल्या दुग्धग्रंथींतून त्वचेवर पाझरणारे दूध चाटत राहते. ४५–५५ दिवसांत पिलाच्या अंगावर काटे येऊ लागतात. त्यानंतर मादी पिलासाठी पाळणाघराप्रमाणे वेगळे बीळ तयार करते व पिलाला त्यात ठेवते. सात महिन्यांपर्यंत ती दर पाच दिवसांनी पिलाला दूध पाजण्यासाठी पिलाच्या बिळात येत राहते. एका वर्षाने पिलू स्वतंत्र हिंडू लागते.

This Post Has One Comment

  1. श्री स्वामी दयानंद गुंडय्या

    खूपच सुंदर व आवश्यक माहिती आहे . त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद .

प्रतिक्रिया व्यक्त करा