संस्कृत – सिंधु (नदी), पर्शियन – हिंदु, ग्रीक – सिंथोस (इंदोस), रोमन – इंदुस, लॅटिन – सिंदुस. भारत, चीन (तिबेट) व पाकिस्तान या देशांतून वाहणारी आणि जगातील सर्वाधिक लांबीच्या नद्यांपैकी एक नदी. सिंधू नदीची लांबी सुमारे ३,२०० किमी. असून एकूण पाणलोट क्षेत्र सुमारे ११,६५,५०० चौ. किमी. आहे. पूर्वी हिचा उल्लेख ‘किंग रिव्हर’ असा केला जाई. तिबेटच्या पठारावर, कैलास पर्वताच्या उत्तर भागात सिंधू नदी उगम पावते. हे उगमस्थान मानसरोवराच्या उत्तरेला सुमारे १०० किमी. व सस.पासून सुमारे ५,५०० मी. उंचीवर आहे. उगमानंतर ती हिमालयाच्या उतारावरून वायव्य दिशेला वाहत जाते. उगमापासून गार नदी मिळेपर्यंतचा तिचा सुमारे २५७ किमी. लांबीचा प्रवाह सिंग-क-बाब किंवा सिंग-गे-चू या तिबेटी नावाने ओळखला जातो. पुढे ती भारताच्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात आग्नेय दिशेकडून प्रवेश करते. लडाख प्रदेशाच्या साधारण मध्यातून ती वायव्येस वाहत जाते. येथील तिचे खोरे रुक्ष व निर्जन आहे. लडाखमध्ये उत्तरेकडील लडाख पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील झास्कर पर्वतश्रेणी यांदरम्यानच्या खोल घळईतून वायव्येस वाहताना लेहजवळ तिला झास्कर पर्वतश्रेणी पार करून आलेली झास्कर ही उपनदी डावीकडून मिळते. त्यानंतर पुढे सिंधू नदी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करते. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट – बाल्टिस्तान प्रदेशातील स्कार्डूजवळ भारताच्या लडाखमधून वाहत जाणारी श्योक ही उपनदी उजवीकडून येऊन मिळते. बाल्टिस्तानमध्ये खैटाशो गावाजवळ झास्कर पर्वतश्रेणी पार करून सिंधू अतिशय खोल घळईतून वाहत जाते. येथील घळई ही जगातील सर्वांत खोल घळ्यांपैकी एक आहे. काराकोरम पर्वतश्रेणीच्या पायथ्याजवळ तिला उजवीकडून गिलगिट नदी मिळाल्यानंतर काही अंतर पश्चिमेस वाहत गेल्यानंतर एक मोठे वळण घेऊन सिंधू नैर्ऋत्यवाहिनी बनते. पुढे नंगा पर्वताच्या पश्चिमेस हिमाद्री श्रेणीतील ४,५०० ते ५,२०० मी. खोलीच्या घळईतून ती वाहू लागते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, सिंधू नदीचे पात्र जुने असून हिमालय पर्वत उंचावला जात असताना नदीचे खणनकार्य प्रभावी राहिल्याने सिंधू नदीने आपले पात्र कायम ठेवले आहे. सिंधू नदीमुळे हिंदुकुश पर्वतश्रेणी हिमालयापासून अलग झाली आहे.
लडाख या केंद्रशासित प्रदेशानंतर सिंधू नदी प्रथम पाकव्याप्त काश्मीरमधून वाहत जाऊन पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. पाकिस्तानच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशातून काहीशी ती दक्षिणेस वाहत जाते. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांतून सुमारे १,६६५ किमी.चा प्रवास करून अटकजवळ पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून ती पंजाबच्या पठारी प्रदेशात येते. तिचा उगमाजवळचा भूप्रदेश सस.पासून ५,५०० मी. उंचीचा असून अटकजवळच्या भूभागाची उंची ३०५ ते ४५७ मी. आहे. अटकजवळच तिला स्वात नदीसह काबूल नदी येऊन मिळते. त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद म्हणजे सुमारे २४४ मी. रुंदीचे बनते. येथे तिच्यातील पाण्याची पातळीही बरीच वाढत असून प्रवाहही खूप वेगवान असतो. अटक ते कालाबागपर्यंतचा प्रवाह उच्चभूमी व खडकाळ प्रदेशातून वाहत असल्यामुळे द्रुतगती आहे. या मार्गावरील चुनखडीच्या टेकाडांमुळे तिचा प्रवाह निळसर दिसतो, म्हणून तिला नील-आब हे नाव मिळाले आहे. पुढे सॉल्ट रेंज डोंगररांग पार करून पाकिस्तानातील निमओसाड पंजाब मैदानात ती प्रवेश करते. डेरा इस्माइलखानजवळ ती दक्षिणवाहिनी होते. मिठाणकोटजवळ तिला पंचनद म्हणजे भारतातून वाहत जाणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज यांचा संयुक्त प्रवाह मिळतो. त्यामुळे तिचे पात्र सुमारे २·५ किमी.पर्यंत रुंद बनले असून प्रवाह मंदगतीने वाहू लागतो. मिठाणकोटपासून पुढचा प्रवाह खोल, रुंद व संथ आहे. त्याला मिहरान म्हणतात. मिठाणकोटनंतर सिंधू पुन्हा नैर्ऋत्येस वळून सिंध प्रांतात प्रवेश करते आणि कराचीच्या आग्नेयीस अनेक फाट्यांनी अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. या त्रिभुज प्रदेशाची सुरुवात थत्ता (तत्ता) पासून होते. हा त्रिभुज प्रदेश विस्तृत असून त्यातील बराचसा भाग दलदलयुक्त आहे. भरतीच्या लाटा नदीच्या मुखाजवळील पात्रातून आत ८ ते ३२ किमी.पर्यंत घुसतात; हे या नदीमुखाचे वैशिष्ट्य आहे.
एकेकाळी सिंधू नदी कच्छच्या रणातील दलदली प्रदेशाला जाऊन मिळत होती. तेव्हा ती सांप्रत पात्रापासून पूर्वेस सुमारे ११० किमी. वरून, तसेच तिला समांतर वाहत होती. कच्छचे रण हळूहळू भरून आले आणि नदी पश्चिमेकडे सरकली. सक्कर धरणापासूनचा सिंधूच्या पूर्वेकडून वाहणारा पूर्व नार नावाचा एक फाटा पुढे कच्छच्या रणाकडे वाहत जातो, तर सिंधू नदीच्या मूळ पात्राच्या पश्चिमेस सुमारे १६ ते ३२ किमी. वरून पश्चिम नार हा फाटा वाहतो.
झास्कर, श्योक, शिगर, गिलगिट, अस्तोर या उपनद्या तसेच इतर अनेक प्रवाह मुख्य हिमालय श्रेणी, काराकोरम पर्वतश्रेणी, नंगा गिरिपिंड व कोहिस्तान उच्चभूमीवरील हिम व हिमाचे वितळलेले पाणी सिंधू नदीकडे वाहून आणतात. उत्तर पाकिस्तानातील काबूल, स्वात व कुर्रम या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. टोची, गुमल, झोब, विहोआ, संगर व रावनी या कमी लांबीच्या नद्या सुलेमान श्रेणीतून पूर्वेस वाहत जाऊन सिंधूला मिळतात. भारतातून वाहत येणाऱ्या झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या सिंधूच्या सर्वांत मोठ्या उपनद्या आहेत. या पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह मिळाल्यानंतरचे सिंधूचे पात्र रुंद व उथळ बनले असून ती मंदगतीने वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहमार्गात मोठ्या प्रमाणावर गाळाचे संचयन होते. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तिच्या काठावर बांध घातले आहेत; परंतु कधीकधी उत्प्रवाहाच्या वेळी पात्राबाहेर पाणी पसरून मोठे नुकसान होते.
सिंधू नदीच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी २७·५६ टक्के क्षेत्र भारतातील आहे. भारतातील सिंधूच्या एकूण पाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के लडाख या केंद्रशासित प्रदेशात, १६ टक्के हिमाचल प्रदेशात, १६ टक्के पंजाबमध्ये, ५ टक्के राजस्थानमध्ये, तर ३ टक्के हरयाणामध्ये आहे. तिचे वार्षिक प्रवाहमान नाईल नदीच्या प्रवाहमानापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे; कारण सिंधूला काराकोरम, हिंदुकुश, मुख्य हिमालय पर्वतश्रेणी यांवरील हिमक्षेत्र व हिमनद्यांपासून तसेच हिमालयीन उपनद्यांपासून पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात पावसामुळे व उन्हाळ्यात हिमालय पर्वतक्षेत्रांवरील बर्फ वितळून पाणीपुरवठा होत असल्यामुळे सिंधू बारमाही वाहणारी नदी आहे. तरीही ऋतुमानानुसार तिच्या पाण्याच्या पातळीत चढउतार आढळतात. हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी किमान प्रवाहमान असते. वसंत ऋतूत (मार्च ते जून) व उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे प्रवाहमान वाढते, तर जून ते सप्टेंबर या पावसाळ्यातील कालावधीत नदीला पूर येतात. काही वेळा अकस्मात विनाशकारी पूर येतात. इ. स. १८४१ मध्ये अटक येथे आलेल्या पुराच्या वेळी पाण्याची पातळी चार तासांत २५ मीटरने वाढून हजारो चौ.किमी. क्षेत्र पूरगस्त झाले होते. इ. स. १९४७, १९५८ व २०१० मध्येही असे विनाशकारी पूर आले होते. पूरपरिस्थितीमुळे नदीने अनेकदा आपला प्रवाहमार्ग बबललेला आहे. आजचा प्रवाहमार्ग हा मूळ प्रवाहमार्गापासून बराच पश्चिमेकडून वाहत आहे. मैदानी प्रदेशातील उष्ण व कोरड्या हवामानामुळे पृष्ठीय जलाचा पुरवठा कमी होतो. तसेच तेथील बाष्पीभवनाचा जास्त वेग व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याची पातळी कमी असते.
जगातील जलसिंचनासाठी सर्वाधिक उपयोग केल्या जाणाऱ्या नद्यांपैकी ही एक नदी आहे. पाकिस्तानात हिचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचन व जलविद्युतशक्ती निर्मितीसाठी केला जातो. प्राचीन काळापासून सिंधूचा जलसिंचनासाठी वापर केला जात आहे. ब्रिटिश शासनाने इ. स. १८५० नंतर कार्यान्वित केलेली कालवा जलसिंचन पद्धती ही जगातील सर्वांत मोठ्या आधुनिक कालवा सिंचन प्रकल्पांपैकी एक मानली जाते. भारतात सिंधू नदीच्या उपनद्यांवर काही धरणे व बंधारे बांधून जोड कालवे काढलेले आहेत. बिआस व सतलज नद्यांच्या संगमावर हरिके बंधारा बांधला असून त्याचे पाणी ६४० किमी. लांबीच्या इंदिरा गांधी कालव्याद्वारे पश्चिम राजस्थानातील वाळवंटी प्रदेशापर्यंत नेले आहे. यातील मुख्य कालव्याचे काम १९८७ मध्ये पूर्ण झाले. या कालवाप्रणालीद्वारे सुमारे ६,०७,००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सक्कर व कोत्री (गुलाम मुहम्मद) ही प्रमुख धरणे या नदीवर आहेत. सक्कर येथील लॉइड धरण १९३२ मध्ये बांधून पूर्ण झाले असून ते विशेष महत्त्वाचे आहे. टार्बेला धरण (१९७६) हे जलसाठ्याच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक आहे. कालाबाग येथे सिंधू चुनखडीयुक्त घळईतून वाहते. येथील भक्कम तळभागामुळे येथे थळ हा जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आला आहे. याशिवाय गाझी-बरोथा जलविद्युतनिर्मिती प्रकल्प (२००४), चश्मा बंधारा, गुड्डु बंधारा, झेलम या उपनदीवरील मांगला धरण (१९६७) हे पाकिस्तानातील प्रमुख प्रकल्प आहेत. पाकिस्तानातील ओसाड व निमओसाड प्रदेशाला पाणीपुरवठा करणारा सिंधू हाच प्रमुख स्रोत असून त्यामुळेच येथील कृषी विकास घडून आला आहे. ईजिप्तमध्ये जसे नाईलला महत्त्व आहे, तसे पाकिस्तानात सिंधूला महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंधू खोरे हे प्रमुख कृषी क्षेत्र असून गहू, मका, तांदूळ, बारीक तृणधान्य, कापूस, खजूर व फळे ही या खोऱ्यातील प्रमुख पिके आहेत.
हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सिंधू खोऱ्यातील सर्वाधिक पाण्याचा लाभ पाकिस्तानला झाला. सिंधूचे मुख्य खोरे पाकिस्तानात गेले, तर तिच्या प्रमुख उपनद्यांचे शीर्षप्रवाह भारतात राहिले. सिंधू व तिच्या उपनद्यांच्या पाणीवाटपावरून भारत-पाकिस्तान दरम्यान अनेकदा वाद निर्माण झाले. त्या दृष्टीने १९६० मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान सिंधू पाणी वाटपासंदर्भातील करार करण्यात आला आहे.
सिंधू नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. खाद्योपयोगी मत्स्यप्रकारांस पल्ला असे म्हणतात. थत्ता, कोत्री व सक्कर ही पाकिस्तानातील प्रमुख मासेमारी केंद्रे आहेत. पूर्वी सिंधू नदीतून मोठ्या प्रमाणावर जलवाहतूक केली जाई; परंतु सिंधू खोऱ्यातून लोहमार्ग टाकण्यात आल्यापासून (१८७८) आणि जलसिंचन प्रकल्पांचा विस्तार करण्यात आल्यापासून व्यापारी जलमार्ग म्हणून सिंधूचे महत्त्व कमी झाले. सांप्रत केवळ खालच्या टप्प्यात लहानलहान बोटींचा वाहतुकीसाठी वापर केला जातो.
सिंधू नदीचे खोरे हे पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे खोरे आहे. सिंधू नदीच्या तीरावरील व तीराजवळील पाकिस्तानमधील प्रमुख नगरे पुढीलप्रमाणे आहेत : कराची, कोत्री, ठठ्ठा, केंटा, हैदराबाद, सेहवान, सक्कर, रोहरी, मिठानकोट, डेरा गाझीखान, डेरा इस्माइलखान, मिआनवाली, कालाबाग, खुशालगढ व अटक. पेशव्यांच्या स्वाऱ्या अटकपर्यंत गेल्या होत्या तेच हे अटक. सिंधूच्या वरच्या खोऱ्यात गिलगिट, स्कार्डू, लेह, बासगो ही प्रमुख नगरे आहेत.
इसवी सन पूर्व तिसऱ्या सहस्रकातील ब्राँझयुगात एका प्रमुख नागरी संस्कृतीचा उगम व विकास या नदीच्या खोऱ्यात झाल्याचे पुरावे मिळतात. सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहें-जो-दडो, हडप्पा, चन्हुदारो इत्यादी ठिकाणी केलेल्या उत्खननात एका अत्यंत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले. ही प्राचीन संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती होय. या संस्कृतीचा उगम व विकास याच नदीखोऱ्यात झाला. या संस्कृतीचे मुख्य केंद्र सिंधू व हाक्रा नद्यांच्या पूरमैदानात होते. या संस्कृतीचा विस्तार सांप्रत पाकिस्तान, उत्तर भारत व अफगाणिस्तानात होता. काही संशोधकांच्या मते सिंधू संस्कृतीचा प्रसार कालांतराने दक्षिण भारतात झाला. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या वेगवेगळ्या कारणांपैकी हाक्रा नदीचा वाढत गेलेला कोरडेपणा व सिंधू नदीने वारंवार बदललेले प्रवाहमार्ग हे एक कारण सांगितले जाते. महाकाव्ये, पुराणे इत्यादी प्राचीन ग्रंथातही या नदीचा महिमा वर्णिलेला आहे. वैदिक साहित्यात सिंधू नदीचा निर्देश अनेकदा झालेला आहे. ऋग्वेदाच्या काही ऋचांत सिंधू किंवा सप्त सिंधू हा शब्द काही ठिकाणी सागर या अर्थी, तर काही ठिकाणी नदी या अर्थाने वापरला आहे. ‘सप्त सिंधू’मध्ये सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बिआस, सतलज व काबूल या सात नद्या अभिप्रेत असाव्यात. पंजाब प्रदेशाला उद्देशूनही सप्त सिंधू हे नाव वापरले जाते. सिंधू या शब्दावरूनच हिंदू हे नाव आले आहे. बेहिस्तून येथील पहिल्या डरायसच्या लेखात सिंधू नदीला हिंदू हेच नाव दिलेले आढळते. संस्कृत वाङ्मयात तिचा उल्लेख हिंदू असा केलेला आहे. आर्य लोक सिंधूला पवित्र मानत.
समीक्षक : माधव चौंडे